रायगड: भाताला हमीभाव जाहिर करा, भात खरेदी केंद्र सुरु करा

अमित गवळे
बुधवार, 27 सप्टेंबर 2017

भाताच्या हंगामापुर्वी शासनाने रायगड जिल्ह्यात तत्काळ भातखरेदी केंद्र सुरु करावेत अशी मागणी देखील शेतकरी संघटनेने केली. कृषी उत्पन्न बाजार समितीच्या माध्यमातून सुधागड तालुक्यात शासकीय भात, नाचणी, वरी, खरेदी केंद्र चालू करण्यात यावीत. सदर केंद्र पाली, परळी, व नांदगाव येथे सुरु करण्यात यावीत या मागणीचा देखील निवेदनात समावेष केला आहे.

पाली : रायगड जिल्ह्यात भाताला (तांदुळ) उत्पादन खर्चावर आधारीत हमी भाव शासनाने त्वरीत जाहीर करावा अशी मागणी सुधागड कृषी मित्र पाली संघटनेने केली आहे. या सन्दर्भातील निवेदन जिल्हाधिकारी रायगड यांच्याकडे सोमवारी (ता.25) देण्यात आले. या निवेदनाची प्रत शेकाप आमदार धैर्यशिल पाटील व पाली सुधागड तहसिलदार बि. एन. निंबाळकर यांना देखील देण्यात आली आहे.

भाताच्या हंगामापुर्वी शासनाने रायगड जिल्ह्यात तत्काळ भातखरेदी केंद्र सुरु करावेत अशी मागणी देखील शेतकरी संघटनेने केली. कृषी उत्पन्न बाजार समितीच्या माध्यमातून सुधागड तालुक्यात शासकीय भात, नाचणी, वरी, खरेदी केंद्र चालू करण्यात यावीत. सदर केंद्र पाली, परळी, व नांदगाव येथे सुरु करण्यात यावीत या मागणीचा देखील निवेदनात समावेष केला आहे. सध्या शासनाने छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना 2017 सुरु करण्यात आली आहे. परंतू पीक कर्जमाफीचे अर्ज तथा घोषणापत्र ऑनलाईन भरण्यामध्ये शेतकर्‍यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. कर्जमाफी संदर्भात शासकीय अधिकृत माहीती मिळण्यासाठी तहसिल कार्यालय तसेच सबंधीत बँकेत एका अधिकार्‍याची नेमणुक करावी. अशी मागणी सुधागड कृषी मित्र पाली संघटेनेने केली आहे.  

बँकांकडून शेतकर्‍यांना सहकार्य मिळत नसल्याने शेतकरी संभ्रामवस्थेत असल्याचे शेतकरी संघटनेचे म्हणणे आहे. चालू कर्जमाफी व नविन आर्थीक सहाय्य कशा पध्दतीने व कोणत्या निकषावर सबंधीत शेतकर्‍याच्या खात्यात जमा होणार याबाबतची सविस्तर माहिती शेतकर्‍यांना देण्यात यावी. असे निवेदनात म्हंटले आहे. निवेदन देतेवेळी शशिकांत पाशिलकर, विराज लोंढे, शरद गोळे, नथुराम काटकर, संदीप उमठे, बेंडू पाठारे, जालींदर खैरे, भरत दळवी, मुरलीधर सुतार, महादेव साठे, माधुरी भोईर, अंजना भोईर, लक्ष्मण भोई, नरेश काटकर, संतोष यादव, गणपत आमनकर, शांताराम देशमुख, संजय पवार आदिंसह सुधागड कृषी संघटना पालीचे प्रमुख पदाधिकारी, व शेतकरी उपस्थीत होते. 

स्व. गोपीनाथमुंडे शेतकरी अपघाती विमा योजनेसंदर्भातील काही जाचक अटी वगळण्यात याव्यात. सध्या या योजनेत ज्या शेततकर्‍यांचे नाव सातबारा वर असेल तोच शेतकरी या योजनेचा लाभ घेण्यास पात्र आहे. तसेच त्यांच्या कुंटुंबियांचे नाव उदाः (पत्नी, मुलगा) सातबारावर नसल्यास त्याचे शेती कसणारे कुटुंबातील सदस्य या योजनेचा लाभ घेण्यापासून वंचीत राहत आहेत. प्रामुख्याने कुटुंब प्रमुखाचे नाव सातबारा उतार्‍यावर असते. परंतू प्रत्यक्षात शेती कसणारे कुटुंबातील इतर सदस्य असतात.  परंतू त्यांचे नाव सातबार्‍यावर नसते. त्यांच्यापैकी कोणाचाही अपघाती मृत्यू झाल्यास केवळ सातबारावर नाव नाही या कारणास्तव या योजनेचा लाभ घेता येत नाही. याकरीता रेशनिंग कार्डवरील नावे विचारात घेवून सबंधीत व्यक्तीच्या नातेवाईकास नुकसान भरपाईची रक्कम मिळावी अशी मागणी देखील सुधागड कृषी मित्र संघटना पाली यांनी निवेदनाद्वारे केली आहे. 

Web Title: Raigad news rice MSP demand