वाढत्या उकाड्यामुळे पोल्ट्री उद्योग संकटात

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 18 एप्रिल 2017

सावर्डे - उन्हाच्या वाढत्या पाऱ्यामुळे माणसाला जगणं मुश्‍कील होत असताना कोंबड्याही होरपळून निघत आहेत. उन्हाळा तीव्र होत चालला असून याचा परिणाम प्राणी व पक्ष्यांवर होत आहे. चिपळूण तालुक्‍यात गेल्या १५ दिवसांत तापमान वाढत आहे. त्यामुळे आठवडाभरापासून उष्माघाताने मोठ्या प्रमाणात कोंबड्यांच्या मृत्यूमुळे तालुक्‍यातील पोल्ट्री उद्योगावर संकट उभे राहिले आहे. 

सावर्डे - उन्हाच्या वाढत्या पाऱ्यामुळे माणसाला जगणं मुश्‍कील होत असताना कोंबड्याही होरपळून निघत आहेत. उन्हाळा तीव्र होत चालला असून याचा परिणाम प्राणी व पक्ष्यांवर होत आहे. चिपळूण तालुक्‍यात गेल्या १५ दिवसांत तापमान वाढत आहे. त्यामुळे आठवडाभरापासून उष्माघाताने मोठ्या प्रमाणात कोंबड्यांच्या मृत्यूमुळे तालुक्‍यातील पोल्ट्री उद्योगावर संकट उभे राहिले आहे. 

मिरजोळीपाठोपाठ आबिटगाव, नायशी येथे पोल्ट्रीधारकांच्या पोल्ट्रीतील काही पक्षी उष्माघाताने मृत्युमुखी पडले आहेत. सध्या पोल्ट्री व्यावयायिकांकडून कोंबड्या वाचविण्यासाठी अनेक प्रयोग केले जात आहेत. तरीही पोल्ट्री उद्योजकांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. कोंबड्या साधारणतः ३७ ते ३८ डिग्री तापमानाला राहू शकतात. १६० फॅरेन डिग्री तापमान हे कोंबड्यांचे सर्वसाधारण तापमान असते. त्यामध्ये उन्ह्याळ्याच्या दिवसात वाढ होत असल्याने कोंबड्या मृत होण्याचे प्रमाण वाढते. शरीरात पाणी कमी झाल्याने कोंबड्यांना श्‍वास घ्यायला त्रास होतो. त्याचप्रमाणे सध्या वाढत्या तापमानामुळे कोंबड्या दगावत आहेत. कोंबड्यामध्ये घाम निघण्याकरिता ग्रंथी नसतात. त्याच्यामुळे त्या अतिउष्णता सहन करू शकत नाहीत. स्वतःच्या शरीराला थंड ठेवण्यासाठी कोंबड्या जोरजोराने श्‍वास घेतात, दम टाकतात, पंख पसरतात. तापमान खूप जास्त वाढल्यावर कोंबड्यांच्या श्‍वास घेण्याच्या क्रियेमुळे रक्तामधील पाण्याची मात्रा कमी होते. जोराने श्‍वास घेतल्यामुळेत्यांच्या हृदयाची गती वाढून लहान वाहिन्या फुटून त्यांचा मृत्यू होतो. मिरजोळी येथील एका पोल्ट्रीधारकाच्या २०० कोंबड्या दगावल्या, तसेच तालुक्‍यातील बऱ्याच पोल्ट्रीधारकांच्या सुमारे ३० ते ४० कोंबड्या दगावल्या आहेत. 

डेरवण येथील शशिकांत टोपरे यांच्याकडे ७ हजार पक्षी आहेत. त्यांच्या खालोखोल नायशी, डेरवण, आबिटगाव, आकले, आलोरे, सावर्डे, कालुस्ते या गावात मोठ्या प्रमाणात पोल्ट्री व्यवसाय असून येथील व्यावसायिक उकाड्यापासून पक्ष्यांना वाचविण्यासाठी प्रयत्न करीत आहेत.

कोंबड्यांच्या मृत्यूची संख्या पाहता उष्माघातापासून कोंबड्यांचा बचाव करण्यासाठी उपाय शोधण्याची गरज आहे. त्यासाठी वाढत्या उष्णतेत कोंबड्यांना पाणी आणि कूलर आवश्‍यक आहे. कोंबड्यांपर्यंत थेट उन्हाची किरणे पोचणार नाहीत, यासाठी उन्हापासून रक्षण करणारी जाळी बसविणे गरजेचे आहे. पोल्ट्री शेडवर बारदाने, भाताचा पेंडा पांघरणे आवश्‍यक आहे. पत्र्यांना चुना लावावा. भोवताली बारदान उभे बांधून वेळावेळाने त्यावर पाण्याचा फवारा मारावा. कोंबड्यांना दिवसातून पाच ते सात वेळा इलेक्‍ट्रॉल किंवा ग्लूकॉन डी मिश्रित पाणी आवश्‍यक आहे. पक्षी ३५ दिवसानंतर विक्रीस काढावा. पोल्ट्रीधारकांनी वाढत्या उन्हामुळे पक्षी खरेदी करणे कमी करावे.
- अशोक सकपाळ, पशुधन विकास अधिकारी, चिपळूण

Web Title: Poultry industry in trouble for summer