सिंधुदुर्गच्या पाऊलखुणा: बापूसाहेब शिक्षणासाठी गेले सातासमुद्रापार l Pancham Khemraj | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Pancham Khemraj

सिंधुदुर्गच्या पाऊलखुणा: बापूसाहेब शिक्षणासाठी गेले सातासमुद्रापार

सिंधुदुर्ग: पंचम खेमराज (Pancham Khemraj) उर्फ बापूसाहेब महाराजांचे बालपण वडील श्रीमंत श्रीराम सावंत (Shriram Sawant)यांच्या छत्रछायेपासून दूरच गेले. ब्रिटिशांच्या (British)त्यांना चांगले शिक्षण देण्याच्या धोरणामुळे ते प्रथम पुण्यात (Pune)तेथून कोल्हापुरात (Kolhapur)आणि पुन्हा उच्च शिक्षणासाठी इंग्लंडमध्ये (England)गेले. याच दरम्यान संस्थानचे राजे श्रीराम सावंत यांचे निधन झाले. त्यांचे अंत्यदर्शन घेण्याचे भाग्यही बापूसाहेबांना लाभले नाही. गादीचे वारसदार म्हणून त्यांच्या नावाची घोषणा झाली, तेव्हा ते इंग्लंडमध्ये महाविद्यालयीन शिक्षण घेत होते.

पंचम खेमराज उर्फ बापूसाहेबांचे बालपण तसे खडतरच गेले. लहान असतानाच आईचे निधन झाले. अगदी कमी वयात शिक्षणासाठी पुण्यात जावे लागल्याने वडिलांचा सहवासही त्यांना फार कमी लाभला. पुण्याहून कोल्हापूर आणि नंतर पुन्हा पुण्यात मिस मॅक्सन यांच्याकडे ते शिक्षणासाठी परतले. यानंतर त्यांनी पुढील शिक्षणासाठी इंग्लंडमध्ये जावे, अशी मुंबईचे (Mumbai) गर्व्हनर लॉर्ड सिडनहॅम (Governor Lord Sydenham)यांची इच्छा होती. त्यानुसार इंग्रजांनी त्यांना इंग्लंडमध्ये पाठवायची तयारी केली. त्यावेळी ते अवघे १४ वर्षाचे होते. आपल्या भावी राजपुत्रांनी इतक्या कोवळ्या वयात सातासमुद्रापार जावे, अशी सावंतवाडीकरांची इच्छा नव्हती. त्या काळात प्रजा हे बोलूनही दाखवत होती.

हेही वाचा: सिंधुदुर्गच्या पाऊलखुणा; राजगादीसाठीचा संघर्ष टोकाला

बापूसाहेब मात्र शिक्षणासाठी जायला अगदी उत्साहाने तयार होते. त्या काळात इंग्लंडचा प्रवास १३ दिवसांचा असायचा. बाळ राजे या प्रवासाला तयार होते. त्यांनी शिक्षणासाठी इंग्लंड गाठले. ब्रिटिशांनी त्यांची व्यवस्था मॅलव्हर्न येथे केली होती. पूर्वी हे एक खेडे होते. येथील वातावरण अतिशय आल्हाददायक, निसर्गसंपन्न होते. यामुळे काम करण्याचा उत्साह येथे आपोआप जाणवायचा. यामुळे इंग्रजांनी याला छोट्या शहराचे रूप देत ‘एज्युकेशन हब’ म्हणून त्याचा विकास केला.

हेही वाचा: सिंधुदुर्गच्या पाऊलखुणा; बडोदा घराण्याशी जुळले नाते

जगभरातील राजघराणे, श्रीमंतांची मुले येथे शिक्षणासाठी यायची. याठिकाणी कित्येक खासगी शाळा होत्या. एकच महाविद्यालय होते. मॅलव्हर्नमधील मिस्टर अ‍ॅलन यांच्या खासगी शाळेत बापूसाहेबांचा प्रवेश झाला. त्यांच्या देखरीखाली शिक्षण सुरू झाले. त्यांची रहायची व्यवस्था मिस्टर हाऊस यांच्याकडे पेईंग गेस्ट म्हणून करण्यात आली होती. त्या काळात इंग्लंडमध्ये ही पद्धत दृढ होती. खासगी शाळेत एक टर्म झाल्यानंतर बापूसाहेबांचा प्रवेश महाविद्यालयात झाला.

