देवरूख, खेडात वीज पडली; वळवाचा तडाखा

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 14 मे 2017

मुलाचा मृत्यू - मंडणगड, हर्णैमध्ये वादळामुळे लाखोंचे नुकसान

मुलाचा मृत्यू - मंडणगड, हर्णैमध्ये वादळामुळे लाखोंचे नुकसान
रत्नागिरी - विजांच्या कडकडाटासह चक्रीवादळाने जिल्ह्यात सलग दुसऱ्या दिवशी पावसाने धुमाकूळ घातला. वादळी वाऱ्याने अनेक घरे, गोठ्यांचे नुकसान झाले. शनिवारी (ता. 12) सायंकाळी मुसळधार पावसाने चिपळूणवासीयांची दाणादाण उडवली. हर्णै, खेड, मंडणगड, राजापूर, संगमेश्‍वर, लांज्यात लाखोंचे नुकसान झाले. खेडात वीज पडून एका मुलाचा मृत्यू, तर देवरुखात विजेच्या धक्‍क्‍याने एक महिला बेशुद्ध पडली. रत्नागिरी तालुक्‍यात ढगाळ वातावरण होते.

हवामान विभागाकडून वर्तविलेला पावसाचा अंदाज खरा ठरला आहे. सलग दुसऱ्या दिवशी रत्नागिरी जिल्ह्यात ठिकठिकाणी पावसाने हजेरी लावली. शुक्रवारी (ता. 11) रात्री मुसळधार पावसाने झोडपले होते. दापोलीत हर्णै, पाजपंढरी किनारपट्टी परिसरात चक्रीवादळाचा तडाखा बसला. दहा ते बारा घरांचे चार ते पाच लाखांहून अधिक नुकसान झाले. पंचनामे करण्याचे काम सुरू आहे. अचानक आलेल्या पावसामुळे मच्छीमारांनाही तडाखा बसला आहे. विद्युत खांब तुटल्यामुळे हर्णै, पाजपंढरीचा विद्युतप्रवाह खंडित झाला. मंडणगड तालुक्‍यात पाचरळ, नायणे, आतले, सावरी, वेरळ, कुडली बुद्रूक गावातील सुमारे बारा घरांची कौले, छपरे उडून गेल्याने नुकसान झाले. आतले येथील एका घरांवरील छप्पर उडून गेल्याने दहाजणांना दुखापत झाली. खेडमध्ये सातपानेवाडी, खवटी, कुळंवडी येथील घरा-गोठ्यांचे सव्वा लाखाचे नुकसान नोंदविले गेले आहे. ऐनवली-देऊळवाडी येथे अशोक मोरे यांचा मुलगा आदित्य (वय 14) हा दरवाज्याच्या खिडकीत उभा होता.

पावसाचा आंनद घेतानाचा अचानक त्याच्या अंगावर विजेचा लोळ आला. विजेच्या धक्‍क्‍याने त्याचा उपचारासाठी नेण्यापूर्वीच मृत्यू झाला होता.

निवळी-धनगरवाडी येथील राजेश झोरे यांच्या घरावर सायंकाळच्या सुमारास वीज कोसळली. घराच्या दरवाज्यात असलेल्या त्यांच्या पत्नी सई झोरे यांच्या पुढ्यात विजेचा लोळ आला. समोरच पडलेली वीज पाहून त्या घाबरल्या आणि बेशुद्ध पडल्या. त्यांना उपचारासाठी शासकीय रुग्णालयात नेण्यात आल्याची माहिती जिल्हा नियंत्रण कक्षातून देण्यात आली.

अखेरच्या टप्प्यातील उत्पन्नाला फटका
मे महिन्याच्या मध्यात पडलेल्या पावसाने आंबा बागायतदारांच्या अखेरच्या टप्प्यातील उत्पन्नावर परिणाम होणार आहे. वादळी वाऱ्याने झाडावरील आंबा गळून गेला आहे. त्यात मोठे नुकसान सोसावे लागणार आहे. पावसामुळे दरावरही परिणाम होणार आहे. कॅनिंगचा दर सुरवातीलाच पडल्याने आता ही घसरण आणखीन पुढे कायम राहते की काय अशी भीती बागायतदार व्यक्‍त करीत आहेत.

Web Title: rain & lightning in devrukh and khed