water
water

पाली: जलतज्ज्ञांच्या सर्वेक्षण व मार्गदर्शनानुसार जलसंधारणाची कामे

पाली - सिद्धेश्वर गावासह ग्रामपंचायत हद्दितील गावांचा पाणी प्रश्न सुटावा यासाठी येथील गावकरी एकजुट होऊन स्वयंप्रेरणेने श्रमदान करत आहेत. तालुक्यात बहुधा पहिल्यांदाच जलतज्ज्ञाच्या सर्वेक्षणानुसार त्यांच्या मार्गदर्शनाखाली येथील पाच गावांमध्ये पाणी टंचाईवर मात करण्यासाठी श्रमदानातून बहुविध कामे सुरु झाली आहेत.

सिद्धेश्वर ग्रामपंचायत हद्दितील गावात शाश्वत जलसंवर्धन होऊन तेथील पाणी प्रश्न कायमचा सुटावा यासाठी तरूण सरपंच उमेश गोविंद यादव यांच्यासह ग्रामपंचायतीने कंबर कसली. मग खास डोंबविली येथील महाराष्ट्रातील प्रसिद्ध जलतज्ज्ञ डॉ. अजित गोखले यांना बोलावण्यात आले. त्यांनी पाच गावाचे शास्त्रशुद्ध पद्धतीन सर्वेशण केले आणि त्यानुसर ग्रामपंचायतीकडे अहवाल सादर केला. मग त्यानुसार लोकसहभाग व दानशुर व्यक्तिंच्या मदतीने जलसंवर्धनाच्या कामांस सुरुवात झाली. आपला पाणी प्रश्न आपणच सोडविला पाहिजे या उदात्य हेतून ग्रामस्थ पुढे सरसावले. हाती कोयता,  कुदळ, फावडे आदी सामग्री घेवून वृद्ध व महिला देखिल तरुणांच्या खांद्याला खांदा लावून काम करु लागले. या सगळ्यांसोबत आदीवासी बांधव देखिल प्रचंड उर्जा घेवून उतरले. काम जलद पुर्ण होण्यासाठी तसेच अवघड काम करण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर देखिल करण्यात येत आहे. गावाबाहेर कामानिमित्त गेलेले अनेक सुशिक्षीत तरुण व नागरीक वेळात वेळ काढून गावासाठी श्रमदानाबरोबरच मिळेल ती मदत व सहकार्य करत आहेत.

जलतज्ज्ञ डॉ. अजय गोखले यांनी सर्वेक्षण केलेल्या पाचही गावात त्यांच्या मार्गदर्शनाखाली कामास वेगाने सुरुवात.....

सिद्धेश्वर आदिवासीवाडीत श्रमदानातून विहीर साफ
सर्व आदिवासी बांधव व गावकरी यांनी मिळून येथील विहिरीतील गाळ साफ केला. विहिरीचे पाणी टिकुण राहावे यासाठी जिथून पाणी झिरपते तेथे भिंत बांधण्याचा सल्ला जलतज्ज्ञ डॉ. अजित गोखले यांनी दिला. या कामास लागणारी आर्थिक मदत मुंबई वरून आलेले देणगीदाते एल.व्ही. केशव करणार आहेत.

वावळोलीत ७० वर्षांच्या वृद्धांचा तसेच अपंगाचा लक्षवेधी सहभाग
जलतज्ज्ञ गोखले यांच्या मार्गदर्शनानुसार वावळोली येथे गॉबियन बंधारा बांधण्यात आला. त्याबरोबरच येथील ओढ्याचा गाळ काढण्यात आला. तसेच येथे आणखी एक बंधारा देखील बांधण्यात येवून तलावाचा गाळ देखिल काढण्यात येणार आहे. हे काम सुरु असतांना जवळपास ६५ ते ७० वर्ष वयाचे गोपाळ मारुती जगताप व ताबड वाघमारे हे वृद्ध तेथे येवून दगड उचलून काम करु लागले. हे पाहताच सरपंच उमेश यादव त्यांच्या जवळ येवून त्यांना म्हणाले अाजोबा तुम्ही काम नका करु. फक्त इथे बसुन कामावर लक्ष ठेवा. तेव्हा हे आजोबा म्हणाले गावचे काम आहे ते केलेच पाहीजे. तसेच या ठिकाणी किशोर महाले हे अपंग देखिल तरुणांसोबत मोठ्या उत्साहाने काम करत होते. या सर्वांनी मिळून तरुणांमध्ये जोश निर्माण केला.

