राजापूर : जैवविविधतेचे होणार संवर्धन, तयार करणार मास्टरप्लॅन

दुर्मिळ औषधी वनस्पतींची लागवड अन् जतनही
 वनस्पती-झाडे दिवसागणिक दुर्मिळ होत चालली आहेत.
वनस्पती-झाडे दिवसागणिक दुर्मिळ होत चालली आहेत.sakal

राजापूर : वाढती जंगलतोड वा अन्य कारणांमुळे औषधी अन् पर्यावरणपूरक वनस्पती-झाडे दिवसागणिक दुर्मिळ होत चालली आहेत. हे ध्यानी घेऊन कोकणासह अन्य भागात आढळणाऱ्‍या पर्यावरणपूरक औषधी अन् जंगली झाडांसह वनस्पतींची तालुक्यातील अणसुरे ग्रामपंचायतीच्यावतीने लागवड, जतन् अन् संवर्धन करण्यात येणार आहे. या द्वारे जैवविविधतेचे संवर्धन आणि संरक्षण केले जाणार आहे. याचा मास्टरप्लान तयार करण्याचे काम सध्या सुरू असल्याची माहिती पर्यावरणप्रेमी हर्षद तुळपुळे यांनी दिली.

अणसुरे ग्रामपंचायतीच्यावतीने सरपंच रामचंद्र कणेरी, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामविकास अधिकारी राजेंद्रप्रसाद राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली आणि ग्रामस्थांच्या सहकार्याने जैवविविधतता आणि पर्यावरणसंवर्धन करणारे विविधांगी उपक्रम राबवले आहेत. शंभर वर्षापूर्वीच्या अनेक वृक्षांचेही संवर्धन केले आहे. गावच्या जैवविविधतेची माहिती देणारी स्वतःची वेबसाइट तयार करणारी अणसुरे ग्रामपंचायत देशातील पहिली ग्रामपंचायत ठरली आहे. गावामध्ये असलेली जैवविविधता, सद्यःस्थितीमध्ये आढळणाऱ्या वनस्पती पूर्वी आढळत होत्या; मात्र आता आढळत नाहीत. अशा वनस्पती, कोकणातील अन्य

भागामध्ये आढळत असलेल्या मात्र अणसुरे गावामध्ये आढळत नसलेल्या विविध औषधी आणि अन्य वनस्पती, जंगली झाडे यांचे ग्रामपंचायतीच्या माध्यमातून सर्व्हेक्षण करून त्याच्या नोंदी ठेवण्यात आल्या आहेत. त्यामध्ये वनस्पतींचे ''विपुल'', ''सामान्य'', ''दुर्मिळ'', ''अतिदुर्मिळ'' आणि ''अजिबात न आढळणारे'' असे वर्गीकरण करण्यात आले आहे. या सर्व्हेक्षणाच्या आधारे दुर्मिळ, औषधी वनस्पती, जंगली झाडे यांची शास्त्रीय पद्धतीने वृक्षलागवड आणि जतन अन् संवर्धन करण्यात येणार असल्याची माहिती तुळपुळे यांनी दिली. रस्त्याच्याकडेने देवस्थाने, शाळा आदी सार्वजनिक जागांमध्ये लागवड करण्यात येणार आहे. ज्यांची रोपे उपलब्ध होत नाहीत, अशा बियांची रूजवात करणार आहे.

अणसुरेतील दुर्मिळ वनस्पती

पिपळ, नाणा, उंबर, कौशी, भेरली माड, आमण, खुरी, निगडी, पाठा, गोयदोडा, धायटी, पेंढारी, शेगल, रिठा, रूई, बकुळी, घोटी, सोनचाफा, कळम, खोरेती, कहांडळ, बहावा, बाकाळी, गडांबी कांदा, करंज, घोटवेल, पालकंड, जटा, द्रौपदीपुष्प, फोडशी, अनंतमूळ, नभाळी, माका, आषाढ आमरी, रानद्राक्ष, कोकण दुधी, कळमाशी, लाजवंती, सुरण, अंबटवेल, अबई, देवकंद, बुररंबुळा, बंबाकू, हरणदोडी, खाजकुयरी, रानमेथी, मुरूडशेंग, नीललता, काक गांजा, शिरीष, खैर, सोनचिप्पी, आपटा, हिरडा, पारिजातक, हुरा, आरारोठ, गोडा कांदळ, चिकू, भेडशी.

अणसुरेतील अतिदुर्मिळ वनस्पती

काळाधूप, साद्रुक (हाडसांधी), पळस, करमाळी, नागचाफा, फड्या निवडूंग, वायवर्ण, वारस, वावडिंग, बोखाडा, घुरवड, गोविंदी, टेटू, अमरवेल, काळी मुसळी, जांभळी रानहळद, भोकर, झरनी, कापरी कमळ, घावन अळंबी, एकदांडी, ढाल गोधडी, पिवळा कांचन, कोष्ठ कोळींजन, गेळा, डाळफोडी, नीलभोवर, जांभळी भोवर, चिमीन, अंबाडा, बिब्बा, सातवीण, एरंड, रूद्रवंती, खजूर.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com