शिवसेनेला चमत्काराचे स्वप्न!

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 4 मार्च 2017

आघाडीला बहुमत मिळूनही अध्यक्षपदासाठी शेकाप व राष्ट्रवादीत एकमत होत नसल्याचा फायदा शिवसेना उचलू पाहत आहे...

अलिबाग - रायगड जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद आपल्याच पक्षाला मिळावे यासाठी शेतकरी कामगार पक्ष व राष्ट्रवादी काँग्रेस या आघाडीतील मित्रपक्षांमध्ये रस्सीखेच सुरू असताना, या स्पर्धेत आता शिवसेनेने उडी मारली आहे. अध्यक्षपदाची निवडणूक लढवण्यासाठी मोर्चेबांधणी सुरू करतानाच भाजप व काँग्रेसचा पाठिंबा मिळवण्याचा प्रयत्न शिवसेना करीत आहे.

अध्यक्षपदाचा लोण्याचा गोळा मटकावण्यावरून राष्ट्रवादी काँग्रेस व शेकापमध्ये झुंज सुरू झाल्याने शिवसेनेचे नेते आघाडीतील घडामोडींवर बारीक लक्ष ठेवून आहेत. रायगड जिल्हा परिषद निवडणुकीत ५९ जागांपैकी शेतकरी कामगार पक्षाने सर्वाधिक २३ जागा जिंकल्या आहेत. राष्ट्रवादीने १२ जागा जिंकल्या आहेत. हे दोन्ही पक्ष निवडणुकीला आघाडीने सामोरे गेले होते. त्यामुळे आघाडीचे संख्याबळ ३५ झाले आहे. शिवसेनेने १८ व काँग्रेस व भाजपने प्रत्येकी तीन जागांवर विजय मिळवला आहे.

अध्यक्षपदासाठी भाजप व काँग्रेसचे सदस्य मदत करतील, अशी शिवसेनेची अपेक्षा आहे. तसे प्रयत्न शिवसेनेच्या नेत्यांनी सुरू केले आहेत. अध्यक्षपद न मिळाल्यास आघाडीतील नाराज गटाला हाताशी धरून जिल्हा परिषदेतील सत्ता हाती घेण्याचा प्रयत्न शिवसेना करणार आहे. त्यामुळे अध्यक्षपदाच्या निवडणुकीत चमत्कार घडवण्याची भाषा शिवसेना नेत्यांनी सुरू केली आहे.

आघाडीत जास्त जागा मिळाल्याने शेकाप कार्यकर्ते आपल्यालाच अध्यक्षपद मिळावे यासाठी आग्रही आहेत. दुसरीकडे राष्ट्रवादीही अध्यक्षपदासाठी आग्रही आहे. यामुळे या दोन पक्षांमधील काही सदस्य नक्कीच नाराज होतील. यामुळे शिवसेना अध्यक्षपदाच्या निवडणुकीत नक्कीच चमत्कार घडवेल, असा दावा शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख महेंद्र दळवी यांनी केला.

३५ जागा जिंकल्याने आघाडीने सत्ता स्थापण्याची सर्व तयारी पूर्ण केली आहे; मात्र आघाडीचा अध्यक्षपदाचा उमेदवार अद्यापपर्यंत निश्‍चित झालेला नाही. दोन्ही पक्षांनी आपल्याच पक्षाचा अध्यक्ष असावा, यासाठी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. जास्त जागा असल्याने शेकापला संधी मिळावी, अशी मागणी शेकापच्या सदस्यांनी केली आहे. शेकापकडून नीलिमा पाटील, चित्रा पाटील यांची नावे चर्चेत आहेत. 

शेकापपेक्षा कमी जागा मिळाल्या असल्या, तरी राष्ट्रवादीने अध्यक्षपदावर दावा केला आहे. विधान परिषद निवडणुकीत शेकापचे बाळाराम पाटील यांना राष्ट्रवादीने केलेली मदत; तसेच खारगाव जिल्हा परिषद मतदारसंघात शेकापच्या आस्वाद पाटील यांच्यासाठी राष्ट्रवादीने सोडलेली जागा, याची किंमत राष्ट्रवादी वसूल करू पाहत आहे. याबदल्यात सुरुवातीची अडीच वर्षे अध्यक्षपद आपल्याला मिळावे, असा राष्ट्रवादीचा आग्रह आहे. राष्ट्रवादीकडून प्रदेशाध्यक्ष आमदार सुनील तटकरे यांची कन्या आदिती तटकरे यांचे नाव चर्चेत आहे.

फूट टाळण्याचा प्रयत्न 
शेकाप-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीचे ३५ सदस्य निवडून आले आहेत. आघाडीत फूट पडू नये यासाठी दोन्ही पक्षांच्या सदस्यांच्या गटाची निर्मिती करण्यात आली आहे. या गटाचे गटनेते म्हणून शेकापचे ॲड. आस्वाद पाटील यांची नेमणूक करण्यात आली आहे.

जिल्ह्यातील जनतेने कोणा एका पक्षाला बहुमत दिलेले नाही. शेकाप-राष्ट्रवादी आघाडीला ३५ जागा मिळाल्या. त्यातील २३ जागा शेकापला मिळाल्या आहेत. दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष शिवसेना आहे. यामुळे आम्ही अध्यक्षपदाची निवडणूक लढवणार आहोत. भाजप व काँग्रेस आम्हाला सहकार्य करील, अशी अपेक्षा आहे. 
- महेंद्र दळवी, माजी जिल्हाप्रमुख, शिवसेना

Web Title: raigad zp