खांडसईत जेष्ठांनी केली विहीर साफ
अनेक वर्षापासून साफ न केलेली खांडसई विहिरी ग्रामस्थांनी मिळून साफ केली. त्यामुळे आता विहिरीचे झरे खूले होऊन चांगले पाणी येणार आहे. विषेश म्हणजे या गावातील बहुतांश तरुण कामानिमित्त शहरात गेले आहेत.त्यामुळे हे सर्व श्रमदान जेष्ठांनीच केले. तसेच येथील एका ओढ्याची खोली वाढवून रुंदिकरण करण्यात आले.

कासारवाडीची विहीर साफ
येथील विहीर ग्रामस्थांनी एकत्र येवून साफ केली. अाणि त्यातील गाळ बाहेर काढला.

पुई बंधार्याचे काम करणार
पुई येथील महत्वाच्या बंधार्याचे काम लवकरच मार्गी लागणार आहे. या बंधार्याची दुरुस्ती करण्यात येणार असुन.जिल्हा परिषदे मार्फत यासाठी फंड देखिल उपलब्ध करण्यात येणार आहे. हे सर्व काम श्रमदान, देणगीदाते व शासनाच्या सहकार्याने करण्यात येणार अाहे. या कामास सुरुवात झाली आहे.

सिद्धेश्वर तलावातील गाळ काढला
शासनाच्या गाळमुक्त तलाव व गाळ मुक्त शिवार योजने अंतर्गत नुकताच सिद्धेश्वर तलावातील गाळ काढण्यात आला. परिसरातील शेतकरी स्वखर्चाने हा गाळ घेऊन जात आहेत. गेली कित्येक वर्षां पासून साठलेला गाळ निघाल्याने ग्रामस्थ आनंदी आहेत. शिवाय परिसरातील पाणी साठा वाढण्यास मदत होईल त्यामुळे ग्रामस्थ समाधान व्यक्त करत आहेत. 

यावेळी तहासिलदार बी. एन. निंबाळकर, गटविकास अधिकारी विनायक म्हात्रे, उपसरपंच नथूराम चोरघे, सदस्या विद्या यादव, योगेश सुरावकर, ग्रामसेवक नितीन भोसले,ग्रामस्थ श्रीकांत दुर्वे, संतोष जाधव, महादेव कदम, सुनील पोंगडे, कृष्णा वाघमारे अादी उपस्थित होते. तसेच येथील ओढ्यातील गाळ देखिल काढण्यात आला. अनंता साळसकर आणि आशिष यादव यांनी बंधारा कामामध्ये विशेष सहकार्य केले.

या प्रेरणतून गावे सुजलाम सुफलाम होणार...
या प्रकारच्या कामासाठी ग्रामपंचायतीकडून पहिल्यांदाच बोलावणे आले. असे स्वयंप्रेरीत सरपंच आणि लोकप्रतिनिधी खूपच कमी दिसतात. त्यांनी स्वतः उन्हातान्हात फिरून संपूर्ण शिवारफेरी केली. इतरांनी यांच्या कडून प्रेरणा घेतली तर गावे सुजलाम सुफलाम होतील. गावा गावातील लोकांनी स्वतःच्या सुविधा स्वतःच निर्माण करण्याचा ध्यास घेतला तर कुठेही टंचाई उरणार नाही.
डॉ. अजित सुरेश गोखले, जल व पर्यावरण तज्ज्ञ आणि जलनायक

लोक बाहेर पडतात…
लोकांना योग्य प्रकारे सांगितल्यास ते श्रमदानासाठी बाहेर पडतात. त्यांना पाण्याचे महत्व समजले आहे. आम्हाला लोकांची चांगली साथ मिळत आहे. त्याबरोबरच उपसरपंच,सर्व सदस्य आणि टिम यांचे अमुलाग्र सहकार्य आहे. मी समाधानी आहे, पण अजुन खुप काही करायचे आहे. श्वाश्वत जलसंवर्धनासाठी शास्त्रशुद्ध उपाय व तंत्रज्ञानाची गरज आहे.त्यासाठी देणगीदाते व शासनाची मदत मिळत आहे.
उमेश गोविंद यादव, सरपंच, सिद्धेश्वर ग्रामपंचायत

गावाचा विकास झाला पाहिजे, मुंबईत बँक कर्मचारी आहे. सरपंच उमेश यादव व त्यांच्या टिमने घेतलेली मोहिम अतिशय स्तुत्य आहे. या उपक्रमात सहभागी होऊन आपले योगदान देण्यासाठी वेळ काढून सुट्टी टाकुन येतो. 
संतोष जाधव, ग्रामस्थ, बँक कर्मचारी, मुंबई

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com