कोयनेतला थेंबही नाणारला देणार नाही - साळवी

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 19 डिसेंबर 2018

राजापूर - कोयना धरणातील पाणी नाणार प्रकल्पाला उपलब्ध करून देण्यासाठी जलसंपदा विभागाकडून सर्वेक्षण प्रक्रिया सुरू असल्याचे निदर्शनास येताच आमदार राजन साळवी यांनी संतप्त प्रतिक्रिया देत कोयनेतला एक थेंबसुद्धा नाणारला नेऊ देणार नाही. तसेच राज्य शासनाला जाब विचारणार असल्याचे सांगितले.

कोयना प्रकल्पातून जलविद्युतनिर्मितीनंतर वशिष्ठी नदीत सुमद्रसपाटीपासून ४ मीटर तलांकावर कृष्णा खो-यातील कोयना नदीचे ६७.५० अ.घ.कू. पाणी सोडण्यात येते. त्यापैकी बहुतांश पाणी समुद्रात वाहून जाते. त्याअनुषंगाने पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनी हिवाळी अधिवेशनामध्ये सदर पाणी मुंबई व कोकणाला मिळण्यासाठीचा प्रस्ताव मुख्यमंत्र्यांकडे सादर केला होता, परंतु त्यात नाणार रिफायनरीला पाणी देण्यासंदर्भात प्रस्ताव घुसवून नाणार प्रकल्पाला पाणी देण्यासाठी जलसंपदा विभागाकडून घाट घातला जात आहे.

सिंचन वापरासाठी...
कोकणातील सिंचन वापरासाठी हे पाणी वळविणे आवश्‍यक अाहे. त्याबाबत उचित व प्रभावी निर्णय त्वरित होणे अपेक्षित आहे. असे सांगत  या निर्णयामध्ये शासकीय अडवणुकीची भूमिका असू नये, असेही साळवी यांनी या वेळी  बोलून दाखविले.

नाणार प्रकल्प धोकादायक असल्याचे सिद्ध झाले असूनही व स्थानिकांचा विरोध असूनही तसेच हिवाळी अधिवेशन काळामध्ये सभागृहामध्ये मुख्यमंत्र्यांनी भूसंपादनाला स्थगिती जाहीर केली आहे. असे असूनही जलसंपदा विभागाला देण्यात आलेल्या सूचनेनुसार सदर प्रकल्प हट्टाने राबविला जात असल्याचे व जनतेची फसवणूक होत असल्याने पुन्हा एकदा निदर्शनास आले आहे, असे सांगत साळवी यांनी याबाबत तीव्र संताप व्यक्‍त केला.

Web Title: Rajan Salvi comment