सिंधुदुर्गात रेल्‍वे लवकरच विजेवर धावणार

तपासणी सुरू कणकवली ते वेर्णा मार्गावर आज पथक
 कोकण रेल्‍वे
कोकण रेल्‍वेSakal

कणकवली: कोकण रेल्‍वेच्या रत्‍नागिरी ते वेर्णा या मार्गावरील विद्युतीकरणाचे काम पूर्ण झाले. त्याची तपासणी करण्यासाठी रेल्‍वेचे सुरक्षा आयुक्‍त मनोज अरोरा यांच्या नेतृत्‍वाखाली पथकाने आज रत्‍नागिरी ते नांदगावपर्यंत तपासणी केली. उद्या (ता. २३) कणकवली ते वेर्णा या मार्गाची तपासणी होईल. लवकरच कोकण रेल्‍वे मार्गावरील सर्व गाड्या विजेवर धावण्याची शक्‍यता आहे.

रोहा ते वेर्णा या मार्गाच्या विद्युतीकरणाचे सात वर्षे काम सुरू होते. रोहा ते रत्‍नागिरी या २८५ किलोमीटर टप्प्याचे विद्युतीकरण डिसेंबर २०२१ मध्ये पूर्ण झाले. सध्या या मार्गावर रत्‍नागिरी ते दिवा ही पॅसेंजर गाडी आणि रत्‍नागिरीपर्यंत येणाऱ्या मालगाड्या विजेवर धावत आहेत. त्‍यानंतर फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यात रत्‍नागिरी ते गोव्यातील वेर्णा या स्थानकापर्यंत विद्युतीकरणाचे काम पूर्ण करण्यात आले.

आता या विद्युतीकरण कामाची रेल्‍वे सुरक्षा आयुक्‍तांकडून तपासणी केली जात आहे. आज रत्‍नागिरी ते नांदगाव या स्थानकादरम्‍यान रेल्‍वे मार्ग, विद्युत यंत्रणा आदींची तपासणी करण्यात आली. तर उद्या (ता. २२) कणकवली ते वेर्णा या दरम्‍यानच्या मार्गाची तपासणी होईल. त्‍यानंतर हे पथक मडुरा ते वेर्णा या मार्गाची तपासणी करणार आहे.

कोकण रेल्‍वेच्या संपूर्ण ७४० किलोमीटर मार्गाचे विद्युतीकरण अंतिम टप्प्यात आले आहे. यातील रोहा ते रत्‍नागिरी, मडगाव ते कारवार, कारवार ते ठोकूर आणि मडगाव ते थिवी या विद्युतीकरण झालेल्‍या मार्गाची श्री. अरोरा यांनी यापूर्वीच तपासणी केली आहे. आता रत्‍नागिरी ते वेर्णा या मार्गाची तपासणी पुढील दोन दिवस सुरू राहणार आहे. मार्चपासून कोकण रेल्‍वे मार्गावरील सर्व गाड्या विजेवर धावण्याची शक्‍यता आहे. मुंबईपासून रत्नागिरीपर्यंतचा सलग मार्ग विद्युतीकृत असल्याने सध्या डाऊन दिशेला रत्नागिरीपर्यंत माल गाड्या आणि दिवा-रत्नागिरी पॅसेंजर गाडी विद्युत इंजिनासह चालविली जात आहे.

लांब पल्‍ल्‍याच्या गाड्या विजेवर

रेल्‍वे सुरक्षा आयुक्‍तांच्या तपासणीनंतर कोकण रेल्‍वेचा संपूर्ण मार्ग डिझेलऐवजी विद्युत इंजिनावर गाड्या धावण्यासाठी सज्ज होणार आहे. इलेक्ट्रिक इंजिनाची उपलब्धता आणि वीज सबस्टेशनची उर्वरित कामे पूर्ण होईपर्यंत कोकण रेल्वे मार्गावरील सर्व गाड्या टप्प्याटप्प्याने इलेक्ट्रिक इंजिनासह चालविल्या जाणार आहेत. यात सुरुवातीला लांब पल्‍ल्‍याच्या गाड्या विद्युत इंजिनद्वारे चालवल्या जातील व त्या पाठोपाठ इतर गाड्या देखील विजेवर धावू लागतील, अशी माहिती रेल्‍वेकडून देण्यात आली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com