राजापूर पालिकेत पाणी प्रश्‍न पेटला

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 27 एप्रिल 2017

राजापूर - शहरातील अनियमित, अवेळी पाणीपुरवठ्यावरून पालिकेची आजची विशेष सभा गाजली. सभागृहामध्ये शहराचा पाणी प्रश्‍न पेटला. टंचाईकाळातील पाणीपुरवठा नियोजनावरून सत्ताधारी नगरसेवकांसह शिवसेना-भाजपच्या नगरसेवकांनी प्रशासनाला धारेवर धरले. शहरवासीयांना दिवसाआड पाणीपुरवठा करण्यात प्रशासन साफ अपयशी ठरल्याबद्दल नगरसेवकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.

राजापूर - शहरातील अनियमित, अवेळी पाणीपुरवठ्यावरून पालिकेची आजची विशेष सभा गाजली. सभागृहामध्ये शहराचा पाणी प्रश्‍न पेटला. टंचाईकाळातील पाणीपुरवठा नियोजनावरून सत्ताधारी नगरसेवकांसह शिवसेना-भाजपच्या नगरसेवकांनी प्रशासनाला धारेवर धरले. शहरवासीयांना दिवसाआड पाणीपुरवठा करण्यात प्रशासन साफ अपयशी ठरल्याबद्दल नगरसेवकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.

टंचाई काळामध्ये लोकांना सुरळीत पाणीपुरवठा करण्यासाठी प्रशासनाकडून योग्य उपाययोजना कराव्यात, असे आदेश नगराध्यक्ष हनिफ काझी यांनी प्रशासनाला दिले. या सभेमध्ये कोंढेतेड पुलाच्या जोडरस्त्याच्या कामाच्या नूतन आराखड्यासह त्यांच्या आर्थिक तरतुदीलाही यावेळी मंजुरी देण्यात आली.  

पाणीटंचाईवर उपाययोजना करताना शहरामध्ये दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचे नियोजन करण्यात आले. मात्र, प्रशासनाचे हे नियोजनही बिघडले. यावरून पालिकेच्या विशेष सभेमध्ये सत्ताधाऱ्यांसह विरोधकांनीही प्रशासनाला धारेवर धरले. सुरवातीला जलस्रोताच्या येथून पाणी खेचणारे पालिकेचे पंप सध्या बंद असून त्याकडे विरोधी गटनेते विनय गुरव यांनी लक्ष वेधले. पाणीपुरवठ्याबाबत प्रशासन गंभीर नसल्याची टीका केली. शहरातील अनेक भागांमध्ये चार-चार दिवसानंतर पाणी येत असून जे पाणी येते ते कमी दाबाने येत असल्याचे उपनगराध्यक्ष जमीर खलिफे यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणून दिले. दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचे प्रशासनाचे नियोजन पार कोलमडल्याचे त्यांनी सांगितले. अवेळी होणाऱ्या पाणीपुरवठ्याबाबत प्रशासनाकडून लोकांना कोणतीही पूर्वकल्पना दिली जात नाही. यावर तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली. प्रशासनाच्या खुलाशाने समाधान न झाल्याने विरोधी गटनेते विनय गुरव, अनिल कुडाळी, भाजपचे नगरसेवक गोविंद चव्हाण, सेनेच्या नगरसेविका शुभांगी सोलगावकर, स्वाती बोटले, पूजा मयेकर आदींनी पाणीपुरवठ्यामधील अडचणींवर मात करून वेळेत पाणीपुरवठा व्हावा, अशी मागणी केली. 

कालावधीवर आक्षेप
प्रधानमंत्री आवास घरकुल योजनेबाबत लोकांना आधी माहिती देऊन प्रस्ताव घेतात. त्याची माहिती सभागृहाला उशिरा दिले जाते. याबद्दल काँग्रेसचे नगरसेवक सुभाष बाकाळकर यांनी आक्षेप घेतला. त्याच्या अंमलबजावणीबाबतही तीव्र नाराजी व्यक्त झाली.

पुलाच्या कामाबाबत नाराजी
कोंढेतड पुलाच्या जोडरस्त्याच्या आराखड्यासह निधीच्या तरतुदीला मंजुरी देण्यात आली. यावेळी पुलाच्या झालेल्या कामावर सेनेचे नगरसेवक सौरभ खडपे, विरोधी गटनेते श्री. गुरव आदींनी आक्षेप घेतला. जोडरस्त्याचे काम होताना गटार लाइन आणि पाणी लाइनचाही विचार व्हावा, अशी सूचना सुलतान ठाकूर यांनी मांडली.

Web Title: Rajapur Municipal Corporation water issue