पूर्णगड पोलिसांनी फोटोवरून शोधला बिहारमधील आरोपी

सुधीर विश्‍वासराव
मंगळवार, 7 ऑगस्ट 2018

पावस - ऑनलाईन फसवणुकीबाबत आरोपीचा शोध घेण्यासाठी मिळालेल्या माहितीवरून पूर्णगड पोलिस बिहारला गेले होते. सहा दिवस तेथील चार ते पाच जिल्ह्यात फिरले. मात्र ठावठिकाणा लागत नव्हता. सोनो तालुक्यात फिरत असताना त्याचा फोटो मिळाला आणि मनोजकुमार मितन दास पोलिसांच्या टप्प्यात आला. सापळा रचून त्याला पोलिसांनी पकडले.

पावस - ऑनलाईन फसवणुकीबाबत आरोपीचा शोध घेण्यासाठी मिळालेल्या माहितीवरून पूर्णगड पोलिस बिहारला गेले होते. सहा दिवस तेथील चार ते पाच जिल्ह्यात फिरले. मात्र ठावठिकाणा लागत नव्हता. सोनो तालुक्यात फिरत असताना त्याचा फोटो मिळाला आणि मनोजकुमार मितन दास पोलिसांच्या टप्प्यात आला. सापळा रचून त्याला पोलिसांनी पकडले. मनोजकुमार दास सापडल्याने जिल्ह्यातील ऑनलाईन फसवणुकीचे अनेक गुन्हे उघड होण्याची शक्यता आहे. 

‘मी बँक मॅनेजर बोलतोय’, असे सांगून फोन केल्यानंतर त्याला कोड सांगितल्यानंतर आजपर्यंत अनेकांची फसवणूक झाली आहे. परंतु यातील आरोपी नजरेआड होते. कारण ते परराज्यातील असल्याने त्यांच्यापर्यंत पोचण्यात पोलिस अपयशी ठरत होते.

अशीच एक तक्रार डोर्ले येथील सुरेश नारायण गोरे यांनी पूर्णगड पोलिस ठाण्यात दिली त्याचा तपास करत असताना या गुन्ह्याची दिशा बिहार राज्याच्या दिशेने दाखवली गेली. यापूर्वी झालेल्या दोन गुन्ह्यांची दिशा बिहारमध्येच दाखवत होती. त्यामुळे तपासासाठी पूर्णगड पोलिस ठाण्याचे  रामा वडार, उदय धुमास्कर, अजय मोहिते या तिघांचे पथक 25 जुलैला बिहारला रवाना झाले. 

यापूर्वीच्या गुन्ह्यातील व्यक्तीचे नाव, बँक, गाव व भ्रमणध्वनी यांचा शोध घेण्यास सुरवात केली. 10 ते 12 ठिकाणी पालथी घातल्यानंतर संबंधित व्यक्तीचा नंबर, गाव, बँक यांचा काहीच थांगपत्ता लागत नव्हता. त्यातील माहिती अस्तित्वातच नसल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे दोन गुन्ह्यांचा तपास लागू शकला नव्हता. तिसर्‍या गुन्ह्यात मोबाईल नंबर, बँक खाते, जेथून पैसे काढले याची अचूक माहिती मिळाली आणि पोलिसांनी बिहार गाठले. तेथील पाटणा, नालंदासह अन्य चार जिल्ह्यात पोलिस फिरले. पण त्याचा शोध लागत नव्हता.

सहाव्या दिवशी पोलिस पथक जमुई जिल्ह्यातील सोनो तालुक्यात पोचले. हा तालुका नक्षलग्रस्त आहे. त्यामुळे येथील वातावरण कायम तंग असते. तेथील पोलिसांनी सहकार्य केले नाही. पथकाने त्यांनी दासचा फोटो स्थानिकांकडून मिळवला. त्यामुळे तपास करणे सोपे गेले. दास काय करतो, कुठे राहतो, याची माहिती घेत असताना तो तेथील बाजारात फिरत असतो, असे समजले. त्यानुसार बाजारात सापळा रचून मनोजकुमार मितन दासला पथकाने ताब्यात घेतले. त्याची चौकशी केल्यानंतर त्याने गुन्ह्याची कबुली दिली. त्याला तेथील न्यायालयात हजर करून कायदेशीर बाबींची पूर्तता करून रत्नागिरीत आणले. त्याला 9 ऑगस्टपर्यंत पोलिस कोठडी देण्यात आली.

आम्ही केलेल्या प्रयत्नाला यश आले. नागरिकांनी प्रत्येक वेळी जागरूक राहणे गरजेचे आहे. या संशयिताकडून अनेक गुन्हे उघडकीस येणार आहेत.

- नितीन ढेरे, सहाय्यक पोलिस निरीक्षक, पूर्णगड सागरी पोलिस ठाणे

Web Title: Purnagad Police Investigate Bihar Accused from Photo