esakal | 'राणे, राऊत नाहक वक्तव्य करुन जनतेची दिशाभूल करताहेत'
sakal

बोलून बातमी शोधा

'राणे, राऊत नाहक वक्तव्य करुन जनतेची दिशाभूल करताहेत'

या मंडळींनी मुंबई ते सावंतवाडी राष्ट्रीय महामार्गाची दुरवस्था रोखण्यासाठी काय केले? या रस्त्यावर पडलेल्या खड्डयाचेही त्यांनी श्रेय घ्यावे.

'राणे, राऊत नाहक वक्तव्य करुन जनतेची दिशाभूल करताहेत'

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

कणकवली : विमानतळाच्या शुभारंभावरून श्रेयवाद करणाऱ्यांनी राष्ट्रीय महामार्गाच्या दुरवस्थेबाबतचे श्रेयही घ्यावे. केंद्र व राज्यातील सत्ताधाऱ्यांनी खड्डे बुजविण्यासाठी काय केले? चाकरमानी जिल्ह्यात येताना खड्ड्यातून आले व जिल्ह्यांतर्गत फिरतानाही खड्ड्यांतूनच फिरत आहेत. पालकमंत्रीही खड्डे बुजविण्याच्या विषयावर पाहू, करू असे उत्तर देतात, म्हणजे त्यांच्याकडे खड्डे बुजविण्यासाठी निधी नाही. सर्वसामान्य जनतेला त्रास देण्याचेच काम ही मंडळी करत आहेत. म्हणूनच मनसेच्यावतीने चाकरमान्यांना मोफत पेनकिलर देण्यात येणार आहे, अशी माहिती मनसेचे सरचिटणीस तथा माजी आमदार परशुराम उपरकर यांनी दिली.

येथील मनसेच्या संपर्क कार्यालयात पत्रकारांशी बोलताना उपरकर म्हणाले, 'चाकरमान्यांनीही याचा वचपा मुंबई व ठाणे महानगरपालिकेच्या निवडणुकीतून वेळ काढावा व या दोन्ही सत्ताधाऱ्यांना चपराक देत मनसेला मतदान करावे. ज्या चिपी विमानतळ उद्‍घाटनावरून सध्या श्रेयवाद सुरू आहे; मात्र दोनवेळा भूमीपूजन करणाऱ्या केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी हे लक्षात घ्यावे की हा प्रकल्प राज्याचा आहे. परवानग्या केंद्राच्या असल्या तरीही यजमानी राज्यसरकार आहे. त्यामुळे राणे व खासदार विनायक राऊत नाहक वक्तव्ये करून जनतेची दिशाभूल करीत आहेत. या मंडळींनी मुंबई ते सावंतवाडी राष्ट्रीय महामार्गाची दुरवस्था रोखण्यासाठी काय केले? या रस्त्यावर पडलेल्या खड्डयाचेही त्यांनी श्रेय घ्यावे.

हेही वाचा: कोरोना लसीच्या बूस्टर डोसची सध्या आवश्यकता नाही - Lancet Report

आज जिल्ह्यातील अंतर्गत रस्त्यावरही चाकरमानी खड्ड्यातून फिरत असून मनसेच्यावतीने त्यांना आजपासून ‘पेनकिलर’ मोफत देण्याची योजना जाहीर करत आहे. ज्या ‘चिपी’च्या उद्‍घाटनाचा वाद सुरू आहे. त्या विमानतळाचे राणेंनी दोनवेळा भूमिपूजन केले. एकवेळ ते महसूलमंत्री तर एकदा उद्योगमंत्री होते. सुरेश प्रभूही खासदार होते. त्यावेळी या प्रकल्पाची किंमत ६ कोटी होती. सरकारने १५० रुपये दराने ९५० हेक्टर जमिन संपादीत केली. यातील विमानतळासाठी २५० हेक्टर हवी होती. उर्वरीत ६०० हेक्टर जमिनीवर पेन्सील नोंदी करून शासनाच्या माध्यमातून हपडण्याचा डाव होता.

आम्ही व शेतकऱ्यांनी त्यावेळी आवाज उठविल्यावर त्या नोंदी काढण्यात आल्या. त्यामुळे तत्कालीन खासदार व मंत्र्यांनीही काय केले, मुळ कामाची मुदत १८ महिन्यांची होती, त्यावेळी ते पुर्ण झाले नाही. त्याचेही श्रेय याच मंडळींनी घ्यायला हवे. त्यानंतर सेना भाजपा सरकार, आता तीन पक्षांचे आघाडी सरकारकडूनही कोणते प्रयत्न झाले नाहीत. तत्कालीन पालकमंत्री दिपक केसरकर यांनी तर विनापरवाना गणपती आणून जनतेला फसविले. तत्कालीन उड्डाणमंत्री सुरेश प्रभू यांनी आपल्या सोईसाठी विमान उडविले; मात्र या साऱ्यांनी जनता, जमिनदार यांच्यासाठी काय केले? आज विमानतळ सुरू होताना श्रेय घेणाऱ्या शिवसेना खासदारांनी ७ वर्षात काय केले. या साऱ्यांनीच आपण काय केले ते कागदोपत्री जाहीर करावे. केवळ केंद्रीय उड्डाणमंत्र्यांना निवेदन देऊन त्याचे फोटो काढून झाले; पण त्या निवेदनात काय होते व त्यांनी काय उत्तर दिले हे कधी पुढे आलेच नाही.``

हेही वाचा: मुलांच्या सार्वत्रिक लसीकरणाची अद्यापही शिफारस नाही - नीती आयोग

loading image
go to top