मॅलव्हर्नमध्ये आल्यापासून बापूसाहेबांच्या अंगी असलेल्या गुणांचा झपाट्याने विस्तार सुरू झाला. क्रिडांगणावर ते विशेष चमक दाखवायचे. मुळातच इंग्लंडमध्ये खेळाची आवड असल्यांची संख्या मोठी असते. त्यात हिंदूस्थानातील एक राजकुमार इतका कर्तृत्ववान आहे हे बघून तेथेही अनेकांना याचे कौतुक वाटे. शिवाय बापूसाहेबांचे सौजन्य, गोड स्वभाव आणि आनंदी वृत्ती अनेकांना भुरळ पाडत असते. त्या काळात ज्यांना छोट्या बापूसाहेबांचा सहवास लाभला त्यांनी केलेल्या पत्रव्यवहारावरून त्यांची इंग्रजांवर किती छाप पडली होती याचा अंदाज येतो. शाळेचे चालक मिस्टर अ‍ॅलन यांनी सावंतवाडी संस्थानचे पोलिटीकल एजंन्ट मेजर पॉटींजर यांना पाठवलेल्या पत्रात युवराजांची फार तारीफ केली होती. आपल्या शाळेत ते सर्वांचे आवडते असल्याचा उल्लेख या पत्रात होता. त्यांच्या विलायतेतील शिक्षणाची मुळ कल्पना आखणाऱ्या मुंबईचे गव्हर्नर लॉर्ड सिडनहॅम यांनाही याची माहिती दिली जात असे.

वर्षभरानंतर १९१२ मध्ये बापूसाहेबांसाठी रेव्हरंट इ. एल. होम्स यांची गार्डीयन म्हणून नेमणूक करण्यात आली. आता बापूसाहेब महाविद्यालयीन शिक्षण घेत होते. त्यांच्या शिक्षणातील प्रगतीची माहिती पत्राद्वारे सावंतवाडी संस्थानात कळवली जायची. त्यांचे वडील तथा राजे श्रीराम उर्फ रावसाहेब यांना याचे खूप कौतुक वाटे. त्यांच्या मनात युवराजांबद्दल खूप वात्स्यल्य होते.

लहानपणी ते शिक्षणाच्या कारणामुळे दूर गेल्याने दोघांमधली ओढ आणखी वाढली होती. इतका त्याग केल्यानंतर त्याचे फळ बापूसाहेबांच्या शैक्षणिक प्रगतीतून मिळत होते. हे सर्व चालू असतानाच रावसाहेबांची प्रकृती अचानक बिघडली. २४ एप्रिल १९१३ ला त्यांचे निधन झाले. संस्थानचे राजे गेल्याने सावंतवाडीची जनता दुःख सागरात बुडाली. सातासमुद्रापार असलेली बापूसाहेब वडिलांचे अंत्यदर्शनही घेवू शकले नाही. बापूसाहेबांचे कर्तृत्व पाहण्यासाठी त्यांचे वडिलही आता या जगात राहिले नव्हते. रावसाहेबांच्या निधनानंतर बापूसाहेबांना सावंतवाडीच्या गादीचे पुढचे वारसदार म्हणून जाहीर करण्यात आले; मात्र हा क्षणही एकीकडे अति दुःखाचा आणि दुसरीकडे नवी जबाबदारी खुणावणारा होता.

इंग्लंडमध्ये छाप

मॅलव्हर्न येथील महाविद्यालयात बापूसाहेबांची प्रगती झपाट्याने होत होती. टेनिस, क्रिकेट या खेळात त्यांचे विशेष प्राविण्य होते. हिंदूस्थानातील एका संस्थानचे युवराज असल्याने त्यांच्याकडे महाविद्यालयामध्ये पहाण्याचा दृष्टीकोन आदराचा असायचा. रावसाहेबांच्या निधनानंतर त्यांना ब्रिटिशांनी संस्थानचे पुढचे अधिपती म्हणून जाहीर केले. गादीचा वारस असलेल्या बापूसाहेबांबद्दल महाविद्यालयात पाहण्याचा दृष्टीकोन आणखी आदराचा झाला.

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
loading image
go to top