जैतापूर विरोधात आंदोलनाची भट्टी धगधगणार

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 20 ऑगस्ट 2017

राजापूर - तालुक्‍यातील माडबन येथे केंद्र शासनातर्फे उभारल्या जात असलेल्या जैतापूर अणुऊर्जा प्रकल्पाचा विरोध मावळल्याचे सांगितले जात आहे. मात्र, अनेक महिन्यांच्या विश्रांतीनंतर प्रकल्पग्रस्तांनी आंदोलनाचे अस्त्र उगारले आहे. उद्या (ता. २०) प्रकल्पविरोधी जनहक्क सेवा समितीच्या नेतृत्वाखाली माडबन प्रकल्प येथे जेलभरो आंदोलन छेडले जाणार आहे. ‘जैतापूर’ विरोधाची भट्टी पुन्हा एकदा धगधगणार आहे.

या जेलभरो आंदोलनामुळे पोलिस यंत्रणाही सक्रिय आणि सतर्क झाल्याची माहिती नाटेचे सहायक पोलिस निरीक्षक प्रकाश धेंडे यांनी दिली. दहा-पंधरा लोकांना आंदोलनाच्या पार्श्‍वभूमीवर प्रतिबंधात्मक नोटीसही बजावण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

तालुक्‍यातील माडबन येथे केंद्र शासनातर्फे जैतापूर अणुऊर्जा प्रकल्पाची उभारणी केली जात आहे. या प्रकल्पामुळे विविध मार्गांनी होणारे प्रदूषण आणि अन्य कारणांमुळे हा परिसरच नव्हे, तर संपूर्ण कोकण परिसर उद्‌ध्वस्त होण्याची भीती व्यक्त करीत प्रकल्पग्रस्तांकडून गेले दशकभर प्रकल्पविरोधी आंदोलने छेडली आहेत. या आंदोलनांना अनेक वेळा यश मिळाले. तबरेज सायेकर या आंदोलकाचा पोलिसांनी केलेल्या गोळीबारामध्ये मृत्यूही ओढवला आहे. काही वेळा आंदोलनाला हिंसक वळण लागले. पोलिस चौकी जाळण्यात आली. या साऱ्या घडामोडींचा, प्रकल्पविरोधी आंदोलनाचा शिवसेनेला फायदा झाला. गेली दहा वर्षे आंदोलन कधी धगधगते, तर कधी शांत होते. अनेक प्रकल्पग्रस्तांनी शासनाकडून जमिनीच्या मोबदल्यांचे धनादेश स्वीकारले. त्यामुळे प्रकल्पाचा विरोध गेल्या काही महिन्यांमध्ये निवळल्याचे चित्र होते. मात्र, उद्या होणाऱ्या आंदोलनामध्ये प्रकल्पग्रस्त शेतकरी, मच्छीमार बांधव, आंबा बागायतदार मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत. प्रकल्पाला असलेला विरोध अद्यापही ठाम आहे, हे उद्या आम्ही दाखवून देऊ, असे जनहक्क समितीच्या एका पदाधिकाऱ्याने सांगितले. आंदोलनामुळे रत्नागिरी मुख्यालयातून जादा पोलिस कुमक मागविण्यात आली आहे. 

Web Title: rajapur konkan news jaitapur oppose agitation