निरवडेत मायनिंग वाहतूक रोखली 

रुपेश हिराप
Sunday, 6 December 2020

गेल्या दोन दिवसांपासून कळणे-बांदा-सावंतवाडी-मळगाव ते निरवडे-मळेवाड-आरोंदा-रेडी या मार्गावर डंपरने मायनिंगची वाहतूक सुरू झाली आहे.

सावंतवाडी (सिंधुदुर्ग) - कळणे मायनिंग वाहतूक दोन दिवसांपासून जोरदार सुरू झाली आहे. वाहतूक करणारे डंपर रस्त्यावर सुसाट धावत आहेत. प्रशासनाकडून घालून देण्यात आलेली नियमावली डंपर चालकाकडून पाळण्यात येत नसल्याने रेडी ते दोडामार्ग या रस्त्यावरील वाहनचालक, पादचाऱ्यांमध्ये भीती आहे. प्रशासनाकडून यासाठी पुन्हा एकदा निर्णय घेणे गरजेचे आहे. 

अशाच प्रकारे नियम डावलून भरधाव धावणाऱ्या डंपरमधील मायनिंग माती निरवडे झरबाजार येथे रस्त्यावर पडल्याने संतप्त ग्रामस्थांनी मायनिंग वाहतूक रोखत रस्ता रोको केला. अखेर तोडगा निघाल्याने वाहतूक सुरळीत झाली. गेल्या दोन दिवसांपासून कळणे-बांदा-सावंतवाडी-मळगाव ते निरवडे-मळेवाड-आरोंदा-रेडी या मार्गावर डंपरने मायनिंगची वाहतूक सुरू झाली आहे. कळणे येथील मायनिंग रेडी पोर्टला नेऊन घातल्यानंतर पुन्हा एकदा रेडी पोर्टवरून कळणे येथे मायनिंग भरण्यासाठी डंपर वाहतूक सुरू असते.

दरवर्षी मायनिंग वाहतुकीवरून डंपर अडवणे तसेच अपघात असे प्रकार सुरू असतात. ग्रामस्थांवर भीतीची टांगती तलवार ही कायमच असते. त्यामुळे याला कुठेतरी आळा बसावा, यासाठी प्रशासनाकडून मायनिंग कंपनीला नियमावली घालून देताना ओव्हरटेक न करणे, दोन डंपर मध्ये 100 मीटरचे अंतर ठेवणे, हौद्यावर ताडपत्री सुस्थितीत घालणे, वेगमर्यादा कमी ठेवणे, शाळा सुटण्याच्या व भरण्याच्या वेळी शाळेच्या ठिकाणी वेग कमी ठेवणे तसेच ठिकाणी सुरक्षारक्षक नियुक्‍त करणे असे नियम नमूद केले होते; मात्र आजच्या परिस्थितीत यातील एकही नियम डंपर चालकाकडून पाळण्यात येत नसल्याचे चित्र आहे. याविरूध्दच्या संतापाचा उद्रेक निरवडेत झाला.

सुसाट डंपरला गतिरोधकाचा अंदाज न आल्याने डंपरमधील मायनिंगची माती रस्त्यावर पडली. यामुळे या रस्त्यालगत असलेली दुकाने व घरे यांना या धुळीचा त्रास होत होता. यामुळे निरवडे झरबाजार येथील ग्रामस्थांनी आक्रमक होत डंपर वाहतूक रोखून धरली. यावेळी मायनिंग कंपनीकडून ग्रामस्थांशी चर्चा केल्यानंतर तात्काळ माती उचलावी तसेच भरधाव येणाऱ्या डंपरची वेग कमी करावा, अशी मागणी ग्रामस्थांनी केली. कंपनीकडून ग्रामस्थांच्या दोन्ही मागण्या मान्य करत पडलेली माती उचलण्याची कार्यवाही सुरू केली. यामुळे निरवडे बाजार ग्रामस्थांनी रोखलेली डंपर वाहतूक पूर्ववत केली. 

याशिवाय आजच्या स्थितीत मळगाव बॉक्‍सेल व मळगाव वेंगुर्ला तिठा याठिकाणी दोनच सुरक्षारक्षक तैनात केले आहेत; मात्र इतर ठिकाणी कुठेही सुरक्षारक्षक नसल्याने अपघात होण्याची दाट शक्‍यता आहे. शिवाय त्यामुळे मोक्‍याच्या ठिकाणी सुरक्षारक्षक तात्काळ नेमण्यात यावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे. 

अरूंद रस्त्याने वाहतूक 
मायनिंग वाहतूक करणाऱ्यांना वाहतुकीचा रस्ता ठरवून दिला आहे; मात्र असे असतानाही मायनिंगला प्रथम नंबर मिळावा, यासाठी जीवघेणी स्पर्धा डंपर चालकांमध्ये सुरू असते. यासाठी अरुंद रस्त्याने डंपरची वाहतूक केली जाते. या ठिकाणी अपघात होण्याची दाट शक्‍यता असते. अशी चोरटी डंपर वाहतूक रोखावी, अशी मागणीही आहे. अन्यथा मधल्या वाटेने होणारी वाहतूक रोखण्याच्या इशाराही ग्रामस्थांनी दिला आहे. 

मळगावात बाजारपेठेत कोंडी 
डंपर सरकारकडून एका डंपर मागे ठरलेल्या अंतर आखण्यात येत नसल्याने मळगाव बाजारपेठेमध्ये आज तब्बल 15 ते 20 मिनिटे वाहतूक कोंडी निर्माण झाली होती. एकामागून एक लागून डंपर असल्याने समोरून येणाऱ्या गाड्यांना साईड मिळत असल्याने या ठिकाणी वाहतूक कोंडी होते. याबाबत वेळोवेळी ग्रामस्थांकडून आवाज उठवण्यात आला असला तरी डंपर चालकांकडून दुर्लक्ष होत आहे. 

संपादन - राहुल पाटील


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: prevented mining traffic nirvade konkan sindhudurg