कणकवली, वैभववाडीतील बीएसएनएल टॉवर बंद 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 10 जून 2019

कणकवली - आचरा येथे ओएफसी केबल ब्रेक झाल्याने गेले दोन दिवस कणकवली उपविभागातील सर्व टेलिफोन एक्‍सेंज स्वीच ऑफ आहेत. शहरातील ओएफसी तुटल्याने सर्व लॅण्डलाईन डेड आहेत.

कणकवली - आचरा येथे ओएफसी केबल ब्रेक झाल्याने गेले दोन दिवस कणकवली उपविभागातील सर्व टेलिफोन एक्‍सेंज स्वीच ऑफ आहेत. शहरातील ओएफसी तुटल्याने सर्व लॅण्डलाईन डेड आहेत.

चौपदरीकरणात दिलीप बिल्डकॉन कंपनीचा मुजोरपणाचे मोठे नुकसान भारत दुरसंचार निगमसह सर्वसामान्य नागरिक व व्यावसायिकांचे होत आहे. कणकवली व वैभववाडी तालुक्‍यातील बीएसएनएलचे सर्व टॉवर बंद आहेत.  मुंबई - गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणात कणकवली शहरातील बीएसएनएल लॅण्डलाईनचा बोजवारा उडाला आहे.

महामार्गालगतची केबल एक महिन्यापूर्वी तोडली आहे. त्यामुळे स्टेट बॅंक ऑफ इंडिया ते जानवलीपर्यंत सर्व लॅण्डलाईन गेले महिनाभर बंद आहेत. चौपदरीकरणात सर्व्हिस रोडलगत केबल टाकण्यास परवानगी दिली जात नाही. त्यामुळे बीएसएनएल हतबल आहे. परिणामी सरकारी व खाजगी बॅंकेचे व्यवहार ठप्प झाले होते.

खाजगी बॅंकांनी खाजगी केबलचा आधार घेतला. रस्ता रूंदीकरणात ऍड. उमेश सावंत यांच्या निवासस्थानासमोरील नाल्याचे काम ऐन पावसाळ्यापूर्वी सुरू झाले. त्यामुळे शनिवारी या नाल्यालगतची केबल तोडली गेली. त्यामुळे तहसील कार्यालय, महागामार्ग परिसर, शिवाजीनगर, नरडवे रोड, रेल्वेस्थानकपासून पुढे हरकुळखुर्द टेलिफोन एक्‍सेंज, सांगवे, नरडवे, फोंडाघाट व वैभववाडीपर्यंत सर्व नेटवर्क व लॅण्डलाईन सेवा ठप्प झाली आहे. 

खाजगी टॉवरची सेवा सुरू 
बीएसएनएल केबल रस्त्यालगत टाकली होती. किंबहुना ही केबल एक ते दोन फूट खोल मातीत गाडली आहे. त्यामुळे गेली दोन वर्षे बीएसएनएल केबल तुटल्या जात आहेत. या तुलनेत खाजगी कंपनीचे टॉवर सुरू आहेत. या कंपन्यांची केबल अजूनही सुरक्षित आहे. खाजगी कंपन्यांच्या केबलवर नजर ठेवण्यासाठी त्यांची पथके कार्यरत आहेत. 

पुणे येथून मागविली केबल 
शहरातील केबल पूर्ण निकामी झाली आहे. त्यामुळे नवी केबल टाकणे आवश्‍यक आहे. मात्र, ही केबल टाकण्यासाठी महामार्गाची परवानगी मिळत नाही. पर्याय म्हणून बाहेरून केबल जोडली जाईल. पुणे येथून केबल प्राप्त झाल्यावर काम सुरू होईल, असे बीएसएनएलचे शाखा अभियंता रोहित पाटील यांनी सांगितले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: problem to BSNL tower in Kankavali, Vaibhawadi