कोकण रेल्वेवर २० नवीन स्थानके प्रस्तावित

कोकण रेल्वेवर २० नवीन स्थानके प्रस्तावित

सावंतवाडी - कोकण रेल्वे मार्गावर आणखी २० नवी स्थानके प्रस्तावित आहेत. ती प्रत्यक्षात आल्यास या मार्गाच्या ‘कॅपॅसिटी डबलिंगचे स्वप्न दृष्टिपथात येणार आहे. याला मंजुरी मिळाल्यास या मार्गावर १४२ किलोमीटरचा नवा मार्ग साकारणार आहे; मात्र यासाठी राजकीय इच्छाशक्तीची गरज आहे.

केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांच्याकडे रेल्वे मंत्रालय असताना कोकण रेल्वे मार्गाच्या ‘कॅपॅसिटी डबलिंग’चा प्रारंभ झाला. रोहा ते वीरदरम्यान दुपदरीकरणाचे कामही पूर्णत्वाकडे आहे. निधीची गरज, मार्गातील भौगोलिक स्थिती याचा विचार करता पूर्ण मार्गाचे दुपदरीकरण कठीण आहे. यामुळे कोकण रेल्वे मार्गावर स्थानकांची संख्या वाढवण्याचा निर्णय झाला.

स्थानके वाढल्याने क्रॉसिंगची क्षमता वाढणार आहे. साहाजिकच या मार्गावर वाहतूक क्षमता वाढवता येणार आहे. यालाच ‘कॅपॅसिटी डबलिंग’ म्हटले जाते. सध्या रोहा (रायगड) ते ठोकूर (कर्नाटक) या कोकण रेल्वेच्या ७३९ किलोमीटर मार्गावर ५७ रेल्वे स्थानके आहेत. सध्या दहा नव्या स्थानकांचे काम सुरू आहे. ती खुली झाल्यावर ही संख्या ६७ होणार असून, त्यामुळे रेल्वे वाहतुकीची क्षमता थोडी वाढणार आहे. 

अर्थात कोकण रेल्वे  स्वतंत्र महामंडळ असल्याने थेट रेल्वे मंत्रालयाकडून निधी मिळत नाही. यामुळे केवळ मंजुरी नाही, तर निधी उभारण्याचे आव्हानही कोकण रेल्वेसमोर आहे. उत्पन्नाचे तुटपुंजे स्रोत, कर्ज घ्यायच्या मर्यादा यांमुळे केंद्र आणि सहयोगी राज्यांकडून निधी मिळाल्याशिवाय ही स्थानके होणे कठीण आहे. केंद्रीय मंत्री प्रभू यांनी इक्विटी फंड वाढवण्याच्या निर्णय घेऊन यातून मार्ग काढला होता. आता त्याच मार्गाने निधी देण्याचा पर्याय असू शकतो; मात्र यासाठी राजकीय इच्छाशक्तीची गरज आहे. 

कोकण रेल्वे मार्गाच्या क्षेत्रात आठ लोकसभा मतदारसंघ येतात. सध्या या मतदारसंघांचे प्रतिनिधित्व करणाऱ्यांमध्ये केंद्रीय अवजड उद्योगमंत्री अनंत गीते, शिवसेना सचिव तथा आमदार विनायक राऊत, केंद्रीय आयुषमंत्री श्रीपाद नाईक, गोव्याचे खासदार नरेंद्र सावईकर, कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री येडीयुरप्पा यांचे पुत्र पी. वाय. राघवेंद्र, खासदार नलीनकुमार कटील, आनंदकुमार हेगडे, शोभा करंजलगे असे सत्ताधारी शिवसेना व भाजपचे खासदार मंत्री आहेत. याशिवाय या भागातील ऑस्कर फर्नांडिस, विजय तेंडोलकर, माजी मुख्यमंत्री नारायण राणे हे राज्यसभा सदस्य आणि या भागाचे अनेक वर्षे प्रतिनिधित्व केलेले केंद्रीय वाणिज्यमंत्री सुरेश प्रभू हेही कार्यरत आहेत. हे सर्वच नेते राजकारणातील दिग्गज आहेत. त्यांनी मनात आणले, तर कोकण रेल्वेला नवा प्रकल्पासाठी आर्थिक ताकद देणे फारसे कठीण नाही. 

अशी आहे कोकण रेल्वे

  • एकूण रेल्वे मार्गाची लांबी - ७३८.९४१ किलोमीटर
  • मार्गावरील स्थानकांची संख्या  ः ६७
  • काम सुरू असलेली स्थानके  ः १०
  • मोठ्या पुलांची संख्या  ः १७९ 
  • लहान पुलांची संख्या  ः १७०१
  • बोगद्यांची संख्या  ः ९१
  • मार्गावरून प्रवास करणाऱ्यांची संख्या  ः सव्वा कोटींहून अधिक
  • प्रवासी भाड्यातून उत्पन्न (वार्षिक)  ः ६५४.३३ कोटी 
  • माल वाहतुकीतून उत्पन्न (वार्षिक)  ः ५१४.७८ कोटी

पाच कोटींचा खर्च

कोकण रेल्वेने नव्याने २० स्थानकांचा प्रस्ताव निती आयोगाकडे पाठवला आहे. सुमारे पाच हजार कोटींचा यासाठी खर्च आहे. यामुळे १४२ किलोमीटरचा नवा मार्ग होणार आहे. 

निधी येणार कोठून?
कोकण रेल्वे स्थापत्य महामंडळ असल्याने यासाठी केंद्रीय अर्थ संकल्पात थेट निधीची तरतूद करता येत नाही. महामंडळाने एखाद्या प्रकल्पाचा, योजनेचा प्रस्ताव निती आयोगाकडे पाठवायचा असतो. तेथून तो रेल्वे बोर्ड, रेल्वे मंत्रालय, अर्थ विभाग, मंत्रिमंडळ या सर्व माध्यमांतून मंजूर होतो. यासाठीचा निधी मात्र कोकण रेल्वेने कर्ज, स्व-उत्पन्नातून उभारणे अपेक्षित असते. महामंडळाची तितकी क्षमता नसल्याने केंद्रासह महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक, केरळ या सहयोगी राज्यांकडून इक्विटी वाढवून निधी उभा करणे शक्‍य आहे. 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com