esakal | रात्रीपर्यंत वीजांचा कडकडाट सुरू असल्याने वीज पुरवठा खंडीत झाला. 

बोलून बातमी शोधा

सिंधुदुर्ग : अवकाळी पावसाने वैभववाडीला झोडपले; बागायतदारांना फटका

सिंधुदुर्ग : अवकाळी पावसाने वैभववाडीला झोडपले; बागायतदारांना फटका

sakal_logo
By
स्नेहल कदम

वैभववाडी (सिंधुदुर्ग) : तालुक्‍याच्या बहुतांश भागाला आज सायंकाळी पूर्वमोसमी पावसाने अक्षरशः झोडपून काढले. या पावसामुळे काजू, आंबा बागायतदारांना मोठा फटका बसणार आहे. रात्री उशिरापर्यंत तालुक्‍यातील वीजपुरवठा खंडित होता. दुपारी तीनच्या सुमारास पावसाचे वातावरण तयार झाले. त्यानंतर काहीसे आकाश मोकळे झाले. सायंकाळी पाचच्या सुमारास विजांच्या कडकडाटात लोरे आचिर्णे परिसरात पावसाला सुरुवात झाली. त्यानंतर सह्याद्री पट्ट्यासह रात्री उशिरापर्यंत तालुक्‍याच्या काही भागांत पावसाने हजेरी लावली. रात्रीपर्यंत वीजांचा कडकडाट सुरू असल्याने वीज पुरवठा खंडीत झाला.

अचानक आलेल्या पावसाने शेतकऱ्यांची तारांबळ उडाली. पावसाबरोबरच सोसाट्याचा वारा असल्याने काजू आणि आंबा बागायतींचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होण्याची शक्‍यता आहे. कोरोनामुळे काजूला तितकासा दर नसल्याने आधीच हवालदिल असलेल्या बागायतदारांवर अवकाळीचे संकट कोसळले आहे. ऐन बहरात असलेल्या आंब्याच्या हंगामावर अवकाळीमुळे अक्षरशः पाणी पडण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. रात्री उशिरापर्यंत रिपरिप सुरू होती.