भारतीय संस्कृती जाणून घेण्यासाठी ऑस्ट्रियावरुन आली बाईककरीण

अमित गवळे
शुक्रवार, 26 जानेवारी 2018

एवढ्या लांबून एखादी मुलगी येवून येथे बाईकवरुन प्रवास करणे हि बाब खूप उल्लेखनीय आहे. टेरेसा ग्रामीण भागातील लोकांसोबत भाषेचा व्यत्यय असून सुद्धा खुप चांगल्या प्रकारे मिसळत आहे. येथील परंपरा, भुरुपे, अन्न व कपडे तिला खुप आवडत आहेत. येथील पोषाख तिने घालून बघितले आहेत. माझ्या फार्मला व घराला जवळपास वीसहुन अधिक देशातील लोकांनी भेट दिली आहे. परंतु, बाईकवरुन आलेली टेरेसा हि पहिली महिला आहे. ती सध्या माझ्या शेतातील सर्व प्रकारची कामे अगदी आनंदाने करत आहे.
- तुषार केळकर, अॅग्रो टुरिझम व इको आर्किटेक्चर, उद्धर

सुधागड तालुक्यातील उद्धर गावात काही दिवस वास्तव्यास

पाली (रायगड): आपल्या विविधतेने नटलेल्या बहुआयामी संस्कृती, परंपरा, इतिहास व माणसांबद्दल सा-या जगाला अप्रूप आहे. हे सर्व जवळून अनुभवण्यासाठी एक तरुणी ऑस्ट्रियावरुन भारतात दाखल झाली आहे. यासाठी हि धाडसी तरूणी चक्क हजारो किलोमीटरचे अंतर एकटी बाईकवरुन फिरनार आहे.

आस्ट्रिया देशात राहणारी टेरेसा फ्रिडल (वय २२) हि तरुणी काही दिवसांपुर्वी भारतात दाखल झाली. त्या आधी टेरेसा महिनाभर श्रीलंकेत होती. तेथून ती चेनईला आली आणि तेथून ट्रेनने मुंबईत दाखल झाली. मुंबईतून एक बाईक (बुलेट) खरेदी करुन हि बाईककरीण तरुणी निघाली भारत भ्रमणाला. बाईकवरुन थेट ती शनिवारी (ता. २०) सुधागड तालुक्यातील उद्धर गावातील अॅग्रो टुरीझम करणारे व इको आर्किटेक्ट तुषार केळकर यांच्या फार्मवर आली. तुषार यांच्या शेतात सध्या टेरेसा काम करत आहे. गावातील लोकांसोबत मिसळत आहे. विविध कार्यक्रमात उत्साहाने सहभागी होत आहे. आणि येथील निसर्गसौदर्य जवळून पाहत आहे. अजुन दोन तीन दिवस येथे राहिल्यानंतर ती बाईकवरुन थेट गोव्याला निघणार आहे. मग तिथून राजस्थान, जयपुर, आग्रा, वाराणसी अशी ठिकाणे फिरुन येथील संस्कृती व लोकांबद्दल प्रत्यक्षात जाणून घेणार आहे. आणि मग तेथून बाईकवरुन थेट नेपाळला जाणार आहे. नेपाळवरुन मग विमानाने इस्तंबुलला जावून तेथून ग्रीक, सर्बिया अशी करत पुन्हा ऑस्ट्रियाला जाणार आहे.

टेरेसाबद्दल थोडे
टेरेसा आस्ट्रियात आपल्या आई-वडील तसेच मोठा भाऊ व बहिण आणि एक छोट्या बहिणीसह राहते. तिचे आई-वडील तेथे शेती व पॉट्रीचा व्यवसाय करतात. हि धाडसी तरुणी स्वित्झर्लंडला चक्क चारचाकी घोडागाडी (Carriage) चालविण्याचे काम करते. काही वर्ष तिने केक व केकजन्य पदार्थ बनविण्याचे काम केले आहे. जर्मण ही तिची मातृभाषा आहे. इंग्रजीवर तीचे चांगले प्रभुत्व आहे. याबरोबरच तिला काही प्रमाणात रशियन व इटालियन भाषा येतात.

