कणकवलीत भाजप आणि स्वाभिमानमध्ये राडा

तुषार सावंत
बुधवार, 5 डिसेंबर 2018

भाजपचे माजी नगराध्यक्षसंदेश पारकर समर्थक आणि स्वाभिमान पक्षाचे नगराध्यक्ष समीर नलावडे समर्थक यांच्यात आज (बुधवार) दुपारी जोरदार हाणामारी झाली.

कणकवली - नगरपंचायतीच्या निवडणुकीतील पराभवाचे कारण पुढे करून कणकवली महाविद्यालयातील विद्यार्थांना आज मारहाण करण्यात आली. अकरावी विज्ञान शाखेत शिकत असलेल्या आंब्रड येथील जीवन राणे आणि त्याच्याच वर्गातील सहकाऱ्यांना महाविद्यालयाच्या आवारात आज सकाळी साडेअकराच्या सुमारास मारहाण झाली होती.

या मारहाणीनंतर जीवन राणे आणि सहकाऱ्यांनी शहरातील स्वाभिमान पक्षाच्या कार्यकर्त्यांना ही माहिती दिली. त्यानंतर नगराध्यक्ष समीर नलावडेसह त्यांचे नगरसेवक तसेच स्वाभिमान पक्षाचे प्रमुख कार्यकर्ते रस्त्यावर उतरले. काही तरुणांनी लाठी काठी घेऊन संदेश पारकर यांच्या घरासमोरील चार मोटरसायकलींचे नुकसान केले. यामुळे तणाव वाढला. 

भाजप आणि स्वाभिमान पक्षाच्या युवा कार्यकर्त्यामध्ये जोरदार हाणामारी झाली. भर बाजारपेठेत गाड्यांची तोडफोड करण्यात आली. हा वाद एवढ्यावरच थांबलेला नाही. दुपारी एकच्या सुमारास स्वाभिमान पक्षाचे कार्यकर्ते कणकवली पोलिस ठाण्यात तक्रार देण्यासाठी गेले. काही काळ चर्चा झाल्यानंतर भाजपच्या एका गटाने नगरपंचायत कार्यालयासमोर गर्दी केली. ही माहिती मिळताच स्वाभिमानचे कार्यकर्ते पुन्हा शहरात धावून आले. घटनास्थळी पोलिस निरीक्षक शिवाजी कोळी हजर असून नगरपंचायत, मुख्यबाजारपेठ, संदेश पारकर यांचे निवासस्थान येथे मोठा पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. 

Web Title: problem in BJP and Swabhiman party In Kankavali