खोंडकिडा पडलेल्या कलमांचे सर्वेक्षण सुरू

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 22 ऑगस्ट 2017

राजापूर - आंब्यासह काजू कलमावर खोंडकिड्याच्या प्रादुर्भावाने बागायतदार हवालदिल झाले आहेत. यावर दै. ‘सकाळ’ने (ता. १९) सचित्र बातमी प्रकाशित करून टाकलेल्या प्रकाशझोतानंतर कृषी विभागाने तत्काळ याची दखल घेतली व खोंडकिडा पडलेल्या झाडांचे तातडीने सर्वेक्षण सुरू केले, अशी माहिती प्रभारी तालुका कृषी अधिकारी भाऊसाहेब वाळके यांनी दिली.

सर्वेक्षणानंतर तालुक्‍यात आंबा कलमांवर झालेल्या खोंडकिड्याच्या प्रादुर्भावाचे आणि झालेल्या नुकसानाचे नेमके चित्र समोर येईल. शासनाने फलोत्पादन जिल्हा म्हणून केलेल्या घोषणेचा फायदा घेत जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांनी आंबा, काजू कलमांची शेकडो एकरात लागवड केली आहे. डोंगरासह जंगल सपाट करीत जिल्ह्यातील अनेक भागांमध्ये आंबा, काजूच्या बागा विकसित झाल्या आहेत. त्यामध्ये तालुक्‍यात झालेल्या लागवडीचाही समावेश आहे. तालुक्‍याच्या आर्थिक उत्पन्नामध्ये सिंहाचा वाटा उचलणाऱ्या आंबा कलमांना सध्या खोंडकिड्याने पोखरल्याने शेतकरी चिंताग्रस्त आहे. गेल्या काही महिन्यांपासून खोंडकिड्याच्या प्रभावामुळे झाडांच्या फांद्या मरू लागल्या. काही ठिकाणी संपूर्ण झाडच मरू लागले आहे. पावसाळ्यामध्ये खोंडकिड्याचा झाडांवर जास्त प्रभाव दिसत आहे.

गेली दोन वर्षे सातत्याने तालुक्‍यामध्ये आंबा कलमांवर खोंडकिड्याचा प्रादुर्भाव झाला आहे. आधीच यावर्षी प्रतिकूल हवामान आणि अन्य कारणांमुळे आंब्याचे कमी उत्पन्न आल्याने बागायतदार नुकसानीत आले होते. खोंडकिड्याच्या प्रादुर्भावाने त्यामध्ये भरच पडली. 

ज्या शेतकऱ्यांच्या आंबा, काजू कलमांना खोंडकिड्याच्या प्रादुर्भावाने ग्रासले आहे, त्या झाडावर योग्य औषधांची फवारणी केल्यास खोंडकिड्याचा झाडावरील प्रभाव कमी होतो. त्यामुळे झाडावर योग्य त्या औषधांची फवारणी करण्याच्या अनुषंगाने सल्ला घेण्यासाठी शेतकऱ्यांनी तालुका कृषी कार्यालयाशी संपर्क साधावा. 
- भाऊसाहेब वाळके, प्रभारी तालुका कृषी अधिकारी

Web Title: rajapur konkan news survey to khondkida mango tree