रत्नागिरीत सहाय्यक वनसंरक्षक पदी चिपळूणच्या परिक्षेत्र वनाधिकारी सचिन निलख यांची नियुक्ती

मुझफ्फर खान
Sunday, 25 October 2020

रत्नागिरी जिल्हा वन विभागात सहाय्यक वनसंरक्षक (प्रादेशिक) हे पद निर्माण करण्यात आले आहे.

चिपळूण (रत्नागिरी) : रत्नागिरी जिल्हा वन विभागात सहाय्यक वनसंरक्षक (प्रादेशिक) हे पद निर्माण करण्यात आले आहे. चिपळूणचे परिक्षेत्र वनाधिकारी सचिन निलख यांना सहाय्यक वनसंरक्षक म्हणून बढती मिळाल्याने त्यांची या पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. राज्य सरकारने बीड, सातारा आणि चिपळूण येथील विभागीय वनाधिकारी कार्यालयातील सहाय्यक वनसंरक्षक पदाच्या नेमणूका केल्या आहेत.

सहाय्यक वन संरक्षक अधिकारी हा परिक्षेत्र वनाधिकारी आणि विभागीय वनाधिकारी यांच्यातील दुवा समजला जातो. वन्य जीव संरक्षण अधिनियम 1972 व भारतीय वन अधिनियम 1927 अंतर्गत तपासाचे अधिकार सहाय्यक वन संरक्षक यांना प्रदान करण्यात आले आहेत. रत्नागिरी वनविभागामध्ये सहाय्यक वनसंरक्षक हे पद नसल्याने अनेक प्रकारच्या गैरसोयी होत होत्या. विभागीय वनाधिकारी यांना विभागीय चौकशीसाठी हजर रहावे लागत होते. विभागीय कार्यालयामधील विविध सभा, वन गुन्हे, न्यायालयातील प्रकरणात स्वत: उपस्थित राहावे लागत होते.

हेही वाचा- कणकवलीतील पोस्ट स्थलांतराचा मुद्दा ऐरणीवर -

वनसंरक्षणाच्या व वनसंर्वधानाच्या कामकाजामध्ये त्यांना अतिरिक्त लक्ष केंद्रीत करताना मर्यादा येत होत्या. क्षेत्रीय अधिकारी व कर्मचारी यांचे कामाची तपासणी करण्यासाठी व कार्यालयीन कर्मचारी यांचे कामकाजावर नियंत्रण ठेवणे, कार्य आयोजनेनुसार कामाचे व्यवस्थापन करताना मर्यादा येत होत्या. वन गुन्ह्याच्या तपासात अनेक प्रकारच्या अडचणी येत होत्या. त्यामुळे चिपळूण येथे सहाय्यक वनसंरक्षक पद निर्माण करण्याचा प्रस्ताव शासनाकडे मांडण्यात आला होता. याला शासनाकडून मंजूरी मिळाली आहे. हे पद निर्माण झाल्यामुळे वन विभागातील प्रशासकीय कामाला गती येणार आहे.  वन गुन्ह्याचा तपास करणे सोयीचे होईल. त्यासाठी तपास अधिकारी म्हणुन अधिकार प्राप्त आहेत. वन्यप्राणी मुळे झलेली नुकसान भरपाई शेतकर्‍याने लवकरात लवकर देणे सोयीचे होईल. 

चिपळूणला परिक्षेत्र वनाधिकारी म्हणून काम करणारे सचिन निलख यांना सहाय्यक वनसंरक्षक म्हणून बढती मिळाली आहे. रत्नागिरी जिल्ह्यासाठी सहाय्यक वनसंरक्षक हे पद मंजूर झाल्यानंतर त्याठिकाणी निलख यांची नेमणूक करण्यात आली. विभागीय वनाधिकारी श्री. खाडे, चिपळूणचे प्रांताधिकारी प्रविण पवार, तहसीलदार जयराज सुर्यवंशी आदींनी त्यांचे अभिनंदन केले. 

संपादन - अर्चना बनगे

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: post of Assistant Forest Conservator created in Ratnagiri District Forest Department