'तडीपार अंतू आयुष्य जगून गेला, अनेक भलीबुरी कामं केली; पण..'

अंतू मुंबईहून तडीपार होऊन आला. त्याला सुद्धा आता ३५-४० वर्षांपेक्षा जास्त काळ लोटला होता.
Konkan News
Konkan Newsesakal
Summary

अंतू गेला त्याला आता चार-पाच वर्षे झाली असतील. सटवीने लिहिलेल्या लेखाप्रमाणे अंतू आयुष्य जगून गेला, आयुष्यात अनेक भलीबुरी कामे करत राहिला, अनेक चढउतार पाहिले.

-राजा बर्वे, चिपळूण

मुंबईतून (Mumbai) बऱ्याच वेळा अंतू रात्रीचाच येई आणि रात्रीचाच लगेच परत जाई. आला की, तो माझ्या वडिलांना भेटायला मात्र येत असे. वडील काही उपदेशाचे डोस देत ते त्याच्या मेंदूत कितपत पोचत हे मात्र कळत नसे; पण तरी त्यावर एक वाक्य मात्र नेहमी बोले,‘ भाऊ, तुम्ही मला चांगलाच सांगताव, मी मुंबईत नाय राहात ओ, तिथल्या घानीत राहातो हा मला कलतो; पन आता माझाबी काय विलाज नाय, आता भाईर पडायचा म्हटला तर माझा मुदडाच करून पाठवतील’. आम्हाला तो नेमके काय म्हणतोय हे कळत नसे; पण तरी तो बेकायदेशीर कामे करतो, एवढे कळत असे.

अंतू मुंबईहून तडीपार होऊन आला. त्याला सुद्धा आता ३५-४० वर्षांपेक्षा जास्त काळ लोटला होता. मुंबईची हद्दबंदी आता त्याच्या अंगवळणी पडली होती. आता तो मुंबईत गेला असता तरी पोलिसखात्याने त्याला ओळखले देखील नसते की, अडवलेदेखील नसते; पण तरीही त्याने जे मुंबईचे नाव एकदा टाकले ते कायमचेच. अंतू येडगे (Antu Yedge) तडीपार होऊन आला तेव्हा पन्नाशीच्या जवळपास होता. ऐन तारुण्यात त्याने मुंबईची वाट धरली होती. जुहूला एका मोठ्या अभिनेत्याच्या (Actor) बंगल्यात तो घरगडी म्हणून काही वर्षे होता.

Konkan News
Loksabha Election : महायुती की महाविकास आघाडी? लोकसभा निवडणुकीबाबत राजू शेट्टींनी घेतला मोठा निर्णय

तिथे बरेच वेळा मोठमोठे लोक जमून पार्ट्या होत. अंतू तिथे त्यांना जे लागेल ते पुरवत असे. तो उत्तम मांसाहारी स्वयंपाक करत असे. उत्तम चिकन, मटण, मासे याच्या वेगवेगळ्या डिशेश तो बनवून खिलवत असे. कधी सिगरेट, दारू, कोल्ड्रिंक्स, कधी चरस, गांजा. या सगळ्या वाटा हळूहळू त्याला पाठ झाल्या होत्या. पार्टी संपल्यावर उरलेली दारू अंतूच्या पोटात जाई. गावात चिरेबंदी घर बांधले. दणक्यात घरभरणी करून गावजेवण घातले.

सुमारे ७० च्या दशकात मात्र त्याचे ग्रह फिरले. एकदा अंतू पायधुनी भागात चरस आणायला गेला. त्या व्यापारातला पैसा त्याला आकर्षित करत होता. याच दरम्याने केव्हातरी त्याने पेडलर्सचे काम सुरू केले. आठवड्यातून तीन दिवस रेल्वेने तो मुंबईत वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन ‘डिलिव्हरी’ करत असे. त्यातून खूप पैसा अंतूने मिळवला. अंतू दारूच्या आहारी जाऊ लागला. नोकरीत दांड्या सुरू झाल्या. मालकाची खप्पा मर्जी झाली आणि अंतूची नोकरी सुटली तोवर अंतू पस्तिशीत आला होता. तिथून अंतूने सरळ पायधुनीजवळच एक झोपडी घेतली आणि पेडलर्सचे काम सुरू केले. अशाच एका वळणावर त्याला हऱ्यानाऱ्या गँगमध्ये प्रवेश मिळाला.

