esakal | लय भारी! हापुसच्या गावात पिकवला परदेशी 'रामबुतान'; कोकणी शेतकऱ्याचा प्रयोग
sakal

बोलून बातमी शोधा

लय भारी! हापुसच्या गावात पिकवला परदेशी 'रामबुतान'

कोकणातील बदलत्या हवामानात देखील चांगले उत्पादन मिळाल्यामुळे येथील शेतकऱ्यांसाठी हा चांगला पर्याय मानला जात आहे.

लय भारी! हापुसच्या गावात पिकवला परदेशी 'रामबुतान'

sakal_logo
By
एकनाथ पवार

वैभववाडी : हापुस आंब्याचा गावात चक्क परदेशी रामबुतान फळझाडांची व्यावसायिक शेती करण्याचा धाडसी प्रयोग मणचे (ता. देवगड) येथील नासीर जैनुद्दीन सोलकर यांनी यशस्वी केला आहे. त्यामुळे एनर्जी आणि विविध औषधी गुणधर्मामुळे ओळखल्या जाणाऱ्या परदेशी रामबुतानची चव आता स्थानिकांना स्वस्तात चाखता येणार आहे. कोकणातील बदलत्या हवामानात देखील चांगले उत्पादन मिळाल्यामुळे येथील शेतकऱ्यांसाठी हा चांगला पर्याय मानला जात आहे.

मलेशिया, थायलंड, इंडोनिशिया या देशांमध्ये रामबुतान (राम्बुतान) या फळपिकाचे मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतले जाते. गेल्या काही वर्षांत केरळ, कर्नाटकच्या काही भागांतही या फळपिकांची लागवड करण्यात आली आहे; परंतु महाराष्ट्रात या फळझाडाची लागवड केल्याचे अद्याप ऐकवात नाही; परंतु हे धाडस मणचे येथील सोलकर या तरूण शेतकऱ्‍याने केले आहे.

हेही वाचा: समुद्रात तयार होतायत ऑक्सिजन विरहित झोन; तारले होतेय इतिहासजमा

२०१५ मध्ये या शेतकऱ्याने केरळ येथील कांजिरापल्ली (जि.कोट्टयम) येथील रोपवाटिकेतून प्रतिरोप ३०० रूपये प्रमाणे रामबुतानची १५० रोपे आणली. ही रोपे आणण्यासाठी त्यांनी तब्बल २५ हजार रुपये गाडीभाडे दिले. श्री. सोलकर यांची गावांपासून काही अंतरावर असलेल्या पेंढरी येथे दहा एकर जमीन आहे. यातील उताराच्या दोन एकरमध्ये त्यांनी १५ बाय १५ फुट अंतरावर लागवड केली. झाडांना पाणी देण्यासाठी ठिबक सिंचनचा वापर त्यांनी केला.

आंबा, काजू पिकांचा अनुभव त्यांच्या गाठीशी होता; परंतु हे पीक त्यांना नवखे होते. लागवडीला दोन वर्षे झाल्यानंतर सोलकर यांची धाकधुक वाढली. लागवड केलेली रामबुतानच्या झाडांना फळे येतील की नाही? अशी हलचल निर्माण झाली. त्यामुळे त्यांनी पर्याय म्हणुन काजुची झाडे लावली; मात्र ज्यावर्षी काजू रोपे लावली त्याच वर्षी अर्थात तिसऱ्या वर्षी रामबुतानला मोहोर आला. फळे दिसू लागली आणि परिपक्वही झाली. त्यामुळे त्यांना हायसे वाटले. तिसऱ्या वर्षी १० किलो फळे त्यांना मिळाली. चौथ्या वर्षी ५० किलो फळे त्यांना मिळाली.

हेही वाचा: 'तिसरी लाट येऊ नये, पण आपण सज्ज राहूया'; फडणवीसांचे आवाहन

यावर्षी त्यांना तब्बल ४५० किलो फळे मिळाली. हे झाड जसे जसे वाढत जाईल तसतसे त्यांच्या उत्पादनात वाढ होत जाणार आहे. झाडाची पूर्ण वाढ झाल्यानंतर प्रति झाड २०० ते ३०० किलो फळे देते. बदलत्या वातावरणामुळे कोकणातील शेतकऱ्यांसमोर फळपिके टिकविण्याचे आव्हान असून नव्या पर्यायाच्या शोधात शेतकरी आहेत. यावर्षी अवकाळी पाऊस, वादळ अशा वातावरणात हे पीक उत्पादन आल्यामुळे शेतकऱ्यांसाठी रामबुतान एक भक्कम पर्याय ठरण्याची शक्यता आहे.

कसे पडले नाव?

मलाई भाषेत केसांना ‘राम्बु’ असे म्हटले जाते. या फळांच्या सालीवर केसासारखे आवरण असल्यामुळे त्याला ‘राम्बुतान’ असे नाव पडले आहे.

अशी आहे चव

हे फळ लिची फळाप्रमाणे रसाळ व पांढरे दिसते. आतील गर थोडा आंबट व गोड असतो. फळाची बी देखील खाल्ली जाते. त्याची चव काहीशी बदामाप्रमाणे असते. या फळांमध्ये कॅलशियमचे प्रमाण चांगले आहे. याशिवाय प्रोटीन, फायबर, आर्यन, फॉस्फरस, झिंक, कॉपर, मॅगनीज आदींचे संतुलित प्रमाण आहे. आरोग्य तज्ज्ञांच्या मते, हे फळ मधुमेह रूग्णांसाठी वापरतात.

हेही वाचा: शिवसेना पदाधिकाऱ्याच्या थेट अंगणात बिबट्या; कुत्र्यांवर मारली झडप

"नासीर सोलकर या तरूण शेतकऱ्याने केलेला प्रयोग कौतुकास्पद असून फळाची चव आम्ही चाखली आहे. उत्तम दर्जाची फळे असुन कोकणातील शेतकऱ्यांसाठी ‘रामबुतान’ लागवड हा चांगला पर्याय भविष्यात ठरू शकतो."

- डॉ. प्रदीप हळदवणेकर, सहयोगी अधिष्ठाता, उद्यान महाविद्यालय, मुळदे

"दर्जेदार उत्पादन मिळाल्यामुळे कोकणातील वातावरण हे ‘रामबुतान’साठी योग्य असल्याचे सिद्ध झाले आहे. येथील शेतकऱ्यांसाठी हा चांगला पर्याय ठरणार आहे. ‘रामबुतान’ची रोपवाटीका निर्माण करण्याचा आपला प्रयत्न आहे."

- नासीर सोलकर, शेतकरी, मणचे

लागवडीची वैशिष्ट्ये

  • किटकनाशकाची फवारणी नाही

  • झाडाच्या पूर्ण वाढीनंतर प्रतिझाड २०० ते ३०० किलो फळे

  • प्रतिकिलोला साधारणपणे ३०० ते ४०० रूपये दर

  • परदेशातून येणाऱ्या फळाचा दर प्रतिकिलो ११०० रुपयांपर्यंत

  • कोकणात डिसेंबर ते मे हा हंगाम, तर केरळमध्ये फेब्रुवारी ते जुलै

  • फळ झाडावरच परिपक्व

  • २१ दिवसांपर्यंत टिकाऊपणा

  • काढणीनंतर आठ ते दहा दिवस खाण्यायोग्य

  • ‘तौक्ते’ वादळात झाडांचे नुकसान नाही

loading image
go to top