लोकप्रतिनिधींकडून मच्छीमारांची फसवणूक

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 25 मार्च 2019

मालवण - पारंपरिक मच्छीमारांना फसविण्याचे काम विद्यमान व माजी खासदारांकडून होत आहे. स्वाभिमानचे संस्थापक आणि तत्कालीन पालकमंत्री नारायण राणे यांनी गेली १५ वर्षे पर्ससीननेटच्या मासेमारीचा प्रश्‍न प्रलंबित ठेवत मच्छीमारांना देशोधडीला लावण्याचे काम केले.

मालवण - पारंपरिक मच्छीमारांना फसविण्याचे काम विद्यमान व माजी खासदारांकडून होत आहे. स्वाभिमानचे संस्थापक आणि तत्कालीन पालकमंत्री नारायण राणे यांनी गेली १५ वर्षे पर्ससीननेटच्या मासेमारीचा प्रश्‍न प्रलंबित ठेवत मच्छीमारांना देशोधडीला लावण्याचे काम केले.

सध्याच्या सत्ताधाऱ्यांनीही निवडून येण्यासाठी मच्छीमारांचा वापर केला; मात्र आता पारंपरिक मच्छीमार जो निर्णय घेतील त्याला मनसेचा पूर्णतः पाठिंबा राहील, असे मनसेचे राज्य सरचिटणीस परशुराम उपरकर यांनी आज येथे पत्रकार परिषदेत स्पष्ट केले.

रेवतळे येथील विल्सन गिरकर यांच्या निवासस्थानी झालेल्या पत्रकार परिषदेस तालुकाध्यक्ष विनोद सांडव, गणेश वाईरकर, भारती वाघ, अमित इब्रामपूरकर, विल्सन गिरकर, पास्कोल रॉड्रिक्‍स, आबा आडकर, गुरू तोडणकर, सचिन गावडे, प्रणव उपरकर आदी उपस्थित होते. 

श्री. उपरकर म्हणाले, ‘‘मागील निवडणुकीत पारंपरिक मच्छीमारांचे प्रश्‍न सोडवून त्यांना न्याय मिळवून देऊ असे सांगणाऱ्या सत्ताधाऱ्यांनी मच्छीमारांचे प्रश्‍न अधांतरीच ठेवण्याचे काम केले. जे सत्ताधारी मत्स्य व्यवसाय खात्यातील रिक्त पदे भरू शकत नाहीत ते मच्छीमारांना काय न्याय देणार? मच्छीमारांच्या प्रश्‍नांवर केवळ मंत्र्यांच्या भेटी घेत छायाचित्रे काढण्याची कामे खासदार, आमदारांनी केली; मात्र जिल्ह्याच्या किनारपट्टी भागातील एलईडी, पर्ससीननेटसह परप्रांतीय हायस्पीडद्वारे घुसखोरी सुरूच आहे. त्यामुळे सत्ताधाऱ्यांविरोधात पारंपरिक मच्छीमारांमध्ये तीव्र असंतोष पसरला आहे. त्यामुळे पारंपरिक मच्छीमारांच्या निर्णयाला मनसेचा पाठिंबा राहील.’’

तारकर्ली, देवबागसह किनारपट्टी भागात पर्यटन व्यावसायिकांनी इमारती उभारल्या. त्यामुळे त्यांनी महसूलकडून दंडात्मक कारवाईच्या नोटिसा बजावण्यात आल्या. यात आमदारांनी या उद्योजकांना दंड कमी करून आणतो असे सांगून फसवणूक केली आहे. प्रत्यक्षात यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांना कोणताही आदेश प्राप्त नसल्याची माहिती माहिती अधिकारात मिळाली आहे. 

पाडव्याच्या मेळाव्यात निवडणुकीचा पाठिंबा जाहीर
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर मनसेचा अद्यापही कोणालाही पाठिंबा नाही. आम्ही मोदी विरोधी असल्याने येत्या पाडव्याच्या मेळाव्यात पक्षप्रमुख राज ठाकरे याबाबत योग्य तो निर्णय घेतील; मात्र आमचा विद्यमान व माजी खासदारांना विरोध राहील, असे श्री. उपरकर यांनी यावेळी स्पष्ट केले.

मच्‍छीमारांना सर्वोतोपरी मदत करणार
याचबरोबर ५० मीटरचा सीआरझेडचा प्रश्‍न, मच्छीमारी वस्त्या, कोळीवाडे यांचा प्रश्‍न सुटलेला नसतानाही विद्यमान खासदार मच्छीमारांच्या समस्या दूर करू असे सांगून फसवणूक करत आहेत. शिवाय उद्योजकांना अडचणीत आणण्याचे काम करत आहेत. त्यामुळे मनसे मच्छीमार तसेच उद्योजकांच्या पाठीशी ठाम राहणार असून त्यांना योग्य तो सल्ला तसेच न्यायालयीन मदतही वरिष्ठ नेत्यांच्यामार्फत केली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Parshuram Uparkar Press