माडबनला घुमला जैतापूर प्रकल्पग्रस्तांचा एल्गार 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 21 ऑगस्ट 2017

राजापूर - "जमीन आमच्या हक्काची, नाही कोणाच्या बापाची', "भारत सरकार होश मे आओ, जैतापूर प्रकल्प रद्द करो', अशा जोरदार घोषणा देत जैतापूर प्रकल्पग्रस्त, मच्छीमारांनी आज जेलभरो आंदोलन छेडले. माडबन तिठ्याच्या माळरानावर झालेल्या छोटेखानी सभेत जैतापूर प्रकल्प रद्द करण्याचा निर्धार करताना प्रकल्प रद्द होईपर्यंत प्रकल्पविरोधी लढा कायम ठेवण्याचा निर्धार केला. साखरीनाटे येथील मच्छीमार बांधवांसह महिलांची संख्या लक्षणीय होती. आंदोलन करणाऱ्या 769 जणांना अटक करून नंतर सोडले. 

नाटे ते माडबन तिठा असा सुमारे पाच कि.मी. आल्यानंतर माडबन तिठा येथे रॅलीचे रूपांतर छोटेखानी सभेत झाले. सभेत खासदार विनायक राऊत, आमदार राजन साळवी, शिवसेनेच जिल्हाप्रमुख राजेंद्र महाडिक, मच्छीमार नेते अमजद बोरकर, जनहक्क समितीचे अध्यक्ष सत्यजित चव्हाण आदींनी मार्गदर्शन केले. 

नाटे येथून जेलभरो आंदोलनाला सुरवात झाली. सुमारे पाच किमीचा प्रवास पायी वा गाडीच्या साह्याने करीत आंदोलक माडबन तिठा येथे दाखल झाले. या दरम्यानच्या प्रवासामध्ये आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी केली. प्रकल्प रद्द झालाच पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली. माडबन येथे छोटेखानी सभा झाली. 

आमदार श्री. साळवी यांनी स्थानिक जनतेसह प्रकल्पग्रस्तांच्या बाजूने शिवसेना उभी असून भविष्यामध्येही शिवसेनेची भूमिका कायम राहणार असल्याचे सांगितले. शिवसेनेचे जिल्हाप्रमुख राजेंद्र महाडिक, मच्छीमार नेते अमजद बोरकर आदींनी प्रकल्प रद्द होईपर्यंत लढा कायम ठेवण्याचा निर्धार व्यक्त केला. त्यानंतर आंदोलकांनी स्वतःला अटक करून घेतली. आंदोलनामध्ये शिवसेनेचे तालुकाप्रमुख प्रकाश कुवळेकर, जिल्हा परिषदेचे शिक्षण सभापती दीपक नागले, पंचायत समितीचे सभापती सुभाष गुरव, उपसभापती अश्‍विनी शिवणेकर, जिल्हा परिषद सदस्य सोनम बावकर, लक्ष्मी शिवलकर, भारती सरवणकर, पंचायत समितीचे माजी उपसभापती उमेश पराडकर, मच्छीमार नेते श्री. बोरकर, पंचायत समिती सदस्य प्रकाश गुरव, नगरसेवक सौरभ खडपे, संतोष हातणकर, राजा काजवे, पंचायत समिती सदस्य प्रशांत गावकर, जितेंद्र तुळसावडेकर आदी मोठ्या संख्येने आंदोलक सहभागी झाले होते. प्रशासनाने आंदोलकांना वीस एसटी गाड्यांमधून साखर हायस्कूल येथे आणून त्यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई केली आणि नंतर सोडून दिले. आंदोलनामध्ये कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिस आणि प्रशासकीय यंत्रणा सतर्क होती. 

नाटे बाजारपेठही बंद 
जेलभरो आंदोलनामध्ये मोठ्या संख्येने मच्छीमार सहभागी झाले होते. त्यामुळे नेहमी गजबजलेल्या नाटे बंदरामध्ये आज शुकशुकाट होता. मच्छीमारांनी होड्या बंदरामध्ये नांगरून आंदोलनात सहभागी होण्यास प्राधान्य दिले. नाटे बाजारपेठही बंद होती. 

Web Title: rajapur news Jaitapur project affected