राजापूर : प्राथमिक शाळांतील पट घटला

राजापूर तालुका; जिल्हा परिषद शाळांची अवस्था चिंतेची, २९ शाळा झाल्या बंद
ZP schools
ZP schoolsesakal

राजापूर : शिक्षणाचा दर्जा वाढावा म्हणून शासनाकडून भौतिक सुविधांच्या उभारणीसह विविधांगी नावीन्यपूर्ण शैक्षणिक उपक्रम राबविले जात आहेत; मात्र तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या शाळांमधील पटसंख्या वर्षागणिक घटत आहे. चार वर्षांपूर्वी तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या शाळांमधील १० हजार ४८२ पटसंख्या होती. चार वर्षांनंतर त्यामध्ये ५ हजार ७२५ एवढी घट झाली असून, आता पट ४ हजार ७२७ आहे. दरवर्षी घटणाऱ्या पटसंख्या जिल्हा परिषदेच्या शाळांसाठी चिंतेची ठरणार आहे.

इंग्रजी आणि सेमी इंग्रजी माध्यमांमधील शिक्षणाकडील विद्यार्थी आणि पालकांचा दिवसागणिक कल वाढत चालला आहे. त्याचा फटका मराठी माध्यमाच्या जिल्हा परिषदेच्या शाळांना बसू लागला आहे. त्याला आळा घालण्यासाठी जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये विविध नावीन्यपूर्ण शैक्षणिक उपक्रम राबविले जातात. त्याच्या जोडीला शाळांमध्ये दर्जेदार भौतिक सुविधाही उपलब्ध करून दिल्या जात आहेत. सेमी इंग्रजीच्या शाळांना विद्यार्थी आणि पालकांची पसंती लक्षात घेता जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये सेमी इंग्रजीचीही मान्यता मिळून अनेक शाळांमध्ये मराठी माध्यमाच्या जोडीने सेमी इंग्रजीचा अभ्यासाचीही शिकवणी घेतली जात आहे, मात्र या साऱ्या शैक्षणिक आणि भौतिक सुविधांचा जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये पटसंख्या वाढण्याच्यादृष्टीने फारसा अनुकूल परिणाम झाल्याचे दिसत नाही.

तालुक्यातील गेल्या पाच वर्षांतील जिल्हा परिषद शाळांमधील पटसंख्येचा विचार करता २०१७-१८ मध्ये १० हजार ४८२ पटसंख्या होती. पुढील तीन वर्षांचापान विचार करता त्या कालावधीमध्ये ही पटसंख्या घटत गेल्याचे चित्र दिसते. २०२०-२१ मध्ये त्या पटसंख्येमध्ये ५ हजार ७२५ एवढी घटताना ती ३ हजार ७२५ एवढी झाली आहे. आठवड्यापूर्वी शाळा सुरू झाल्याने यावर्षीची नेमकी पटसंख्या अद्यापही कळू शकलेली नाही. मात्र चार वर्षातील पटसंख्येचा विचार करताना गतवर्षीच्या तुलनेमध्ये यावर्षी पटसंख्येमध्ये घट होण्याचा प्राथमिक अंदाज शिक्षण विभागाकडून व्यक्त करण्यात येत आहे.

पटसंख्येअभावी बंद झालेल्या शाळा

घटत्या पटसंख्येचा फटका बसून गेल्या नऊ वर्षामध्ये तालुक्यातील २९ शाळा पटसंख्येअभावी बंद करण्यात आल्या आहेत. त्यामध्ये राजापूर बागकाझी उर्दू, वाटूळ नं. २, तिठवली धनगरवाडी, दोनिवडे गौळवाडी, करक नं. ४, मिठगवाणे नं. २, देवाचेगोठणे उंबरवाडी, दसूर उर्दू, अणसुरे नं. १, ओझर उर्दू, सौंदळ नं. ५, सौंदळ ठिकाणकोंड, पांगरी खुर्द नं. २, झर्ये नं. २, केळवली नं. ५, मोरोशी नं. २, विखारेगोठणे धनगरवाडी, गोठणेदोनिवडे नं. ५, तळगाव नं. ३, परूळे नं. १, पाचल नं. ४, ओझर धनगरवाडी, मोसम नं. ३, सागवे हमदारे, निवेली, तिवरे आडीवरे, भंडारसाखरी, मिरगुले पाखडी.

दृष्टिक्षेपात

  • ५ हजार ७२५ ने पट घटला

  • अनेक उपक्रम राबवूनही पटसंख्येत घटच

  • भौतिक सुविधा असूनही पालकांचे दुर्लक्ष

  • खासगी शाळांना प्राधान्य

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com