पुठ्ठ्यांपासून बनवल्या गाड्यांच्या आकर्षक कलाकृती!

संदेश सप्रे
बुधवार, 28 डिसेंबर 2016

देवरूख - कलेची आवड माणसाला स्वस्थ बसू देत नसते, मग तो विद्यार्थी असो वा ज्येष्ठ; साडवलीतील मेकॅनिकल इंजिनिअर असलेल्या प्रीतेश मांगले यानेही अभ्यासाप्रमाणेच आपली कला जोपासत चक्‍क पुठ्ठ्यांचा वापर करून फर्निचर आणि विविध कलाकृती साकारल्या आहेत. टाकाऊपासून टिकाऊचा संदेश देणाऱ्या प्रीतेशच्या या कलाकृतींची नोंद ‘इंडियन बुक ऑफ रेकॉर्डस्‌’ने घेतली आहे. 

प्रीतेश मुरलीधर मांगले हा यावर्षीच नजीकच्या आंबव महाविद्यालयातून मेकॅनिकल इंजिनिअरिंगची पदवी घेऊन बाहेर पडला आहे. माध्यमिक शिक्षण कोसुंबला, तर महाविद्यालयीन शिक्षण देवरूखला पूर्ण केलल्या प्रीतेशने नंतर आंबवमधील राजेंद्र माने अभियांत्रिकी महाविद्यालयात प्रवेश घेतला. चौथी आणि सातवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेत गुणवत्ता यादीत झळकलेला प्रीतेश हा बालपणापासून उत्तम हस्तलेखक, चित्रकार आणि कलाकारही आहे. अभ्यासाच्या जोडीनेच तो या आपल्या कला जोपासतो, बालवयातच त्याला लाभलेल्या या कलेची दखल आकाशवाणीने घेतली होती. आकाशवाणी रत्नागिरीवर त्याची हस्तकला विषयावर मुलाखत प्रसिद्ध झाली आहे, शिवाय त्याला गोडबोले आदर्श विद्यार्थी पुरस्कारही प्राप्त झाला आहे.

प्रीतेशने आतापर्यंत टाकाऊ पुठ्ठ्याचा वापर करून ७० पेक्षा अधिक सुबक कलाकृती बनविल्या आहेत. यामध्ये एसटी, ट्रक, डमडम, जीप, बुलडोझर, जेसीबी आदींचा समावेश आहे. केवळ पुठ्ठा, रंग आणि फेविकॉल वापरून तयार झालेल्या कलाकृती पाहिल्यास त्या हुबेहूब आपल्यासमोर उभ्या असल्याचा भास होतो. यावरच न थांबता प्रीतेशने पुठ्ठा आणि सनमाईक यांचा वापर करून टेबल, पलंग, टीव्ही शोकेस, टीपॉय, कपाट, स्टूल आदी फर्निचरही तयार केले आहे. प्रत्यक्षात ते पाहिल्यास लाकडी असल्याचा भास होतो. टाकाऊपासून टिकाऊ वस्तू तयार करणाऱ्या प्रीतेशच्या या उपक्रमाची दखल दिल्लीतील इंडियन बुक ऑफ रेकॉर्डस्‌ने घेतली असून त्याची या उपक्रमात नोंद झाली आहे. पुढील महिन्यात दिल्ली येथे होणाऱ्या जाहीर कार्यक्रमात त्याचा सत्कार होणार आहे. प्रीतेश सध्या पुण्यात गाड्यांच्या डिझाईनचा कोर्स करीत आहे.

Web Title: Panels made from trains attractive artwork!