अनुभवांचे शेअरिंग
टेरेसा सोबत 'सकाळ'ने संवाद साधला. तिने अगदी दिलखुलासपणे मनसोक्त गप्पा मारुन आपले अनुभव सांगितले. टेरेसा सांगते, भारतीय बहुआयामी व बहुरंगी संस्कृती, लोकजीवण, भुरुपे आणि मनमिळावू लोक यांच्या बद्दल तीला खुप आकर्षण व कुतूहल आहे. म्हणून हे सर्व जाणून घेण्यासाठी व प्रत्यक्षात अनुभवण्यासाठी ती भारतात दाखल झाली. आणि बाईकवरुन या गोष्टी अधिक जवळून जाणून घेता येणार होत्या. म्हणून तीने येथे फिरण्यासाठी बाईक निवडली. बाईक खरेदी करतांना तिला अनेक कागदोपत्री व्यवहार कारावे लागले. मुंबईत दोन तरुणांनी तिला यासाठी मोठी मदत केली.

चेन्नई वरुन मुंबईला रेल्वेने येत असतांना तिची एका कुटूंबासोबत ओळख झाली. त्यांनी तिला आपल्या जवळील खाण्याच्या वस्तू दिल्या. तिच्या सोबत खुप गप्प मारल्या. अनेकांनी तिच्या सोबत सेल्फि काढले. तर महिलांनी तिच्या हातावर छान मेहंदीसुद्ध काढली. या सगळ्याने ती अगदी भारावून गेली. ती सांगते कि भारतीय लोक खुपच चिकित्सक आहेत. ज्याला कोणाला थोडीफार इंग्रजी येत असेल तो अनेक प्रकारच्या चौकशा करतो आणि गप्पा मारतो. एकटी तरुणी एका अनोळख्या देशात प्रवास करणार तेही चक्क बाईकवर भिती वाटत नाही का? सुरक्षेसाठी काही उपाय केले आहेस का? असे विचारल्यावर टेरेसा हसली आणि म्हणाली कि मी फक्त दिवसाच प्रवास करते. माझ्या सेल फोनमध्ये माझ्या सर्व नातेवाईकांचे फोन नंबर आहेत. मी नियमित त्यांच्या सोबत संपर्कात असते. सोबत फळ कापण्यासाठी फक्त छोटी फोल्डिंगची सुरी आहे. भारतातील लोकांच्या चांगुलपणाबद्दल मला विश्वास आहे. त्यामुळे कसली भिती वाटत नाही. तिच्या देशातील लोक कसे आहेत? हे विचाल्यावर ती म्हणाली ते खुप स्ट्रेट फॉर्वर्ड आहेत. आपल्या देशात प्रत्येक जण कामात गुंतलेला असतो. गप्पा मारण्यासाठी कोणाकडे फारसा वेळ नसतो. असे तीने सांगितले. याबरोबर भारतीय लोकांचे तोंडभरुन कौतूक केले.

पुढील भारत दौर्यात समाज सेवेबरोबरच करणार प्रबोधन
भारतात अनेक लोक बेघर आहेत. रेल्वेतून प्रवास करतांना भिक मागणारी लहान मुले पाहिली. अनेकांना पुरेसे अन्न मिळत नाही. मला या सगळ्यांना मदत कराविशी वाटते, परंतू ते शक्य होत नाही. पुढच्या भारत दौर्यात ती एखाद्या एनजीओमध्ये सहभागी होऊन समाजकार्य करणार आहे. तिला नरेंद्र मोदींच्या स्वच्छ भारत अभियानाची माहीती आहे. येथील कचरा समस्येवर व प्लास्टिकच्या अवास्तव वापराबद्दल ती पुढील दौर्यात जनजागृती व प्रबोधन करणार असल्याचे टेरेसाने सांगितले.

सुरक्षितेच्या बाबतीत ती अतिशय काटेकोर आहे. बाईक चालवितांना ती हेल्मेट बरोबरच जॅकेट, हॅँन्ड ग्लोव्ह्ज, गॉगल आदींचा वापर करते. परंतु, तिला भारतात एक खंत वाटली ती म्हणजे येथील बरेच लोक बाईक चालवितांना हेल्मेट घालत नाहीत. तिने अनेकांना याचे दुष्परिणाम सांगितले. हेल्मेट न घालण्याचे कारण विचारले तर तिला अतिशय गंमतीशीर उत्तरे मिळाली. कोणी सांगितले की हेल्मेट न घातल्यामुळे आजुबाजूचा आवाज निट येतो. हवा चांगली लागते. मानेला त्रास होत नाही आदी. परंतु ती अनेकांना हेल्मेटचे महत्व पटवून सांगत आहे.

Web Title: raigad news pali austria bike teresa fridal in india