प्रश्‍न उपस्थित करण्यासाठीच लेखकाने लिहावे

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 21 फेब्रुवारी 2017

कणकवली - आपण का लिहितो, कोणासाठी लिहितो? असे प्रश्‍न लेखकाला पडायलाच हवेत. ते पडत नसतील, तर त्या लिहिण्याला काहीच उपयोग नाही. कारण समाजात प्रश्‍न उपस्थित करण्यासाठी लिहायचे असते, असे मत नाटककार प्रमानंद गज्वी यांनी येथे पुणे विद्यापीठ मराठी विभागाच्या विद्यार्थ्यांशी संवाद साधताना व्यक्त केले.

कणकवली - आपण का लिहितो, कोणासाठी लिहितो? असे प्रश्‍न लेखकाला पडायलाच हवेत. ते पडत नसतील, तर त्या लिहिण्याला काहीच उपयोग नाही. कारण समाजात प्रश्‍न उपस्थित करण्यासाठी लिहायचे असते, असे मत नाटककार प्रमानंद गज्वी यांनी येथे पुणे विद्यापीठ मराठी विभागाच्या विद्यार्थ्यांशी संवाद साधताना व्यक्त केले.

शहरातील श्रीधर नाईक उद्यान येथे पुणे विद्यापीठाच्या मराठी विभागातर्फे ‘साहित्यिकांच्या गावा’ असा कार्यक्रम झाला. यात नाटककार गज्वी, कवी अजय कांडर, नाटय समीक्षक रवींद्र पाथरे यांच्याशी विद्यापीठातील विद्यार्थ्यांनी संवाद साधला. या वेळी विद्यापीठाचे मराठी विभागाचे प्रा. डॉ. प्रभाकर देसाई उपस्थित होते. 

श्री. कांडर म्हणाले, ‘‘लिहिण्या आधी भवताल समजून घेण्याची प्रक्रिया आपल्या आत चालू ठेवायला पाहिजे. आपण किती वाचतो यापेक्षा त्या वाचनातून माणसाला किती समजून घेतो, हे महत्त्वाचे असते. अनेक लोक खूप पुस्तके वाचतात, पण माणसे समजून घेत नाहीत. आपण निव्वळ माणूस म्हणून जगायला लागलो की लेखक म्हणून आपला विकास व्हायला सोपे जाते.’’ या वेळी श्री. कांडर यांनी आपल्या काही कवितांचेही वाचन केले. 

श्री. पाथरे म्हणाले, ‘‘मी समीक्षा लेखन करताना इतरांच्याही समीक्षा लेखनाचा अभ्यास करत असतो. कमलाकर नाडकर्णी, माधव वझे हे नाट्य समिक्षा करताना कोणता विचार करतात याचाही त्यावेळी मी अभ्यास करायचो. ज्या प्रकारचे लेखन करतो त्याचा व्यासंगही महत्वाचा असतो.’’

या वेळी सहभागी विद्यार्थ्यांनी प्रेमानंद गज्वी, अजय कांडर यांच्या लेखनावर आपले विचार व्यक्‍त केले. गज्वींचे ‘किरवंत’ नाटक वाचून आपणाला समाजातील शोषण व्यवस्थेबाबतचा धक्‍का बसला, तर कांडर यांची ‘आवानओल’ मधील कविता वाचून त्यांना भेटण्याची इच्छा झाल्याचे विद्यार्थ्यांनी सांगितले.

लेखकाला त्याच्या लेखननिर्मितीबाबत सजग भान असले पाहिजे. लेखकाच्या जगण्याच्या आणि लिहिण्याच्या बंडखोरीतूनच साहित्य लेखनाची नवनिर्मिती होत असते. यामुळे नव्याने लिहू पाहणाऱ्या लेखकांनी स्वतःचे लेखन तपासत पुढील लेखन केले पाहिजे. कलेसाठी कला की जीवनासाठी कला, असा प्रश्‍न उपस्थित केला जातो. हा वाद खूप जुनाही आहे, पण ज्ञानासाठी कला असते. कारण ज्ञानातूनच कोणत्याही समाजाचा विकास होत असतो.

- प्रेमानंद गज्वी, नाटककार

Web Title: Playwright pramananda gajvi