esakal | दिलासा; पणदेरी धरणातील पाणी कमी करण्यात यश; यंदा पाणीसाठा नाही
sakal

बोलून बातमी शोधा

दिलासा; पणदेरी धरणातील पाणी कमी करण्यात यश; यंदा पाणीसाठा नाही

दिलासा; पणदेरी धरणातील पाणी कमी करण्यात यश; यंदा पाणीसाठा नाही

sakal_logo
By
सचिन माळी

मंडणगड : गळती लागल्याने धोकादायक बनलेल्या पणदेरी धरणाची (panderi dam) पाणी पातळी कमी करण्यात प्रशासनाला यश आले आहे. कालव्यातील विसर्ग सुरूच ठेवण्यात आला असून, भिंतीवरील पाण्याचा दाब कमी झाला आहे. (mandangad) यावर्षी पावसात धरणात पाणीसाठा न करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. डॅम सेफ्टी ऑर्गनायझेशनचे (Dam Safety Organization) कार्यकारी अभियंता श्री. ठाकूर, श्री. मुरकुटे यांनी आज धरणास भेट दिली असून, धरण सुरक्षित असल्याचा निर्वाळा दिला आहे. संध्याकाळी ५ वाजण्याच्या दरम्यान सुरू झालेल्या पावसावर प्रशासन लक्ष ठेवून आहे.

सांडव्या ठिकाणच्या परिसरातील पाणी पातळी घटल्याने तेथून विसर्ग बंद झाला आहे. धरणाच्या पाणी पातळीत घट झाल्याने पाण्याखालील जमीन दिसू लागली आहे. गळतीच्या ठिकाणी मातीचा भराव करण्याचे काम सुरू आहे. ५ जुलैला मुख्य भिंतीला लागलेल्या गळतीमुळे पणदेरी धरण धोक्यात आले. सतत दोन दिवस भिंतीतील गळती काढण्यासाठी अथक प्रयत्न केले, मात्र धरण पूर्ण क्षमतेने भरल्याने विसर्ग वाढवण्यात अडचण निर्माण होत होती. धरणाच्या भिंतीवर पाण्याचा मोठा दाब असल्याने कोणतीही उपाययोजना तांत्रिक बाजूंची पडताळणी व निरीक्षण करून लघुपाटबंधारेच्या अधिकाऱ्यांना करावी लागत होती.

हेही वाचा: स्पर्धा परीक्षेला राम राम ठोकत शेखरने गाव गाठलं अन् झाला कोट्याधीश

ब्लास्टिंग करून भिंत ५ बाय दीड मीटरने कमी करून विसर्ग वाढवण्यात आला. तांत्रिक अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाने कालव्याचा दरवाजा हळूहळू उघडण्यात आला. त्यातूनही विसर्ग झाल्याने पाणी पातळीत घट होऊ लागली. दरम्यान, दोन दिवस मातीचा भराव करून लागलेली गळती थांबविण्यात यशही आले. त्यामुळे मोठा अनर्थ टळला. दोन्ही बाजूंनी पाणी ओढ्यावाटे सावित्री खाडीकडे प्रवाहित करण्यात आले, अशी माहिती लघुपाटबंधारे उपअभियंता गोविंद श्रीमंगले यांनी सांगितले. गुरुवारी संध्याकाळपर्यंत धरणातील पाणी पातळी ११५.५० मिटर होती. ती १०९ मिटर पर्यंत कमी करावी लागणार आहे.

  • प्रशासनाची सज्जता

  • स्वयंसेवकांच्या मदतीने बचावपथक

  • ॲम्ब्युलन्ससह आरोग्यपथक,

  • एनडीआरएफचे पथक घटनास्थळी

हेही वाचा: व्हेल माशाच्या उलटीला इतके का महत्व? उलटी कशी ओळखतात

गळतीच्या ठिकाणी मातीचा भराव सुरू

गळतीच्या ठिकाणी मातीचा भराव करण्याचे काम सुरू असून, अजून खाली ६ मीटरपर्यंत मातीचा भराव करण्यात येणार आहे. त्यासाठी पाणी पातळी कमी होणे आवश्यक आहे. त्यानंतर त्यावर पिचिंग करून त्याला मजबुती देण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे, मात्र संध्याकाळी ५ वाजण्याच्या दरम्यान सुरू झालेल्या पावसाने चिंता वाढवली आहे.

सतर्कतेचा इशारा, स्थलांतर कायम

धरणाच्या खालच्या बाजूस पणदेरी मोहल्ला, सुतारवाडी, पाटीलवाडी, कुंभारवाडी, रोहीदासवाडी व बौध्दवाडी येथे लोकवस्ती असून, सदर वाडी व गावातील लोकांना सर्तकतेचा इशारा देण्यात आला आहे. तसेच जीवितहानी टाळण्याच्या दृष्टीने रोहीदासवाडी व बौध्दवाडी येथील सुमारे २०० ग्रामस्थांचे त्यांच्या मौल्यवान वस्तूंसह सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करण्यात आले आहे. त्यांच्या भोजनाची व निवासाची व्यवस्था करण्यात आली आहे.

loading image