तिवरे गावामागचे शुक्लकाष्ट संपेना; आधी धरणफुटी, आता 'हे' अस्मानी संकट 

problem on ratnagiri tiware village
problem on ratnagiri tiware village

चिपळूण - सह्याद्रीच्या कुशीत आणि तालुक्याच्या टोकास वसलेल्या तिवरे गावावरील शुक्लकाष्ट संपता संपत नसल्याचे चित्र आहे. धरणफुटीनंतर 23 जणांचे गेलेले जीव, उद्ध्वस्त झालेली भेंदवाडी, त्यानंतर आजपर्यंत भेडसावणारी पाणीटंचाई, पुनर्वसनाचा रखडलेला प्रश्‍न, त्यातच गावातील सुमारे 30 ते 35 घरांना दोन दिवसांपूर्वी बसलेला वादळाचा तडाखा. तिवरे पहिल्या संकटातून सावरले नसतानाच दुसर्‍या संकटाची भर पडली आहे.


गतवर्षी 2 जुलैला झालेल्या धरणफुटीत 23 जणांचे जीव हकनाक गेले होते. धरणाच्या पायथ्याला वसलेली भेंदवाडी क्षणार्धात उद्ध्वस्त झाली होती. नदीकाठच्या पाणी योजना आणि घरे, दुकानांनाही धरणफुटीचा तडाखा बसला होता. धरणफुटीवर मात करीत परिस्थिती पूर्वपदावर आणण्याचे प्रयत्न ग्रामस्थ आणि प्रशासनाकडून सुरू होते. धरण फुटल्याने प्रथम पाणी प्रश्‍न गंभीर झाला. गतवर्षी जुलैमध्ये सुरू झालेला टँकर अद्याप सुरूच आहे. पाणी योजनेला निधी मंजूर झाला पण कामे पूर्ण नाहीत. दुसरीकडे पुनर्वसनाचेही घोडे अडले आहेत. अलोरेतील जागा निश्‍चित झाली पण त्यावर शंभर टक्के ग्रामस्थ सहमत नसल्यानेही घोंगडे भिजत पडले आहे. त्यातच रविवारी (ता. 19) सायंकाळी तिवरेला वादळाचा जबरदस्त तडाखा बसला. प्रामुख्याने गावठाणमधील 30 ते 35 घरांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले. वार्‍याच्या प्रचंड वेगाने घरावरील पत्रे उडून गेल्याने अनेक घरे बोडकी झाली. क्षणार्धात होत्याचे नव्हते झाले. ग्रामपंचायत इमारत, अंगणवाडी इमारतीलाही वादळाचा तडाखा बसला. तीन-चार लोकांचे प्रत्येकी लाखाच्यावर नुकसान झाले आहे. दोन दिवसापासून गावात पंचनामे सुरू आहेत. जमीनदोस्त झालेले विद्युत खांब उभारण्यात आले. भाजप, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकार्‍यांनी तिवरेत धाव घेत अन्नधान्याचा पुरवठा केला. काहींनी रोख स्वरूपात मदत दिली. 

हे पण वाचा -  गेले भाजी खरेदीला अन् मिळाला पोलिसांचा प्रसाद                                          

वादळात वार्‍याचा वेग भयानक होता. घरावरील पत्रे उडून गेलेच शिवाय भिंतीचे चिरेदेखील 15 ते 20 फूट लांबवर फेकले गेले होते. मजबूत घरांनाही या वादळाचा फटका बसला. गावात मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने त्यांना शासनाने त्वरित मदतीचा हात देऊन सावरण्याची गरज आहे.

-मंगेश शिंदे, ग्रामसमिती अध्यक्ष, तिवरे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com