दुर्मीळ पतंगांचा राजापुरात अधिवास...

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 4 ऑगस्ट 2017

‘ॲक्‍टियास ल्युना’ची वैशिष्ट्ये 
 जीवनमान सुमारे पंधरा दिवस
पंखांचा रंग फिकट पोपटी
पंखाची रचना चंद्राच्या कलेप्रमाणे 
पंखांवरील चंद्राची कला सातच दिवसांत पूर्ण

राजापूर - तालुक्‍यातील विखारेगोठणे येथील आबासाहेब मराठे महाविद्यालयाच्या वनस्पतीशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. शकील शेख आणि प्रा. एस. पी. गुजर यांना ‘ॲक्‍टियास ल्युना’ हा अतिशय देखणे निशाचार प्रजातीच पतंग मुंबई-गोवा महामार्गवरील हातिवले येथे एका दगडावर आढळला; तर आडिवरे येथील ॲड. समीर कुंटे यांना त्यांच्या घराच्या परिसरामध्ये ‘सिल्क मॉथ’ हा पतंग सापडला. प्रामुख्याने उत्तर अमेरिकेमध्ये आढळणाऱ्या या फुलपाखरासह ‘ॲटलास’ ही दुर्मिळ प्रजातीही गेल्या वर्षापासून तालुक्‍यात सापडत आहे.

गतवर्षी तालुक्‍यामध्ये आऊल मॉथ पंचवीस, मून मॉथ शहचाळीस, सिल्क मॉथ अठरा, तर दुर्मिळ प्रजाती असलेल्या ॲटलास पतंग अशी चार सापडली होती. मुंबई-गोवा महामार्गावरील हातिवले येथे सायंकाळी फिरण्यासाठी गेले असता डॉ. शेख आणि प्रा. गुजर यांना हे पतंग सापडले. त्यांनी तत्काळ पाहणी करून त्याला नैसर्गिक अधिवासात ठेवण्याला पसंती दिली. ‘सॅंटरनिडी’ कुळातील असलेल्या पतंगाचे सुमारे बारा ते पंधरा दिवसांचे जीवनमान असते. या पतंगाच्या दोन पंखांमधील अंतर साधारणतः तेरा ते सोळा सेंमी असते. त्याच्या शेपटीचा रंग आणि लांबीवर तो नर आहे की मादी याचे निदान करणे अधिक सोईस्कर ठरते. त्याच्या पंखावर चंद्रासारखे गोल असतात. ते कलेकलेने वाढत जाऊन त्याचा पूर्ण चंद्र होतो. चंद्राची कला पूर्ण होण्यासाठी पंधरा दिवसांचा कालावधी जातो; मात्र ‘ल्युना’ पतंगाच्या पंखावरील चंद्राची कला पूर्ण होण्यासाठी सात दिवसांचा कालावधी जातो. म्हणून त्याला ‘ल्युना मॉथ’ असे टोपणनाव पडले. राजापूर तालुक्‍यामध्ये सापडलेल्या पतंगाच्या दोन पंखामधील अंतर १२ सेंमी. आहे.

सह्याद्रीच्या पट्ट्यातील जैवविविधतेचा वारसा राजापूरला लाभला. अनुकूल वातावरणामुळे तालुक्‍यामध्ये विविध दुर्मिळ पक्षी, प्राण्यांचे वास्तव्य आढळते. तालुक्‍यातील जैवविविधततेचा अभ्यास होणे गरजेचे आहे.
- धनंजय मराठे, पक्षिमित्र

Web Title: rajapur news moth rajapur