तीन पदरी बोगदा, त्यात दोन भुयारी मार्ग, कुठल्या घाटात सुरू आहे गतीने काम... वाचा

राजेश कळंबटे
Sunday, 6 September 2020

सात किलोमीटरच्या या बोगद्याचे अर्धा किलोमीटर बांधकाम पूर्ण झाले आहे.

रत्नागिरी : मुंबई ते गोवा राष्ट्रीय महामार्गावरील चौपदरीकरणादरम्यान कशेडी घाटातील बोगदा निर्धारित वेळेत पूर्ण करण्यासाठी युद्धपातळीवर काम सुरू आहे. पोलादपूर (जि. रायगड) तालुक्‍यातील भोगाव खुर्दपासून काही अंतरावर भुयारी मार्गाच्या दुसऱ्या बाजूचे उत्खनन सुरू असून, आतापर्यंत अर्धा किलोमीटरचा टप्पा पूर्ण झाला. बोगद्यातील कनेक्‍टिव्हिटीचा भुयारी मार्गही पूर्ण झाला आहे. खेड तालुक्‍याच्या बाजूने सुरू झालेल्या बोगद्याचे कामही वेगाने सुरू असून, 2021 वर्षाच्या प्रारंभी ते पूर्ण होईल, अशी चिन्हे आहेत.
 
कशेडी घाटात रस्त्याचे चौपदरीकरण शक्‍य नसल्याने भारतीय पद्धतीचा भुयारी मार्ग खणून रस्ता करण्यात येत आहे. घाटात 3.44 किलोमीटर लांबीचा बोगदा तयार करण्याचे काम रिलायन्स इन्फास्ट्रक्‍चर कंपनीने घेतले. त्यासाठी 441 कोटींचा खर्च अपेक्षित आहे. हा बोगदा आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून तीन पदरी होणार असून, दोन भुयारी मार्ग असतील. त्यातील करारानुसार 7.2 किलोमीटर लांबीचा आधुनिक दर्जाचा पक्का रस्ताही प्रस्तावित आहे. 

आपत्कालात उपयुक्त असलेले वायूविजन सुविधेचे एक भुयारही यात समाविष्ट आहे. पोलादपूर बाजूच्या पहिल्या अर्धा किलोमीटरच्या टप्प्यात दोन्ही भुयारी मार्गांना जोडणाऱ्या कनेक्‍टिव्हिटीचा भुयारी मार्ग तयार झाला. आतील भागात परत यू टर्न घेणाऱ्या वाहनांसह अपघातग्रस्त वाहनांना बाहेर काढण्याची सुविधा या कनेक्‍टिव्हिटी भुयारी मार्गाने होईल. डोंगरात खेडच्या बाजूने हे काम सुरू करण्यात आले होते. आतापर्यंत साधारणपणे 730 मीटरचा भुयारी मार्ग पूर्ण झाला आहे. भुयारी मार्गाच्या दुतर्फा जोडरस्ते करण्याची गरज असून, 441 कोटी रुपये खर्च शक्‍य आहे. 

कातळ फोडण्यासाठी "बूमर' यंत्र 
कशेडी घाटाला पर्यायी भुयारी मार्गासाठी एक अत्याधुनिक भुयार खोदकामाचे यंत्र म्हणजेच बूमर वापरण्यात येत असून, याद्वारे तीन ते चार मीटर लांबीचे कातळ फोडले जात आहेत. 20 मीटर रुंदी आणि 6.5 मीटर उंची अशा पद्धतीने भुयारी मार्गाचे खोदकाम करण्यास बूमर यंत्राचा उपयोग होत आहे. भुयारातील पडलेले कातळ व मोठमोठे दगड बाहेर काढण्यासाठी अजस्त्र यंत्राचा वापर होतो. हे कातळाचे दगड मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरण कामात वापरले जातात. या कामासाठी सुमारे 200 कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. 

संपादन : विजय वेदपाठक


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Three-lane tunnel two underpasses in it in which ghat work is in progress