वेरवलीसह दोन रेल्वे स्थानकांचा दर्जा वाढवणार

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 30 नोव्हेंबर 2016

रत्नागिरी- कोकण रेल्वे मार्गावरील तीन स्थानकांचा दर्जा वाढविण्यात येणार आहे. आतापर्यंत फक्त रेल्वे थांबण्यासाठी उपयोगात येणारी ही स्थानके यानंतर रेल्वे क्रॉसिंग करण्यासाठीही उपयोगात आणण्यात येतील. त्यांचा दर्जा या तऱ्हेने वाढविण्यात येणार आहे. या स्थानकातून दोन रेल्वेगाड्या क्रॉस करून जाऊ शकतील. यामुळे रेल्वेचा प्रवासाचा वेळ वाचणार आहे. इंदापूर, सापे वामने, वेरवली ही तीन स्थानके आहेत.

कोकण रेल्वेवरील दोन जास्त अंतरावरील स्थानकांचे अंतर कमी करण्यातून जास्त प्रवाशांना सुविधा आणि गाड्यांचे नियोजन करणे सोपे ठरते. ही बाब लक्षात घेत कोकण रेल्वेने काही नवीन स्थानकांच्या निर्मितीची घोषणा केली होती. याचाच पुढील भाग म्हणून रत्नागिरी जिल्हा हद्दीतील तीन स्थानकांत सुधारणा करण्यात येणार आहे.
आतापर्यंत इंदापूर, सापे वामन, वेरावली या तिन्ही स्थानकांना केवळ थांब्यांचे स्वरूप होते; पण आता त्यात सुधारणा होणार आहे.

स्थानकाचा दर्जा मिळाल्याने लवकरच तिकीट विक्रीपासून अन्य सुविधा येथे मिळण्यास सुरवात होणार आहे. त्यासह मेल व एक्‍स्प्रेस गाड्यांचे नियोजन करण्यासही साह्य मिळेल, असे रेल्वे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. इंदापूर स्टेशन कोलाड-माणगावमध्ये असून, त्यासाठी 14 कोटी 50 लाख रुपये, वीर-करंजवाडीमधील सापे वामनेसाठी 13 कोटी 64 लाख रुपये, आडवली-विलवडेमधील वेरवली स्थानकासाठी 15 कोटी तीन लाख रुपयांचा खर्च झाला आहे. तसेच रेल्वे अर्थसंकल्पात घोषणा करण्यात आलेल्या रेल्वे कारखान्याचे भूमिपूजन लोटे परशुराम या ठिकाणी लवकरच केले जाणार आहे. त्यासाठी एमआयडीसीने 50 एकर जागा दिली आहे. तेथे गाडयांच्या निर्मितीसाठी आवश्‍यक घटकांचे उत्पादन केले जाणार आहे. कणकवली येथे "आयआरसीटीसी'तर्फे ई-कॅटिरिंग सुविधा पुरवण्याचे पाऊलही रेल्वे उचलणार आहे. या तिन्ही सुविधांचे उद्‌घाटन एकाच दिवशी रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्या हस्ते करण्यात येणार आहे.

500 लोकांना रोजगार शक्‍य
लोटे परशुराम परिसरातील कोकण रेल्वेचा हा मोठा प्रकल्प आहे. या प्रकल्पामुळे त्यासाठी आवश्‍यक ते छोटे-मोठे उद्योग खेड आणि चिपळूण परिसरात वाढण्याची अपेक्षा आहे. या प्रकल्पातून सुमारे 500 हून अधिक लोकांना रोजगार मिळण्याची शक्‍यता असल्याने परिसराच्या विकासास हातभार लागेल.

Web Title: rail stations status to upgrade