panvel assembly constituency 70 thousand name skip voting list lok sabha election politics
panvel assembly constituency 70 thousand name skip voting list lok sabha election politicsSakal

राजकीय आराखड्यांना धक्का; पनवेल मतदारसंघात ७० हजार नावे वगळली, उमेदवारांची गणित बिघडणार

पनवेल विधानसभा मतदारसंघातील आगामी निवडणुकांमध्ये मतदारांचा कौल निर्णायक ठरणार

Panvel News : राज्यात सर्वाधिक मतदार असणाऱ्या पनवेल विधानसभा मतदारसंघातील तब्बल ७० हजार नावे वगळली आहेत. यात दुबार नोंदणी, स्थलांतरित आणि मयत मतदारांचा समावेश आहे.

त्यामुळे आगामी काळामध्ये मतदानाचा टक्का घसरण्याची शक्यता असून वगळलेल्या नावांमुळे आगामी निवडणुकांमधील राजकीय गणित बिघडणार असल्याने राष्ट्रीय पक्षांना फटका बसण्याची शक्यता आहे.

मुंबईचे प्रवेशद्वार असलेल्या पनवेल परिसराचा झपाट्याने विकास झाला आहे. सिडको वसाहती तसेच बाजूला मोठ्या प्रमाणात नागरीकरण झाले आहे. त्यामुळे पनवेलची लोकसंख्या कमालीची वाढली आहे.

अशातच नैना क्षेत्रामध्ये उभ्या राहणाऱ्या इमारतींमध्ये मुंबईबरोबर इतर भागांतून लोक या ठिकाणी राहण्यासाठी येतात. त्यामुळे लोकवस्ती बरोबर मतदारांची संख्या सुद्धा वाढली आहे. बहूभाषिक वर्ग असल्याने पनवेल विधानसभा मतदारसंघातील आगामी निवडणुकांमध्ये मतदारांचा कौल निर्णायक ठरणार आहे.

अशातच २०१९ च्या तुलनेत २०२४ चा विचार करता मतदारांचा आकडा सहा लाखांपर्यंत जाईल, असा अंदाज वर्तवण्यात आला होता. मात्र, पनवेल विधानसभा मतदारसंघातील जवळपास सत्तर हजार मतदारांची नावे मतदार यादीमधून वगळण्यात आली आहेत. त्यामुळे इतक्या मोठ्या संख्येने मतदारांची संख्या वजा झाल्याने उमेदवारांना प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागणार आहे.

मावळमुळे पनवेलला महत्त्व

मावळ लोकसभा मतदारसंघात पनवेल येथील मतदारांची भूमिका सुद्धा महत्त्वाची समजली जाते. या अगोदर सातत्याने महायुतीला म्हणजेच शिवसेना भाजपच्या पारड्यामध्ये मतदारांनी मतदान केले.

पनवेल विधानसभा मतदार संघातील मतदारांनी पुनर्रचनेनंतर राष्ट्रीय पक्षांना कौल दिला आहे. २००९ ला काँग्रेस आणि त्यानंतर सलग दोनदा भाजपच्या उमेदवाराला मतदारांनी पसंती दिली. प्रशांत ठाकूर यांना पनवेलकरांनी तीनदा विधानसभेत पाठवले आहे. त्यामुळे राज्यातील इतर मतदारसंघांच्या तुलनेत राजकीय परिस्थिती वेगळी आहे.

नावे वगळण्याची कारणे

पनवेल विधानसभा मतदारसंघात एकाच मतदारांचे दोन दोन ठिकाणी नावे होती. ग्रामपंचायत निवडणुकीत मतदान व्हावे या उद्देशाने शहरी भागात राहणाऱ्यांची दोन्ही ठिकाणी नावे होती. मात्र महानगरपालिकेची स्थापना झाल्यानंतर अनेक ग्रामपंचायती संपुष्टात आल्या.

मतदार याद्यांची छाननी करण्यात येत असल्याने दुबार नावे वगळण्यात आली. पनवेल विधानसभा मतदारसंघांमध्ये राहणारे अनेक जण कोरोनाकाळात आपल्या मूळ गावी परतले. अनेकांच्या हाताचे काम गेले. त्यामुळे ते दुसरीकडे स्थलांतरित झाले.

याद्यावर फोटो नसणे, त्याचबरोबर दिलेल्या पत्त्यावर मतदार न भेटणे तसेच मयत झालेल्यांची नावे मतदार यादीमधून काढून टाकण्यात आले आहेत. त्यामुळे मोठ्या प्रमाणात मतदारांचा आकडा कमी झाला आहे. नव मतदारांनी मतदार नोंदणीकडे पाठ फिरवली आहे.

कोरोनामुळे स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजेच पनवेल महापालिका, जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका झाल्या नाहीत. त्यामुळे राजकीय पक्षांकडूनही मतदार नोंदणी करण्याकडे फारशी उत्सुकता दाखवण्यात आली नाही.

अनेक ठिकाणी दुबार नावे आहेत. काही मतदार हे मयत झाले.तर काहींची स्थलांतर झाले. पनवेल परिसर हा शहरीकरणाचा केंद्रबिंदू आहे.

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ त्याचबरोबर इतर प्रकल्प या भागात असल्याने साहजिकच लोकसंख्येबरोबरच मतदारांची संख्या ही वाढलेली आहे. नवीन मतदारांच्या तुलनेत या पंचवार्षिक काळामध्ये नोंदणी झाली नसल्याने मतदार संख्येचा आलेख घटला आहे.

- देविदास खेडकर, राजकीय अभ्यासक

पनवेलची मतदार संख्या राज्यात नंबर एक आहे. एका वर्षात ७० हजार नावे वगळली आहेत. हा आकडा पाच वर्षांचा आहे. मात्र नवीन मतदारांची नोंदणी हवी त्या प्रमाणात झालेले नाही, ही वस्तुस्थिती आहे. यंदाही निवडणुकीत भाजप, महायुती विक्रम करेल, हे सांगण्यासाठी ज्योतिषाची आवश्यकता नाही.

- सीता पाटील,माजी महापौर, पनवेल

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com