कणकवलीच्या नवीन विकास आराखड्याची प्रक्रिया सुरू 

राजेश सरकारे
Friday, 25 September 2020

कणकवली नगरपंचायतीची स्थापना 30 ऑक्‍टोबर 2002 मध्ये झाली. त्यावेळी 57 ठिकाणी आरक्षणे निश्‍चित केली होती.

कणकवली (जि. सिंधुदुर्ग) कणकवली शहराच्या नवीन विकास आराखड्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. त्या अनुषंगाने शहर हद्द निश्‍चितीबाबत नागरिकांकडून सूचना, हरकती मागविण्यात आल्या आहेत. त्या, येत्या 60 दिवसांत मुख्याधिकाऱ्यांकडे द्यावयाच्या आहेत. हद्द निश्‍चिती झाल्यानंतर शहरातील जुन्या आरक्षणांमध्ये फेरबदल आणि नवीन आरक्षण निश्‍चितीची प्रक्रिया सुरू होणार आहे. 

येथील नगरपंचायतीची स्थापना 30 ऑक्‍टोबर 2002 मध्ये झाली. यात 57 ठिकाणी आरक्षणे निश्‍चित केली होती. त्या आरक्षणानुसार अनेक भागातून नवीन रस्ते, विविध प्रभागात उद्यानांची निर्मिती, पर्यटन सुविधा केंद्र आदींची निर्मिती करण्यात आली. निधी अभावी स्टेडियम व इतर आरक्षणे रखडली आहेत. 

कणकवली नगरपंचायतीला 2022 मध्ये 20 वर्षे पूर्ण होणार आहेत. त्या वर्षीपासून कणकवलीचा नवा विकास आराखडा लागू होणार आहे. त्या अनुषंगाने नगरपंचायतीच्या माध्यमातून नवा विकास आराखडा तयार करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. यात पहिल्या टप्प्यात शहर हद्द वाढ, तसेच शहर हद्दीवरील जागेबाबत नागरिकांच्या सूचना आणि हरकती असल्यास त्या पुढील 60 दिवसांत स्वीकारल्या जाणार आहेत. त्यानंतर या हरकतींवर सुनावणी होऊन शहराची हद्द निश्‍चित होणार आहे. 

57 आरक्षणांचा आढावा घेणार 
शहर हद्द निश्‍चितीनंतर शहरातील विद्यमान आराखड्यातील 57 आरक्षणांचा आढावा घेतला जाणार आहे. अत्यावश्‍यक ठिकाणी नवीन आरक्षणे निश्‍चित केली जाणार आहेत. त्यावेळी देखील नागरिकांकडून सूचना आणि हरकती मागविल्या जाणार आहेत. ही सर्व प्रक्रिया पुढील वर्षी ऑक्‍टोबरपर्यंत पूर्ण केली जाणार आहे. कणकवलीचा नवा विकास आराखडा राज्य शासनाकडे मंजुरीसाठी पाठवला जाणार आहे. 

संपादन : विजय वेदपाठक


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Process of new development plan of Kankavli started