गाळाने होरली जैतापूरची खाडी

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 13 सप्टेंबर 2017

राजापूर - विजयदुर्ग खाडीपट्ट्यामध्ये येणाऱ्या जैतापूरचा भाग, साखरीनाटे बंदर गेल्या कित्येक वर्षांपासून गाळात रुतले आहे. त्यामुळे इतिहासकालीन जैतापूरची खाडी नावापुरतीच उरली. गाळ उपसण्याकडे दुर्लक्ष झाल्याने दिवसेंदिवस गाळ वाढतच आहे. वारंवार होणारी राजकीय स्थित्यंतरे आणि बदलते नेते यामुळे गाळाचा प्रश्‍न निकाली निघेल ही मच्छीमारांची आशा आता संपली आहे.

साखरीनाटे, सागवे, अणुसरे, कातळी, नाणार, दांडेअणसुरे आदी किनारी भाग तालुक्‍यात आहेत. येथे मोठ्या प्रमाणात मच्छीमारी चालते. दररोज लाखो रुपयांची उलाढाल होते. या व्यवसायात दहा हजारहून अधिक लोकांना रोजगार मिळत आहे. या किनारपट्टीला ब्रिटिशकालीन इतिहासाचाही वारसा लाभला आहे. ब्रिटिश काळामध्ये राजापुरातून व्यापार चालत असे. तेव्हा जैतापूर खाडीतून मोठमोठी जहाजे आणि गलबते राजापूर बंदरामध्ये येत. त्यामुळे खाडी परिसराला विशेष महत्त्व होते. जैतापूर खाडी खोल होती. कालपरत्वे त्यामध्ये गाळ साचत आला. तो उपसण्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. त्यामुळे ही वाहतूक थंडावली. राज्यामध्ये राजकीय स्थित्यंतरे झाली. तेव्हा खाडीचे भाग्य उजळेल अशी मच्छीमारांची अपेक्षा होती. ती फोल ठरली.

खाडीच्या मुखाचा गाळ उपसणे आवश्‍यक
साखरीनाटे बंदरासह जैतापूर खाडीमध्ये साचलेला गाळ मच्छीमारांच्या दृष्टीने उपसा होणे गरजेचे आहे. राजापूर शहरामध्ये अर्जुना आणि कोदवली नद्यांना वारंवार पूरही या गाळामुळे येतात. या नद्यांतील काही गाळ उपसला गेला. मात्र जैतापूर खाडीच्या मुखाशी असलेला गाळ अद्यापही तसाच आहे. तो उपसला गेला पाहिजे.

अनेक राजकीय स्थित्यंतरे झाली. त्या-त्या वेळी बंदरातील गाळ उपशाचा प्रश्‍न निकाली काढण्याचे आश्‍वासने अनेकांनी दिली. ती हवेतच विरली. अद्यापही गाळ तसाच. या प्रश्‍नाकडे कोणी गांभीर्याने लक्ष देईल का?
- मुश्‍ताक सोलकर, साखरीनाटे

Web Title: rajapur konkan news mud in Jaitapur creek