रत्नागिरी जिल्ह्यात काँग्रेसला गणतीत धरत नाहीत - रमेश कदम

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 24 डिसेंबर 2018

चिपळूण - जिल्ह्यात विरोधी पक्ष कॉंग्रेसला गणतीत धरत नाहीत, अशी स्थिती आहे. राज्यपातळीवर आघाडी करण्याचा निर्णय घेतला जातो. मात्र जिल्हास्तरावर निर्णय घेण्यास आम्ही समर्थ आहोत. स्थानिक स्वराज्य संस्थाच्या आगामी निवडणुका स्वबळावर लढवायच्या आहेत. तरच पक्षाचे चिन्ह घराघरात पोहोचेल, असे प्रतिपादन काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष रमेश कदम यांनी तालुका मेळाव्यात व्यक्त केले. 

शहरातील ब्राह्मण सहाय्यक संघात आज तालुका काँग्रेसचा कार्यकर्ता मेळावा झाला. यावेळी कदम म्हणाले, यापुढे काम पाहूनच कार्यकर्त्यांना पदे दिले जातील, यामध्ये भेदभाव होणार नाही. काँग्रेसचा हात पुन्हा बळकट करायचा आहे. आपली ताकद दाखविल्याशिवाय गणती होणार नाही. जिल्ह्यात संयुक्त निवडणुका लढल्याने पक्ष तळागाळात पोचला नाही. त्यामुळे आता अडचणी वाढल्या आहेत. यापुढे तालुक्‍यात संयुक्त दौरा करून बैठका घेऊन बारकाईने लक्ष दिले जाईल. विधानसभा निवडणुकीत मित्र पक्षाच्या उमेदवाराने आमच्या कार्यकर्त्यासमोर बसावे. किती निधी देणार ते जाहीर करावे. तरच आम्ही त्यांचे काम करू. त्याशिवाय आपली दखल घेतली जाणार नाही. 

तालुकाध्यक्ष यादव म्हणाले, विरोधी पक्षाच्या तुलनेत आपण खूपच मागे आहोत. याचा विचार करावा लागेल. मागचे दिवस फार उगाळून चालणार नाही. तालुक्‍यात आपली यंत्रणा घट्ट नाही. ती उभारावी लागणार आहे. सर्वसामान्याच्या प्रश्‍नावर आवाज उठवला तरच पक्षाला चालना मिळेल. पक्षासाठी काम करणारा कार्यकर्ता हवा आहे. जुना आणि नवा असा भेदभाव होणार नाही. सर्वांची साथ महत्वाची आहे. 

प्रथमच शक्तीप्रदर्शन 
मेळाव्यात जुना-नव्या पदाधिकाऱ्यांनी उपस्थिती लावली. कार्यकर्त्यांची गर्दी करून गेल्या काही महिन्यातच प्रथमच शक्तीप्रदर्शन केले. या निमित्ताने कामथे तसेच खेड येथील कार्यकर्त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. तर तालुक्‍यातील काही शाळांना शालेय पुस्तकांचे वितरण करण्यात आले. 

Web Title: Ramesh Kadam comment