आमच्या गावात यायच नाय.. अस म्हणत परशुराम गावाने केले हे....

सकाळ वृत्तसेवा 
मंगळवार, 24 मार्च 2020

शहरात बाहेरून येणारा लोंढा रोखण्यासाठी चिपळूण शहराच्या सीमा बंद करण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे.

चिपळूण (रत्नागिरी) : शहरात बाहेरून येणारा लोंढा रोखण्यासाठी चिपळूण शहराच्या सीमा बंद करण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे. आज सकाळी शहरातील विविध मार्ग बंद करण्यात आले. पालिकेतील गर्दी कमी करण्यासाठी पोलिसांना पाचारण करावे लागले.

 चिपळूणातील परशुराम गावाने बाहेरील व्यक्तींना गावात येण्यास बंदी घातली आहे. याचप्रकारे चिपळूण शहरातील नागरिकांचे हित लक्षात घेऊन पालिकेने शहराच्या काही सीमा सील केल्या आहेत. रस्त्यावर ठिकठिकाणी अतिक्रमणे उभे करून रस्ते अडविण्यात आले आहेत. चिपळूण शहरातील काही भागात संशयित रूग्ण आढळल्यानंतर खळबळ उडाली आहे. सध्या त्यांच्यावर आरोग्य विभागाकडून उपचार सुरू आहे. त्यांची काळजीही घेतली जात आहे. 

हेही वाचा- ब्रेकिंग -  मुख्यमंत्र्यांच्या आदेशाचा शिक्षणमंत्र्यांकडून भंग...

अत्यावश्यक सेवेसाठी काही दुकाने उघडी
चिपळूणात जमावबंदीच्या आदेशाला काही भागाकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. बाजारपेठा बंद असल्याने गर्दीवर अंकुश ठेवण्यात यश आले आहे. तीन आसनी रिक्षादेखील बंद ठेवण्यात आल्या आहेत. अत्यावश्यक सेवेसाठी काही दुकाने उघडी आहेत. मात्र शहराच्या काही भागात दुचाकीवरून रिकामटेकडे फिरणार्‍याचे प्रमाण वाढले आहे. पोलिस त्यांच्यावर कारवाई करत आहेत तरीही शहरातील गर्दी कमी होत नाही त्यामुळे शहराच्या सीमा बंद करण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे.

हेही वाचा- जीवनावश्यक व अत्यावश्यक सेवा पुरविणारी व वस्तूंची वाहतूक करणारी वाहने वगळता इतर सर्व प्रकारच्या वाहनांना बंदी घालण्याचे आदेश दिले आहेत.
चिपळूण शहरातील रस्तेही बंद

उपनगरातून मुख्य बाजारपेठेत येणारे मार्ग बंद करण्यात आले आहेत.  चिपळूण पालिकेतील कर्मचारीही कमी करण्यात आले आहे. तरीही कामानिमित्त पालिकेत येणार्‍या नागरिकांची गर्दी नेहमीप्रमाणे वाढत आहे. कामे झाल्यानंतर सुद्धा लोक पालिकेत थांबत आहेत. सूचना करूनही त्यांच्यावर कोणताही परिणाम होत नाही त्यामुळे आज सकाळी 11 नंतर पालिकेत पोलिस पाचारण करण्यात आले. पालिकेत गर्दी करून राहिलेल्या लोकांना पोलिसांनी बाहेर काढले. मुख्यमंत्र्यांच्या आदेशानूसार शहरातील काही पेट्रोल पंप आज बंद ठेवण्यात आले. तर काही पेट्रोल पंपावर केवळ दुचाकीस्वारांसाठी ठरावीक वेळेत पेट्रोल उपलब्ध करून दिला जात होता.
पेट्रोल पंपावर येणार्‍या प्रत्येकाची नोंद करून घेतली जात होती. 

पालिकेत गर्दी होऊ नये म्हणून सर्वतोपरी प्रयत्न सुरू आहे. परंतू लोकांना अजूनही कोरोना विषाणू समजलेला नाही. त्यामुळे नागरिकांची गर्दी कमी होत नाही त्यामुळे नाईलाजाने काही भागाचे रस्ते अडविले असून पालिकेत पोलिस बोलविले आहे. 

सौ. सुरेखा खेराडे, नगराध्यक्ष चिपळूण


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Paripuram village banned outsiders from coming to village kokan marathi news