सहा फूट उंच, उभा कांबीसारखा सडसडीत काटक देह, चपळ हालचाल, भेदक नजर, गालाखाली लोंबकळणारे एक चामखीळ, उलट्या वळलेल्या मिशा, गळ्यात जाड सोन्याच्या गोफात विणलेली दोन दणकट वाघनखे असा अंतू गावात येई तेव्हा लहान मुलेच नाही तर मोठी माणसे बाया बापड्यादेखील वचकून असत. गावात आला की घरी येई, कधी येताना खजूर घेऊन घरी आणून देई. त्याची बायको आणि दोन मुले इथे गावातच रहात असत. कधी त्याने त्यांना मुंबई दाखवली मात्र नाही. काही वर्षांनी त्याची बायको अंतूला कंटाळून दोन मुलांना घेऊन एका बिहारी कामगारासोबत पळून गेली ती कायमचीच..आणि एक दिवस ती बातमी आली.

Konkan News
Revenue Department : लाचखोरीत महसूल विभाग आघाडीवर; 'महसूल'चे पाच अधिकारी जाळ्यात

भायखळ्याच्या पुलावर दोन गुंडांच्या टोळीत हाणामारी झाली. एक दोन मुडदे पडले. अंतूलादेखील पोलिसांनी उचलला. मरेस्तोवर तुडवला. स्वतःची लघवी अंगाला चोपडून मार खाण्याचे तंत्र अंतूने आत्मसात केले होते. अंतूने काहीच कबूल केले नाही. केस झाली आणि पुराव्याअभावी तडीपारीची शिक्षा होऊन अंतू गावात आला तो कायमचा. अंतूने पूर्वाआयुष्यात खूप पैसा कमावला; पण तो टिकवता येणे त्याला शक्यच नव्हते. मनाचा दिलदार. गावात आल्यावर मित्रांसोबत रोज दारूच्या पार्ट्या होत. शिते दिसल्यावर भुतावळ जमा होई. पावसाळी बेगमीसाठी रोज एक गवताची वरंड कापून खोतांच्या अंगणात टाकत असे.

इतकं करून वरंडी वाढत कशा नाहीत, हे खोतांनी एक दिवस पाहिले तर अंतू ढिगातली मागची वरंड उचलून नवी आणल्यासारखी पुढे टाकतोय. खोतांचे आंबे दुपारपर्यंत काढून झाले की, संध्याकाळी परत गुपचूप जाऊन आंबे काढून परस्पर विकत असे. तोच आंबे काढतो त्यामुळे कोणाला चोरीचा संशयदेखील येत नसे. माझ्या मित्राचे वृद्ध कीर्तनकार सासरे, आबा, त्याच्याकडे दोन-तीन महिने राहायला आले होते. एक दिवस अंतूने त्यांना उत्तम मॉलिश केले. पुढचे दोन-तीन महिने तो रोज संध्याकाळी मॉलिश करायला येत असे. मॉलिश करताना आबा त्याची पार्श्वभूमी कळल्यावर त्याचे रोज बौद्धिक घेत. ते ऐकताना अनेकवेळा अंतूच्या डोळ्यातून आसवे येत आणि अस्फुटसे हुंदके देत राही.. कदाचित त्याला त्याचा पूर्वेतिहास, काळी कामे, गुंडगिरी आठवत असावी.

Konkan News
Women Health News : स्त्रियांमध्ये उद्भवणारा श्वेतप्रदर अर्थात अंगावरून पांढरे जाणे; जाणून घ्या लक्षणे

एक दिवस असाच मॉलिश करताना अंतू अचानक हमसाहमशी रडू लागला आणि त्याने आबांच्या पायावर डोके ठेवले. "आबानू, माझ्या उमेदीत लय वंगाळ कामं केली या हातांनी आणि त्याच हातांनी तुमच्यासारख्या पुण्यवान माणसाच्या अंगाला हात लावायची पन माझी लायकी नाय ओ".. पर तरी मी तुमची वाईच सेवा करतोय कारन वर गेलो तर देव मला नरकातच पाटवील पन तडीपार तरी नाय करणार ".

अंतू गेला त्याला आता चार-पाच वर्षे झाली असतील. सटवीने लिहिलेल्या लेखाप्रमाणे अंतू आयुष्य जगून गेला, आयुष्यात अनेक भलीबुरी कामे करत राहिला, अनेक चढउतार पाहिले; पण अखेरच्या दिवसात त्याच्या मनातल्या गुंडगिरीला तडीपार करताना त्याला खूप वेदना होताना मी पाहात होतो. अंतू निघून गेला तरी त्याच्या दुष्कर्मांपेक्षा त्याची चांगला माणूस होण्याची निष्फळ धडपडच जास्त आठवत राहाते.

(लेखक कोकणवर मनस्वी प्रेम करणारा व कोकण टिपणारा आहे.)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com