राजापूर तालुक्‍यात उभारणार ‘रेन हार्वेस्टिंग’चे जाळे

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 5 मे 2017

राजापूर - शासनाच्या विविध योजनांच्या माध्यमातून लाखो रुपयांचा निधी खर्च करूनही तालुक्‍याला दरवर्षी पाणीटंचाईला सामोरे जावे लागते. यावर मात करण्यासाठी राजापूर पंचायत समितीने तालुक्‍यामध्ये ‘रेन हार्वेस्टिंग’ प्रकल्पाचे जाळे विणण्याचा निर्धार केला आहे. शासनाच्या महात्मा गांधी रोजगार हमी योजनेंतर्गंत वैयक्तिक लाभार्थ्यांच्या माध्यमातून घरोघरी हा प्रकल्प राबवण्यात येणार आहे. या प्रकल्पाचा प्रारंभ आपल्या घरी राबवून करणार असल्याची माहिती पंचायत समितीचे सभापती सुभाष गुरव यांनी पत्रकारांना दिली.

पहिल्या टप्प्यामध्ये तालुक्‍यातील पन्नास घरांमध्ये रेन हार्वेस्टिंग प्रकल्प राबवणार असून, त्यामध्ये जास्तीत जास्त लोकांनी सहभागी होण्याचे आवाहन गटविकास अधिकारी शिवाजी माने यांनी केले आहे. या तालुक्‍याला दरवर्षी एप्रिल-मे महिन्यात पाणीटंचाईला सामोरे जावे लागते.

पावसाळ्यामध्ये मोठ्या प्रमाणात पडणारा पाऊस, पाणीटंचाई दूर करण्यासाठी शासनाच्या माध्यमातून तालुक्‍यात खर्च होणारा लाखो रुपयांचा निधी अशी आश्‍वासक स्थिती असूनही पाणीटंचाईची स्थिती ‘जैसे थे‘ आहे. यावर मात करण्यासाठी पंचायत समिती सभापती श्री. गुरव यांच्या नेतृत्वाखाली ‘रेन हार्वेस्टिंग’ प्रकल्प राबवण्याचा निर्धार केला आहे.

पावसाचे पाणी या प्रकल्पाच्या माध्यमातून संकलित करण्यात येणार आहे. या पाण्याचा उपयोग टंचाईच्या काळात होणार आहे. या प्रकल्पासाठी वापरण्यात येणाऱ्या पाण्याच्या टाक्‍या या भूमिगत ठेवण्यात येणार आहेत. जेणेकरून त्या टाक्‍यांसह त्यामध्ये साठलेले पाणी खराब होणार नाही याची काळजी घेतली जाणार आहे. 

रेन हार्वेस्टिंग प्रकल्प वैयक्तिक स्तरावर राबवण्यात येणार आहे. त्यासाठी महात्मा गांधी रोजगार हमी योजनेंतर्गंत लाभार्थ्याला अनुदान उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची माहिती पंचायत समितीचे गटविकास अधिकारी श्री. माने यांनी दिली. पहिल्या टप्प्यामध्ये तालुक्‍यात पन्नास लाभार्थ्यांच्या घरी हा प्रकल्प राबविण्यात येणार आहे. याचा प्रारंभ पंचायत समितीचे सभापती श्री. गुरव यांच्या निवासस्थानी हा प्रकल्प राबवून करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. पाणीटंचाईवर मात करण्यासाठी महत्त्वाकांक्षी असलेल्या या योजनेमध्ये तालुक्‍यातील जास्तीत जास्त लोकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन गटविकास अधिकारी श्री. माने यांनी केले आहे. यावेळी ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे उपअभियंता श्री. मेंगे उपस्थित होते.

Web Title: rain harvesting nest in rajapur tahsil