कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर लागू केलेल्या मनाई आदेशाचा त्यांनी केला भंग अन्....

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 22 मार्च 2020

  • जनता कर्फ्युला उत्स्फूर्त प्रतिसाद
  • 330 जणांचे घरच्या घरीच विलगीकरण
  • खेडात चार तर दापोली दोन गुन्हे दाखल

रत्नागिरी - कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर लागू केलेल्या मनाई आदेशाचा भंग करणाऱ्यांविरोधात कडक पवित्रा पोलिसांनी घेतला आहे. मिरकरवाडा येथे मशिदीपुढे जमाव करणाऱ्या 18 जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. तसेच दापोली, खेडमध्ये पाच व्यावसायिक आणि एका अफवा पसरवणाऱ्या व्यक्‍तींवर गुन्हा दाखल झाला आहे. जिल्ह्यात कोरोनासदृश्‍य एकही नवीन रुग्ण दाखल झाला नसून सध्या जिल्हा शासकीय रुग्णालयात एका पॉझिटिव्ह रुग्णासह नऊ संशयितांवर उपचार सुरू आहेत. परदेशासह परजिल्ह्यातून आलेल्या 330 जणांना स्वतःच्याच घरात विलगीकरणासाठी ठेवण्यात आले आहे.

दरम्यान, जिल्ह्यात आज जनता कर्फ्यूला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. कुठेही अनिचित प्रकार घडलेला नाही. नागरिक, व्यापारी, वाहनधारकांनी उत्स्फूर्त बंद पाळला.

जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार जिल्ह्यात मनाई आदेश लागू आहेत. सभा, मेळावे, सामाजिक कार्य, जत्रा, उरुस, धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रम, क्रीडा स्पर्धा आदी धार्मिक व सामाजिक कार्यक्रमांवर 31 मार्चपर्यंत बंदी आहे. हे आदेश सर्व धार्मिक स्थळांना दिले आहेत. तरीही रविवारी (ता. 22) सकाळी 9 वाजता मिरकरवाडा खडप मोहल्ला येथील मशिदीजवळ पेट्रोलिंग करणाऱ्या पोलिसांना जमाव आढळून आला. शब्बीर इब्राहीम राजपुरकर (वय 54 रा. मिरकरवाडा), हाफिस सईद होडेकर (वय 62), सुलेमान बाबामियॉं मुल्ला (वय 64, रा. कोकणनगर) यांच्यासह इतर 18 जणं बेकायदेशीर जमाव करुन उभे होते. त्यांच्यावर कडक कारवाई करत गुन्हे दाखल केले आहेत.

जिल्ह्यात अन्यत्र दापोली बाजारपेठेतील एक व हर्णैमधील एका व्यापाऱ्याविरोधात गुन्हा झाला आहे. खेडमध्ये चार जणांच्या विरोधात गुन्हा दाखल आहेत. त्यात खेड रेल्वे स्थानकाजवळील एक हॉटेल व्यावसायिक, शहरातील महाडनाका येथील एक कॅफे चालक यासह भरणे नाका परिसरातील चिकन सेंटरचा समावेश आहे. तसेच कोरोना बद्दल अफवा पसरवणाऱ्या एका व्यक्तीवर कारवाई केली आहे. या प्रकरणी अधिक तपास खेड पोलिस ठाण्याच्या पोलिस निरीक्षक सुवर्णा पत्की करत आहेत. दरम्यान, जिल्ह्यात नवीन संशयित रुग्ण दाखल होण्याचे प्रमाण घटले आहे. रविवारी एकही रुग्ण दाखल झाला नसल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले. सिव्हीलमध्ये सध्या नऊजणं उपचार घेऊन असून आतापर्यंत दहा संशयितांना उपचाराअंती घरी सोडण्यात आल्याचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. बोल्डे यांनी सांगितले.

मच्छीमारी ठप्प

जनता कर्फ्यूमध्ये जिल्ह्यातील मच्छीमारही सहभागी झाले होते. गेले काही दिवस मच्छीमारांनीही समुद्रात जाणे टाळले आहे. त्यामुळे जिल्ह्यातील हजारो नौका त्या-त्या बंदरांमध्ये नांगर टाकून उभ्या करण्यात आल्या आहेत. कोट्यावधी रुपयांची उलाढाल थांबली आहे. नौकांवरील खलाशीही आपापल्या झोपड्यांमध्ये विसावलेले आहे. दररोज गजबलेले हर्णै व मिरकरवाडा बंदरातही शुकशुकाट पाहायला मिळाला.  

 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Police have taken a strict stance against who violated the prohibition order imposed on Corona