राजापुरात व्यापाऱ्यांचा कडकडीत बंद

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 6 जून 2017

महाराष्ट्र बंदला पाठिंबा - नागरिकांना फटका, हॉटेल सुरू; शिवसेनेनेही दिली बंदची हाक

राजापूर - शेतकऱ्यांच्या विविध असलेल्या मागण्यांसाठी सुरू असलेल्या शेतकरी संपाचा पुढील टप्पा म्हणून शेतकरी संघटनांनी आज पुकारलेल्या ‘महाराष्ट्र बंद’ला राजापुरातील व्यापाऱ्यांनी प्रतिसाद दिला. शिवसेनेनेही व्यापाऱ्यांना बाजारपेठ बंद ठेवण्याची हाक दिली होती. त्यातून नेहमी गजबजली राजापूर बाजारपेठ आज सकाळपासून बंद होती; मात्र पावसाळ्यापूर्वीची खरेदी करण्यासाठी आलेल्या नागरिकांना याचा फटका बसला.

शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी, कायद्याने उत्पादन खर्चावर आधारित भाव आदी मागण्यांसाठी विविध शेतकरी संघटनांनी संप पुकारला आहे. संप मागे घेण्यासाठी शासनाने संपकरी शेतकऱ्यांच्या संघटनांशी चर्चा करून अल्पभूधारक शेतकऱ्यांची कर्जमुक्ती करण्याची घोषणा केली. या घोषणेनंतरही समाधान न झालेल्या शेतकरी संघटनांनी संप करण्याचा निर्धार कायम ठेवला आहे. त्या पार्श्‍वभूमीवर आज शेतकरी संघटनांनी ‘महाराष्ट्र बंद’ची हाक दिली होती. त्याला राज्याच्या विविध भागांमध्ये प्रतिसाद मिळाला.

शिवसेनेने बाजारपेठ बंद करण्याचे येथील व्यापाऱ्यांना आवाहन केले होते. त्याला प्रतिसाद देत राजापूर शहरातील व्यापाऱ्यांनीही दुकाने बंद ठेवली होती. नेहमी गजबजलेली बाजारपेठ सकाळपासून बंद होती. बाजारपेठेतील दुकाने बंद असली तरी हॉटेल व्यवसायिकांनी हॉटेल सुरू ठेवली होती. 
आमदार राजन साळवी यांच्यासह शिवसेनेच्या पदाधिकारी आणि शिवसैनिकांनी बाजारपेठेत सकाळी फेरफटका मारला. यावेळी तालुकाप्रमुख प्रकाश कुवळेकर, शहरप्रमुख संजय पवार, युवा सेनेचे तालुकाधिकारी प्रफुल्ल लांजेकर, पंचायत समितीचे सभापती सुभाष गुरव, माजी नगरसेवक नरेंद्र कोंबेकर, नगरसेवक अनिल कुडाळी, प्रवीण मासये, पंचायत समितीचे माजी उपसभापती उमेश पराडकर आदी उपस्थित होते.

पाचल बाजारपेठ सुरू
संपाला शहरातील व्यापाऱ्यांनी साथ देताना बाजारपेठ बंद ठेवली होती; मात्र पाचल बाजारपेठ आज नेहमीप्रमाणे सुरू होती.

विविध मागण्यांसाठी शेतकऱ्यांनी पुकारलेल्या संपाला राजापुरातील व्यापाऱ्यांचा पाठिंबा आहे. आमदार राजन साळवी यांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत राजापूर बंद ठेवले. भविष्यात अशाप्रकारची आंदोलने छेडताना व्यापाऱ्यांना विश्‍वासात घेणे गरजेचे आहे. शेतकऱ्यांचे प्रश्‍न मार्गी लावायचे असतील तर शिवसेनेने विधानसभा आणि लोकसभेमध्ये आवाज उठवावा.
- निजाम काझी, अध्यक्ष, राजापूर तालुका व्यापारी संघटना

Web Title: rajapur konkan news ban in rajapur by businessman