....म्हणे काम दर्जेदार ; पण पूर्णगडाच्या भिंतीला गेले तडे

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 6 September 2020

किल्ल्याच्या संवर्धनाच्या दृष्टीने केलेल्या दुरुस्तीत तटबंदीच्या खालील भागात पर्यटकांच्या दृष्टीने तयार केलेल्या चिरेबंदी भिंतीच्या भागाला तडे गेले 

पावस (रत्नागिरी) : रत्नागिरी तालुक्‍यातील पूर्णगड किल्ल्याच्या संवर्धनासाठी पुरातत्त्व विभागाने चार कोटी ८२ लाख रुपयांचा निधी मंजूर केला. ठेकेदाराच्या माध्यमातून कामाला सुरवात करण्यात आली. बहुतांश काम पूर्ण केले; परंतु संबंधित कामाच्या दर्जाबाबत शंका निर्माण करण्यात येत आहेत. किल्ल्याच्या संवर्धनाच्या दृष्टीने केलेल्या दुरुस्तीत तटबंदीच्या खालील भागात पर्यटकांच्या दृष्टीने तयार केलेल्या चिरेबंदी भिंतीच्या भागाला तडे गेल्याने निकृष्ट दर्जाच्या कामाची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी करण्यात येत आहे.

हेही वाचा - Good News : कोकणात जायला बुकिंग सुरु, मात्र हे आहेत नियम

राज्य शासनाकडून महाराष्ट्रातील किल्ले संवर्धनाच्या दृष्टीने अनेक किल्ल्यांच्या दुरुस्तीकरिता व त्यांना गतवैभव प्राप्त करून नव्या पिढीला त्या इतिहासाची साक्ष पटवून देण्यासाठी निधीची उपलब्धता केली. त्यात रत्नागिरी तालुक्‍यातील पूर्णगड येथील पूर्वीच्या टेहळणी गढी म्हणजेच सध्याच्या किल्ल्याच्या संवर्धनासाठी तत्कालीन सांस्कृतिक मंत्री कोकणचे नेते विनोद तावडे यांनी इतिहासाचा ठेवा कायम ठेवण्यासाठी दुरुस्तीकरिता चार कोटी ८२ लाख रुपयांचा निधी मंजूर केला. दोन वर्षांत या किल्ल्याच्या दुरुस्तीचे काम हाती घेतले. काम पूर्ण केल्यानंतर गडाच्या तटबंदीच्या बाहेरील भागात पर्यटकांना व्यवस्थित फिरता यावे व तटबंदी संरक्षित राहावी, यासाठी संरक्षण भिंत बांधली.

परंतु निकृष्ट बांधकामामुळे त्या संरक्षण भिंतीच्या आतील भागात अनेक ठिकाणी बांधकाम खचले आहे. त्यामुळे येत्या काही दिवसात संरक्षक भिंत कोसळण्याची शक्‍यता आहे. तसेच किल्ल्याच्या आतील भागात बांधलेल्या इतिहासकालीन कोठाराचे बांधकाम केले; मात्र त्यावर बसवलेली मंगलोरी कौले तुटलेल्या अवस्थेत असल्यामुळे कोठारांमध्ये पाणी गळती होत आहे. किल्ल्याच्या आतील भागात बांधलेले पराते म्हणजेच पर्यटकांना फिरण्यासाठी चांगली जागा मिळावी, यासाठी चिरेबंदी बांधकामासाठी शासनाने किल्ल्याच्या दुरुस्तीसाठी निधी दिला होता. त्याची बांधकाम दुरुस्ती पुरातत्त्व विभागाच्या माध्यमातून करण्यात आली. 

हेही वाचा - तीन पदरी बोगदा, त्यात दोन भुयारी मार्ग, कुठल्या घाटात सुरू आहे गतीने काम... वाचा 

किल्ल्याची जागा खासगी मालकाच्या नावे

या किल्ल्याच्या परिसराची जागा ही खासगी मालकाच्या नावाने असून, पुरातत्त्व विभागाने कोणत्या आधारे दुरुस्तीचे काम केले होते? त्याबाबत परवानगी घेतली का? या संदर्भात संतोष तोडणकर, अजय भिडे, हेमंत अभ्यंकर आणि गावखडी-पूर्णगड व कुर्धे येथील ग्रामस्थांनी प्रश्न उपस्थित केला.
 

संपादन - स्नेहल कदम 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: protection wall of purnagad fort work not cleared the budget sanctioned rupees 87 lack but work not done properly in ratnagiri