रत्नागिरीत मान्सूनपूर्व पावसाची जोरदार हजेरी 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 31 मे 2020

रविवारी दिवसभर ढगाळ वातारण होते. सायंकाळी 5 वाजण्याच्या सुमारास रत्नागिरी शहर आणि परिसरात हलकासा पाऊस झाला.

रत्नागिरी - हवामान विभागाच्या अंदाजानुसार अरबी समुद्रात एकाचवेळी दोन चक्रीवादळे तयार झाली असून त्याचा प्रभाव कोकण किनारपट्टीवर जाणवत आहे. सायंकाळी खेड, चिपळूण, संगमेश्‍वर, रत्नागिरीत वेगवान वार्‍यासह मान्सूनपूर्व पावसाने दमदार हजेरी लावली. त्यामुळे काहीकाळ हवेत गारवा निर्माण झाला होता.

अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण होत होता. त्यामुळे निर्माण झालेल्या दोनपैकी एक चक्रीवादळ आफ्रिका खंडाच्या दिशेने पुढे गेले असून ते ओमेनकडे सरकणार आहे. दुसर्‍या चक्रीवादळाचा परिणाम भारतीय किनारपट्टीवर होण्याची शक्यता होती. ते चक्रीवादळ भारतीय किनार्‍यापासून जवळ असून त्याचा प्रभाव 3 जूनपर्यंत राहील असा अंदाज आहे. सध्याची त्या वादळाची दिशा गुजरातच्या दिशेने आहे. 

हे पण वाचा - अखेर तोडगा निघाला; कोरोना मृतांचे अंत्यसंस्कार रत्नागिरीतच होणार

कमी दाबाच्या पट्ट्यामुळे रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यात ठिकठिकाणी पावसाने हजेरी लावली. गेले चार दिवस हवेत प्रचंड उष्मा होता. पारा 36 अंशावर चढला होता. त्यामुळे पाऊस पडेल असा अंदाज वर्तविला जाता होता. रविवारी दिवसभर ढगाळ वातारण होते. सायंकाळी 5 वाजण्याच्या सुमारास रत्नागिरी शहर आणि परिसरात हलकासा पाऊस झाला. किनारपट्टी भागात वारेही वाहत होते. 

हे पण वाचा - ब्रेकिंग - रत्नागिरीत आणखी 14 जणांना कोरोणाची लागण 
 

चिपळुणात दुपारी पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या. दिवसभर ढगाळ वातावरण होते. दुपारनंतर ढगांचा गडगडात सुरू झाला. दुपारी साडेतीन वाजता पावसाची रिपरिप सुरू झाली. हलक्या सरी कोसळल्या. त्यामुळे हवेतही गारवा निर्माण झाला. चार वाजेपर्यंत पावसाची अधूनमधून रिपरिप सुरू होती. तालुक्यात काही ठिकाणी ढगांचा गडगडाट झाला. त्यामुळे उन्हाने त्रस्त झालेले नागरिक सुखावले. कोरोनामुळे त्रस्त झालेले संगमेश्‍वर तालुक्यातील नागरिक वाढत्या उष्म्याने हवालदिल झाले होते. रविवारी संध्याकाळी पडलेल्या पावसाने नागरिकांना दिलासा मिळाला. संगमेश्वर तालुक्यात एक तास मुसळधार पाऊस झाला. रविवारी दुपारनंतर अचानक वातावरणात बदल झाला आणि चार वाजता ढगांचा कडकडाट होऊन मुसळधार पाऊस सुरू झाला. अचानक आलेल्या या पावसाने देवरूख बाजारपेठेत नागरिकांची व व्यापारी वर्गाची चांगलीच धावपळ उडाली. कोरोनाचा प्रभाव असूनही रविवारी देवरूख बाजारपेठेत गर्दी होती. त्यातच पावसाने हजेरी लावल्याने सर्वांची गडबड उडाली. तेथील माती रस्त्यावर आल्यामुळे वाहतुकीची कोंडी झाली होती. संगमेश्‍वरात सुमारे एक तास पाऊस सुरू होता. टाळेबंदीत त्रस्त झालेल्या बालमित्रांनी पावसाचा मनमुराद आंनद घेतला. खेड तालुक्यात मुसळधार पाऊस सुरू होता. त्यामुळे नागरिकांची तारांबळ उडाली होती.

धूळ पेरण्यांना फायदा

संगमेश्वर तालुक्यासह जिल्ह्यात काही भागात शेतकर्‍यांनी रोहिणी नक्षत्र लागल्यानंतर भाताच्या पेरण्या उरकून घेतल्या आहेत. त्यांना या पावसाचा फायदा होणार आहे. टाळेबंदीत शेतकरी वर्ग शेतीच्या कामात गुंतला आहे. पावसामुळे वीजपुरवठा खंडित केला होता.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: pre monsoon rain in ratnagiri