खेर्डीत तटस्थ राहूनच ताकद दाखविणार - राष्ट्रवादी

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 17 मार्च 2017

चिपळूण - चिपळूण पंचायत समिती निवडणुकीत राष्ट्रवादीत खेर्डी गणात बंडाळी झाली होती. सत्ताधाऱ्यांविरोधात दंड थोपटणाऱ्या सर्व पदाधिकाऱ्यांनी यापुढेही तटस्थ राहण्याची भूमिका घेतली आहे. खेर्डीत वॉर्डनिहाय संघटना अधिक मजबूत करून यापुढेही लढा देण्याचा निर्णय कार्यकर्ता बैठकीत घेतला. निवडणुकीत उमेदवारीत डावलल्याने राष्ट्रवादीतील नाराज गटाने माजी सरपंच प्रशांत यादव यांना अपक्ष म्हणून रिंगणात उतरवले होते; मात्र त्यांना अल्प मतांनी पराभव पत्करावा लागला. 

निवडणुकीवर चिंतन तसेच आगामी वाटचाल स्पष्ट करण्यासाठी प्रशांत यादव व सहकाऱ्यांनी कार्यकर्त्यांची बैठक घेतली. पराभवानंतरही कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली होती. खेर्डीतील राष्ट्रवादीच्या गटात यापुढेही सामील न होण्याचा निर्णय घेण्यात आला. खेर्डीतील प्रत्येक प्रभागातून प्रशांत यादव यांना चांगली मते मिळाली. ज्यांनी सुरवातीस लढण्यासाठी बळ दिले, त्यांनीच शेवटच्या क्षणी घात केला. यापुढे सर्व प्रभागातील नागरिक व युवकांशी संवाद साधून पुढील निर्णय घेण्याचे ठरले. खेर्डीच्या विकासाचा मास्टर प्लॅन तयार आहे. नागरिकांना विश्‍वासात घेत वाटचाल सुरू ठेवण्यात येईल. 

कोणावरही टीका-टिप्पणी न करता सामाजिक बांधिलकी व खेर्डीच्या विकासावर भर देण्यात येईल. त्यामुळेच कोणताही पक्ष पाठीशी नसतानाही थोडक्‍यात पराभव पत्करावा लागला. पराभवाने खचून न जाता यापुढे अधिक जोमाने लढण्याचा कार्यकर्त्यांनी आग्रह धरला. राष्ट्रवादीत पुन्हा परतणे शक्‍य नाही.

शिवसेनेत न जाता तटस्थ राहूनच वाटचाल करण्याचा निर्णय घेण्यात आला. बैठकीला उपसरपंच प्रकाश साळवी, माजी सरपंच प्रशांत यादव, सुनील मेस्त्री, रवींद्र फाळके, युवा नेते विनोद भूरण, उद्योजक अनिल मेस्त्री आदी उपस्थित होते.

Web Title: politics in kherdi