प्रवासी बोटीला देवगड बंदरात थांबा हवा

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 29 डिसेंबर 2016

देवगड - मुंबई-गोवा प्रवासी बोटसेवेच्या थांब्यामध्ये येथील देवगड बंदराचा समावेश व्हावा, अशा मागणीचे निवेदन तालुका राष्ट्रवादीतर्फे ज्येष्ठ नेते नंदकुमार घाटे यांनी तहसीलदार वनिता पाटील यांना दिले. देवगड नैसर्गिक सुरक्षित बंदर असल्याने येथील प्रवाशांनाही या बोटसेवेचा लाभ मिळावा, अशी त्यांची आग्रही मागणी आहे.

देवगड - मुंबई-गोवा प्रवासी बोटसेवेच्या थांब्यामध्ये येथील देवगड बंदराचा समावेश व्हावा, अशा मागणीचे निवेदन तालुका राष्ट्रवादीतर्फे ज्येष्ठ नेते नंदकुमार घाटे यांनी तहसीलदार वनिता पाटील यांना दिले. देवगड नैसर्गिक सुरक्षित बंदर असल्याने येथील प्रवाशांनाही या बोटसेवेचा लाभ मिळावा, अशी त्यांची आग्रही मागणी आहे.

गोवा ते मुंबई प्रवासीबोट सेवेचा पुन्हा प्रारंभ होण्याचे संकेत आहेत. या प्रवासी बोटसेवेमध्ये देवगड बंदरासाठी थांबा दिला नसल्याच्या संभाव्य पार्श्‍वभूमीवर राष्ट्रवादीतर्फे निवेदन देऊन याकडे लक्ष वेधले. येथील बंदराचा थांब्यामध्ये समावेश व्हावा, अशी त्यांची मागणी आहे. निवेदन देताना ज्येष्ठ नेते श्री. घाटे यांच्यासह तालुकाध्यक्ष रशीद खान, पंचायत समितीचे सदस्य प्रकाश गुरव, चंद्रकांत पाळेकर, दिवाकर परब, बाबी जगताप, पूनम मुणगेकर, प्रवीण वातकर, शरद शिंदे, बाबू वाळके आदी उपस्थित 
होते. या वेळी तहसीलदार पाटील यांच्याबरोबर बोटसेवेबाबत चर्चा करण्यात आली. 

निवेदनात म्हटले आहे, की मुंबईतील भाऊचा धक्का ते पणजी (गोवा) अशी प्रवासी बोट वाहतूक सुरू करण्याचा विचार असल्याचे समजते. याबाबत आवश्‍यक त्या हालचाली झाल्याचेही कळते. रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बंदरांना या प्रवासी सेवेत थांबे देण्यात आले आहेत. यामध्ये श्रीवर्धन, हर्णे, दाभोळ, जयगड, रत्नागिरी, जैतापूर, विजयदुर्ग, मालवण, वेंगुर्ला आदी बंदरांचा समावेश आहे. या बंदरांत सर्वाधिक सुरक्षित असलेले देवगड बंदर मात्र वगळण्यात आल्याचे दिसते. येथील देवगड बंदर जेटीवर मूलभूत सुविधा अंतर्गत स्वच्छतागृह, रस्ते, पिण्याचे पाणी, प्रवाशांसाठी विश्रांतीगृह आदी सुविधा नव्याने निर्माण केल्या आहेत. तसेच जेटीची उंची व रूंदीही वाढवली असल्याने प्रवासी वाहतूक सुलभ होणार आहे. यापूर्वीच्या कोकण बोटसेवेत देवगड बंदरातून सर्वाधिक प्रवासी ये-जा करीत होते.

त्यामुळे येथील स्थानिक व्यापार वाढण्यास मदत झाली होती. खराब हवामानाच्या वेळी मोठ्या बोटी देवगड बंदरातच आश्रयाला येत. जोराचे वारे व तुफानाच्या वेळी गोवा, कर्नाटक बंदरांसह रत्नागिरी, रायगड बंदरांतील मच्छीमारी बोटीही येथील बंदराच्या आश्रयाला येतात. या बंदरातून देवगड, कणकवली तालुक्‍यांसह अन्य तालुक्‍यांतील प्रवासी प्रवास करणार आहेत. त्यामुळे मुंबई ते गोवा या कोकण बोटसेवेत देवगड बंदराचा समावेश करून प्रवाशांची सोय करावी. 
 

देवगड बंदर सर्वाधिक सुरक्षित
देवगड बंदरात बोटीला थांबा मिळाल्यास पर्यटनाला चालना मिळेल. पर्यायाने व्यापार उलाढालही वाढण्यास मदत होईल. देवगड बंदर हे सर्वाधिक सुरक्षित बंदर असल्याने बोटसेवा सुरू झाल्यावर देवगड बंदराचा समावेश करावा, अशी येथील जनतेची आग्रही मागणी आहे.

Web Title: Passenger boats stop air port Deogad