नाणार रिफायनरी प्रकल्पाला जमीनमालकांचा, शेतकऱ्यांचा पाठिंबा

नाणार रिफायनरी प्रकल्पाला जमीनमालकांचा, शेतकऱ्यांचा पाठिंबा

राजापूर - तालुक्‍यातील नाणार परिसरातील शेतकरी, जमीनमालक यांनी रिफायनरी उभारणीसाठी सुमारे साडेसात हजार हेक्‍टर जमीन देण्यास संमती स्वयंस्फूर्तीने व सशर्त दिली आहे. त्यामध्ये दिवसागणिक वाढच होत चालली आहे. त्यातून रिफायनरी प्रकल्पाला जमीनमालकांचा, शेतकऱ्यांचा पाठिंबा असल्याचे स्पष्ट होत आहे. याचा विचार करून शासनाने रिफायनरी प्रकल्पाची राजापुरात उभारणी करावी, अशी मागणी कोकण जनकल्याण प्रतिष्ठानचे अध्यक्ष पंढरीनाथ आंबेरकर यांनी आज पत्रकार परिषदेत केली. 

यावेळी प्रतिष्ठानचे अविनाश महाजन, नीलेश पाटणकर आदी उपस्थित होते. प्रदूषणाच्या मुद्द्यावर प्रकल्पाला विरोध केला जातो. मात्र, रिफायनरीमधून तयार होणाऱ्या विविध दैनंदिन जीवनातील वस्तूंचा विरोधकांकडून सर्रास वापर केला जात आहे. नेमका हा विरोधाभास का ? गाड्यांच्या वापरामुळेही प्रदूषण होते. मग, विरोधकांकडून गाड्यांचा वापर सोडून बैलगाडीतून जा-ये करणार का, असा टोलाही विरोधकांना लगावला.

प्रकल्पाला विरोध करण्यासाठी विरोधकांना परकीय शक्तीचे बळ तर, मिळत नाही ना, अशा शंकाही त्यांनी यावेळी उपस्थित केली. कोणतेही शास्त्रीय कारण न सांगता राजापुरातून प्रकल्प हलविणे, हे कोकणावर अन्याय असल्याचे मतही त्यांनी यावेळी मांडले. शासनाने जमिनीच्या मोबदल्याचे पॅकेज जाहीर करावे. ते पॅकेज न स्वीकारता लोकांकडून विरोध केला गेला तर, राजापुरातून रिफायनरी जरूर अन्यत्र हलवावी, असेही त्यांनी यावेळी सांगितले. 

रायगडमध्ये संमती देतील का... 
शिवसेनेकडून नाणार रिफायनरीला विरोध केला गेला. त्याचा फायदा शिवसेनेला लोकसभा निवडणुकीमध्येही झाला. मात्र, हाच प्रकल्प आता रायगड जिल्ह्यामध्ये उभारला जाणार आहे. शिवसेनेच्या ताब्यातील पर्यावरण व उद्योग खात्याची संमती वा मंजुरी मिळणे गरजेचे आहे. अशा स्थितीमध्ये राजापूरला विरोध करणाऱ्या शिवसेनेचे या खात्यांचे मंत्री रायगडमध्ये उभारणीसाठी संमती देतील का, असा सवाल अविनाश महाजन यांनी केला. प्रकल्प उभारणीसाठी साडेसात हजार एकर जागेची संमती मिळाली आहे. शिवसेना प्रकल्प उभारणीचे समर्थन करणार का, असा सवालही त्यांनी उपस्थित केला. 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com