वाचनसंस्कृती वाढीला व्हॉटस्‌ ॲपचा आधार

राजेंद्र बाईत
गुरुवार, 3 ऑगस्ट 2017

राजापूर - वाचनाची आवड कमी होत आहे; मात्र वाचनसंस्कृती वाढविण्यासाठी सोशल मीडियाचा नामी उपयोग कलासक्त आणि बहुआयामी दीपक कांबळे या शिक्षकाने केला आहे. त्यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या ‘वाचू आनंदे’ या व्हॉटस्‌ ॲप ग्रुपच्या माध्यमातून विविध प्रकारचे साहित्य शेअर केले जाते. त्यामुळे सहज वेळ मिळेल तेव्हा अनेकांना व्हॉटस्‌ ॲपद्वारे वाचनाची आवड जोपासता येते.  

खरवते येथील शिक्षक श्री. कांबळे यांनी ‘वाचू आनंदे’ या व्हॉटस्‌ ॲप ग्रुपची निर्मिती केली. यामध्ये अठरा वर्षांच्या युवक-युवतींसह साठ-पासष्टीच्या वृद्धांपर्यंत साऱ्यांचा समावेश आहे. साहित्यिक, शिक्षक, सामाजिक कार्यकर्ते, महिला-पुरुष, डॉक्‍टर, विविध क्षेत्रातील उच्चपदस्थ अधिकाऱ्यांचाही समावेश आहे. या ग्रुपवर  ‘हाय... हॅलो.. गुड मॉर्निंग... गुड नाईट... विनोदी किस्से, सुभाषिते, शुभेच्छा’ आदीला बायबाय करण्यात आला आहे. केवळ साहित्यमूल्य असलेलीच पोस्ट केली जाते. कथा, कादंबरी, ललितलेखन, प्रवासवर्णन, विज्ञानावर आधारित कथा, चरित्र उद्‌बोधनात्मक साहित्य वा लेख, वैचारिक आणि जीवनावश्‍यक लेख, अशा विषयांवरील वाचनीय पोष्टचा समावेश असतो. या ग्रुपमुळे अनेकांना आपापल्या सवडीनुसार वाचन करण्याची संधी मिळाली आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून आपले साहित्य किंवा लिखाण वाचकांपर्यंत पोचविण्याचे हक्काचे व्यासपीठ नव्या साहित्यिकांना उपलब्ध झाले आहे. व्यासंगी लेखन करणाऱ्यांना आजूबाजूचा परिसरासह समाजातील स्पंदने, घडामोडी शब्दबद्ध करण्याची नवी प्रेरणा देत आहे. 

जानेवारी १७ मध्ये ग्रुप तयार झाला. सध्या या ग्रुपचे अकरा उपभाग तयार झाले आहेत. मुख्य आणि सब ग्रुपचे मिळून अडीच हजाराहून अधिक सदस्य आहेत. 

सोशल मीडियाद्वारे वाचन संस्कृती वाढविण्यासाठी ‘वाचू आनंदे’ या ग्रुपची निर्मिती झाली. वाचनासाठी फारसा वेळ देता येत नाही, अशी सबब नको. स्मार्ट फोनद्वारे कोणत्याही वेळी वाचता येऊ शकते. या ग्रुपचा एवढा मोठा विस्तार होईल असे अपेक्षित नव्हते. भविष्यामध्ये या ग्रुपच्या माध्यमातून ग्रामीण आणि बोलीभाषेतील साहित्याला अधिक स्थान देऊन तिचा प्रसार करण्याचा प्रयत्न आहे.

- दीपक कांबळे, ग्रुप ॲडमिन

Web Title: rajapur news whatsapp reading deepak kamble