अठरा तास ड्यूटीरुन यंदा खाकीला मिळाली थोडीशी उसंत

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 2 September 2020

दहा दिवसांत कडेकोट पोलिस बंदोबस्त आणि विसर्जन मिरवणुका शांततेत पार पाडण्यासाठी पोलिस अठरा-अठरा तास ड्यूटीवर असतात.

चिपळूण : गणेशोत्सवात कायदा-सुव्यवस्था कायम राखण्याचे मोठे आव्हान पोलिसांपुढे असते. दहा दिवसांत कडेकोट पोलिस बंदोबस्त आणि विसर्जन मिरवणुका शांततेत पार पाडण्यासाठी पोलिस अठरा-अठरा तास ड्यूटीवर असतात. सुट्ट्याही रद्द केल्या जातात; मात्र यावर्षी कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर चिपळुणातील गणेशोत्सव साध्या पद्धतीने झाल्याने पोलिसांना काहीशी उसंत मिळाली आहे. 

हेही वाचा - महाराष्ट्रात असंही एक गाव आहे; या गावात कधीच विकला जात नाही चहा...

गणेशोत्सव काळात मोठ्या प्रमाणावर चाकरमानी महामार्गाद्वारे गावी येतात. त्यांच्या सुरक्षित प्रवासासाठी जागोजागी पोलीस तैनात केले जातात. कुठेही कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्‍न होऊ नये, याची जबाबदारी पोलिसांवर असते. यासाठी अगोदरपासूनच पोलिसांकडून तयारी केली जाते. वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून कार्यकर्त्यांच्या बैठका घेत त्यांना मार्गदर्शन करण्यासह उत्सव शांततेत साजरा करण्याबाबत सूचनाही केल्या जातात. 

उत्सव काळात दररोज मंडळांना वेळोवेळी भेट देणे तेथील व्यवस्थेची तपासणी करणे, महत्त्वाच्या ठिकाणी कडेकोट बंदोबस्त तैनात ठेवणे, संशयित व्यक्तींवर नजर ठेवत नाकाबंदी, कोंम्बिंग ऑपरेशन राबवणे, रूट मार्च यासह रेकॉर्डवरील गुन्हेगार प्रतिबंधात्मक कारवाई केली जाते. विसर्जन मिरवणुका शांततेत पार पाडण्याचेही मोठे आव्हान पोलिसांपुढे असते. अनेकदा सलग अठरा तास पोलिस कर्तव्यावर हजर असल्याचे दिसून येते. या उत्सव काळात पोलिसांच्या साप्ताहिक सुट्ट्या, रजाही रद्द केल्या जातात. मात्र यावर्षी उत्सव साध्या पद्धतीने झाला. पोलीसांवरील कामाचा भार काहीसा हलका झाला आहे. 

हेही वाचा - या गावात दगड वापरायला बंदी आहे ! गावात दगडी बांधकाम केलेले घर औषधालाही नाही सापडणार...

"गेली सहा महिने पोलिस रस्त्यावर लोकांच्या सुरक्षिततेसाठी राबत आहेत. आता पोलिसांनाच कोरोनाची लागण होत आहे. कर्मचारी संख्या कमी होत असल्याने, आहे त्या कर्मचाऱ्यांकडून काम करून घेणे अवघड होत आहे." 

- नवनाथ ढवळे, उपविभागीय पोलिस अधिकारी, चिपळूण  

 

संपादन - स्नेहल कदम 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: police officers rest for this year in ganesh festival rally causes corona