K-OK provide immediate water supply to Kalsa Dhangarwadi काळसे धनगरवाडीवस्तीत तत्काळ पाणीपुरवठा करा | eSakal

काळसे धनगरवाडीवस्तीत तत्काळ पाणीपुरवठा करा

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 25 मे 2017

मालवण - तालुक्‍यातील काळसे धनगरवाडी या डोंगर माथ्यावर वसलेली ५५ जणांची लोकवस्ती गेली अनेक वर्षे पिण्याच्या पाण्यासाठी तहानलेली आहे. सध्या पिण्याच्या पाण्यासाठी ग्रामस्थांना तीन किलोमीटर पायपीट करून पाणी आणावे लागत आहे. या धनगरवाडीस कोणत्याही मार्गाने पाणीपुरवठा करण्याचे आदेश जिल्हाधिकारी उदय चौधरी यांनी गटविकास अधिकारी राजेंद्र पराडकर यांना दिल्यानंतर त्यांनी अधिकाऱ्यांसह भेट देत पाहणी केली. याठिकाणी विंधन विहीर खोदण्यासाठी उद्या पाहणी केली जाईल, तसेच या वस्तीकडे जाण्यास कोणत्या बाजूने रस्ता करता येईल यासाठी बांधकामचे अधिकारी लवकरच पाहणी करणार असल्याचे श्री. पराडकर यांनी स्पष्ट केले. 

काळसे धनगरवाडी येथे गेली अनेक वर्षे १२ कुटुंबीयांचे वास्तव्य आहे. या ठिकाणी वस्ती असतानाही सुरवातीपासून या वाडीला वीज, रस्ते, पाणी या नागरी सुविधांपासून वंचित राहावे लागले होते. यात चार वर्षापूर्वी वीजपुरवठ्याची सुविधा उपलब्ध करून दिली, मात्र रस्ता, पाण्याची सुविधा नसल्याने अनेक वर्षे ग्रामस्थांचे हाल होत होते. यात २००९ मध्ये भारत निर्माणमधून या वाडीत विहीर बांधली, मात्र मार्च ते मे या महिन्यात या विहिरीत पाणीच उपलब्ध नसल्याने ग्रामस्थांना पाण्यासाठी वणवण करावे लागते. शासनाकडे सातत्याने पाठपुरावा करूनही हा प्रश्‍न मार्गी लागला नव्हता. 

धनगरवाडीत जाण्यासाठी गावातून एक अर्धवट रस्ता होता. मात्र तो चुकीच्या पद्धतीने २६ नंबरला लागला असल्याचे सांगण्यात आल्याने शासनाचे पैसे खर्च झालेला रस्ता रद्द व्हावा, अशी मागणी ग्रामपंचायतीकडे केली आहे. वाडीत जायला यावर्षी एक रस्ता डोंगर चढाईवर खासगी जागेतून बनविला असून तो तीन किलोमीटर लांबीचा आहे. या रस्त्याबरोबरच अन्य एक रस्ता एका बाजूला दरी व एका बाजूला तीव्र चढाव अशा प्रकारचा आहे. यामुळे या धनगरवाडीपर्यत विंधन विहीर खोदण्यासाठी गाडी जाऊ शकत नसल्याची समस्या आहे. 

या धनगरवाडीला कोणत्याही मार्गाने पाणीपुरवठा करावा, असा आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिला आहे. यानुसार गटविकास अधिकारी राजेंद्र पराडकर, ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे वैभव वाळके, अतुल माने, ग्रामपंचायत सदस्य तसेच अन्य ग्रामस्थांसह धनगरवाडी येथे प्रत्यक्ष पाहणी केली. विहिरीतील पाणी आटल्याचे दिसले. धनगरवाडीचा पाण्याचा प्रश्‍न सोडविण्यासाठी या वाडीपर्यत गाडी जाणे आवश्‍यक आहे. 

रस्त्यासाठी चाचपणी
धनगरवाडीतील ग्रामस्थ ज्या ठिकाणाहून रस्ता मागत आहेत, तेथून रस्ता देण्यास स्थानिक ग्रामस्थांचा विरोध आहे. यामुळे अन्य जे दोन पर्यायी रस्ते आहेत, त्यांची लवकरच बांधकाम विभागाकडून पाहणी करून या वाडीकडे जाणारा रस्ता बनविता येईल का, हे तपासले जाणार आहे. सद्यःस्थितीत येथील पाण्याचा प्रश्‍न सोडविण्यासाठी विंधन विहीर खोदली जाणार असून, संबंधित विभागाचे अधिकारी धनगरवाडीस भेट देणार आहेत, अशी माहिती श्री. पराडकर यांनी दिली.

Web Title: provide immediate water supply to Kalsa Dhangarwadi