शेतकऱ्यांना दिलेल्या पंपातही पाणी मुरते!

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 12 जानेवारी 2017

रत्नागिरी: कृषी विभागाने खरेदी केलेल्या 2 अश्‍वशक्तीचे (डिझेल-पेट्रोल) पंप निकृष्ट असल्याचे आज पंचायत समितीच्या सभागृहामध्ये पुढे आले. तालुका कृषी खात्याने दिलेल्या आढाव्यामध्ये आलेल्या 40 पंपांपैकी अनेक पंपांच्या तक्रारी आल्याचे सांगण्यात आले. यावर सभापती बाबू म्हाप यांनी मागणीचा विचार न करता शेतकऱ्यांवर हे अनुदानित पंप लादले जात आहेत, असा आरोप केला. कृषी विभागाने उचल लक्षात घेऊनच अवजारांची मागणी करावी, अशी सूचना त्यांनी केली.

येथील पंचायत समितीची मासिक सभा सभापती बाबू म्हाप यांच्या अध्यक्षतेखाली झाली. आजच्या सभेला अनेक सदस्य गैरहजर होते. विषय पत्रिकेवरील विषयांचे विभागानिहाय वाचन सुरू झाले, तेव्हा कृषी विभागाचा आढावा देताना खातेप्रमुखांनी सांगितले की, जिल्हा परिषदेच्या सेस फंडातून खरेदी करण्यात आलेल्या पंपांबाबत तक्रारी आहेत. 2 एचपीचे पेट्रोल-डिझेलवर चालणारे हे पंप आहेत. 40 पंप आले होते. प्रत्येक पंपाची किंमत एकोणीस हजार आहे. त्याला 50 टक्के अनुदान आहे. "एएसपी' या कंपनीचे पंप असून त्यांच्या तक्रारी येऊ लागल्या आहेत. त्यामुळे हे पंप निकृष्ट दर्जाचे असल्याचे पुढे आले आहेत.

यावर सभापती श्री. म्हाप यांनी शेतकऱ्यांचा मागणीनुसार अवजारांची खरेदी होते का, असा प्रश्‍न केला. त्यावर नकारार्थी उत्तर मिळाले. अनुदानित असली तरी अपेक्षित वस्तू न मिळाल्यामुळे त्याची उचल होत नाही. कृषी विभागाने शेतकऱ्यांच्या मागणीचा आधी विचार करावा, असे त्यांनी सांगितले. पंचायत समितीचे उपसभापती आणि सभापतींच्या गणातील हातखंबा प्राथमिक आरोग्य केंद्राच्या हद्दीतील मिरजोळे येथील 13 विहिरींचे पाणी दूषित असल्याचे आरोग्य विभागाने स्पष्ट केले. एकूण 47 पाणी नमुन्यापैकी 13 दूषित आढळले आहेत. हे प्रमाण 28 टक्के आहे. याची गंभीर दखल सभापती आणि उपसभापतींनी घेतली. एवढ्या मोठ्या प्रमाणात पाणी दूषित का झाले, याची माहिती घेतली का, विचारता आरोग्य विभागाला खुलासा करता आला नाही. उपसभापती व अधिकाऱ्यांनी मिरजोळेतील कंपन्यांचे दूषित पाणी विहिरींमध्ये गेले, असे सांगितले. याविरुद्ध अनेक वेळा आंदोलने झाली; परंतु कंपन्या त्याला जुमानत नाहीत. जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेऊन कंपनीच्या अधिकाऱ्यांना बोलावून योग्य समज देण्याची गरज आहे.

Web Title: panchayat samiti and pump's problem